अनुप सोफ्यावर पडून बाबांच्या फोनशी खेळत होता. आई-बाबांचं बोलणंही त्याच्या कानावर पडत होतं. बाबा कोणत्या तरी सहलीबद्दल बोलत होते. ‘‘अगं, सगळं ठरत होतं, पण मध्येच कडमडला हा झारीतला शुक्राचार्य. मग कुठलं काय, नाहीच जमलं.’’
अनुप उठून बसत म्हणाला, ‘‘बाबा कोण कडमडला? झारीतला शुक्राचार्य म्हणजे कोण हा
‘‘जा आजीकडे! ती सांगेल तुला.’’ असं म्हणत त्यांनी त्याला आजीकडे पिटाळलं.
अनुप आजीकडे आला. ‘‘आजी, झारीतला शुक्राचार्य म्हणजे कोण गं?’’
आजी म्हणाली, ‘‘का रे बाबा, आज तुला का हवंय हे?’’
‘‘अगं, आज बाबा म्हणत होते, त्याच्यामुळे म्हणे त्यांची सहल रद्द झाली. सांग ना आजी, कोण गं हा?’’
‘‘अरे बाळा, ती एक गोष्टच आहे. सांगते ऐक – एकदा बळी नावाचा एक राजा यज्ञयाग करून एवढा पुण्यवान बनला होता, की त्रिभुवन म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांवर तो राज्य करणार होता. म्हणजे थोडक्यात, इंद्राची जागा घेणार होता. म्हणून सर्व देवांनी मिळून श्रीविष्णूंना विनंती केली की, काही करून बळी राजाचा हा यज्ञ पूर्ण होण्याआधी उपाय करा. तेव्हा श्रीविष्णू बटू वामन रूप धारण करून त्याच्याकडे याचक म्हणून गेले. (बटू म्हणजे नुकतीच मुंज झालेला आठ ते दहा वर्षांचा मुलगा) त्यांनी बळीकडे तीन पावले भूमी मागितली. ‘तीन पावले भूमीच का?’ असे बळी राजाने विचारता त्यानं सांगितलं, संध्या करायला बसण्यासाठी जेवढी भूमी लागेल तेवढी भूमी. ती स्वत:ची असावी एवढय़ाचसाठी.’’
बळी राजाने ती लगेच देतो म्हणून मान्य केलं. कारण त्यानं आतापर्यंत प्रत्येक याचक तृप्त केला होता, अशी त्याची ख्याती होती. त्रिभुवनाचा राजा होऊ शकणाऱ्या बळीराजाला तीन पावलं भूमी म्हणजे अगदीच सामान्य गोष्ट होती. मग वामनरूपी विष्णूंनी त्याला संकल्प सोडण्यास सांगितलं. त्यासाठी त्यानं झारीतील पाणी सोडताना त्यातून पाणीच येईना. (झारी म्हणजे तोटी असणारा छोटा तांब्या) तेथे उपस्थित असलेल्या दैत्यगुरू शुक्राचार्यानी विष्णूला ओळखलं होतं. ते बळीराजाचा यज्ञ पूर्ण होऊ देणार नाहीत हे त्यांना समजलं. म्हणून त्यांनी बळीराजाला ‘संकल्प सोडू नको,’ असंही सांगितलं. पण बळी राजानं त्यांचं म्हणणं ऐकलं नाही; कारण याचक संतुष्ट व्हावा असं त्याचं व्रत होतं. म्हणून मग असा संकल्प पूर्ण होऊ नये म्हणून शुक्राचार्य सूक्ष्मरूप घेऊन झारीच्या तोंडाशी जाऊन बसले. म्हणजे याचकाला तृप्त करणं, या चांगल्या कामात त्यांनी अडथळा आणला. म्हणून तेव्हापासून चांगल्या कामात ऐन वेळी अडथळा आणणाऱ्या माणसाला ‘झारीतला शुक्राचार्य’ असे म्हणतात.
‘‘आज्जी, यू आर सिंपली ग्रेट!’’म्हणत अनुप आजीच्या मांडीवर जाऊन बसला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा