जेसनच्या घरासमोरच्या शेतात त्यानं खूप सारी सूर्यफुलं लावली होती. पिवळ्याधमक पाकळ्या व काळसर तपकिरी रंगाचे परागकण असलेली ती फुले खूपच सुंदर दिसायची. दिवसभर जेसन शेतात पाणी घालणं, मध्येमध्ये उगवलेलं गवत काढणं, वाळकी पानं तोडणं अशी कामं करायचा. त्याच्या शेतात एक साळुंकी राहायची. ती सारखी जेसनच्या मागे मागे असायची; पण ऊन तापू लागलं की मात्र ती सूर्यफुलांच्या मोठय़ा पानांमध्ये झोपून जायची. त्या शेतातली सूर्यफुलं सुकली की जेसन त्यातलं बी काढून उन्हात वाळवायला ठेवायचा. तयार झालेल्या बियांतल्या उत्तम प्रतीच्या बिया गोणीत भरून ठेवायचा व राहिलेल्या बिया एका बादलीत ठेवायचा. रोज सकाळी उठल्यावर बादलीतल्या थोडय़ा थोडय़ा बिया तो अंगणात पसरायचा आणि त्याच्या शेजारी एका मोठय़ा पसरट भांडय़ात पाणी भरून ठेवायचा. अंगणात पसरलेल्या सूर्यफुलांच्या बिया टिपण्यासाठी वेगवेगळे पक्षी यायचे. त्यात हिरवा पोपट असायचा, रॉबीन असायचा, राखाडी रंगाची कबुतरं असायची आणि छोटुशा चिमण्याही असायच्या.
सगळे पक्षी जमले की खूप मजा करत. त्यांनाही सूर्यफुलाच्या बिया खायला आणि जेसनच्या अंगणात खेळायला खूप आवडत असे. सगळे मिळून खूप दंगामस्ती करत, खूप किलबिलाट करत, खूप गप्पा मारत आणि एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत. जेसन ते सगळं बघून खूश होई. त्याला सगळे पक्षी आपापसात खेळताना बघून खूप बरं वाटायचं.
एके दिवशी साळुंकी पक्ष्यांची वाट बघत बसली होती. समोर दिसणारी गर्द हिरवी झाडी, आकाशाचा निळा रंग, ढगांचा पांढरा राखाडी रंग आणि जिकडे पहावं तिकडे सोनेरी पिवळी सूर्यफुलं दिसत होती. ते सुंदर सुंदर रंग बघून साळुंकीला वाटलं की, जगात इतके सगळे रंग असताना आपल्यालाच का असा मळकट रंग मिळाला आहे. तेवढय़ात निळा पक्षी आणि रॉबीन जेसनच्या अंगणात आले. पाठोपाठ दोनचार पोपट आले. ते रंगीबेरंगी पक्षी आणि पोपटाची लालबुंद चोच बघून साळुंकी आणखीनच खट्ट झाली.
सगळे जण तिला खेळायला बोलावत होते, पण ती कोणाशी न बोलता एकटीच कोपऱ्यात बसून राहिली.
जेसनच्या ते लक्षात आल्यावर तो उठून साळुंकीच्या जवळ गेला आणि तिला विचारले, ‘‘तू आज सगळ्यांबरोबर खेळायला का गेली नाहीस?’’ साळुंकी आपल्या मळकट रंगावर नाराज झाल्याचे कळल्यावर जेसन हसायला लागला. तो साळुंकीला म्हणाला, ‘‘अगं तुझा काळपट तपकिरी रंग, काळीभोर शेपटी आणि त्या शेपटीवरचे दोन पांढरे ठिबके किती छान दिसतात. तुझी पिवळी चोच आणि तुझ्या डोळ्यांभोवतीच्या पिवळ्या वर्तुळामुळे तर तू जास्तच सुंदर दिसतेस. तुझं चालणं किती डौलदार आहे ते माहीत आहे का तुला?
आपल्या चोचीने दाणे टिपताना आणि त्या पक्ष्यांशी खेळताना तू इतकी रुबाबदार दिसतेस की तुला कशाला हवा आहे हिरवा आणि निळा रंग? आपल्याला जे मिळालं आहे ते अतिशय सुंदर आहे. त्यात समाधानी आणि आनंदी राहावं. दुसऱ्याकडे जे आहे त्याची कधीही हाव धरू नये’’.
साळुंकीला जेसनचं म्हणणं पटलं. स्वत:चं कौतुक ऐकून तर ती फारच खूश झाली. त्या आनंदात तिनं आपल्या मानेला एक झटका दिला आणि मोठय़ा रुबाबदारपणे चालत आपलं रूप बघायला पाण्याच्या भांडय़ाकडे निघाली.
(डॅनिश कथेवर आधारित)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा