‘गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यतील एका खेडय़ातलं एक गरीब शेतकरी कुटुंब. घरात फारसं कुणी शिकलंसवरलं नव्हतं. त्या घरातील एक मुलगा मात्र चांगल्या गुणांनी एसएससी पास झाला आणि त्यानं थेट मुंबई गाठली आणि एका खडतर प्रवासाची सुरुवात झाली. सारं काही नवं आणि नवखं होतं त्याच्यासाठी. पण त्यानं हार मानली नाही. काहीही झालं तरी आता माघारी गावाकडे परतायचं नाही, असा त्याने निर्धारच केला होता..’
अशी सुरुवात असलेली एखादी कथा आपण वाचायला घेतली, तर त्याचं पुढचं कथानक काय असणार याचा आपोआपच अंदाज येऊ लागतो. गुजरातेतील एखाद्या खेडय़ातून खांद्यावर वळकटी घेऊन मुंबईला आलेला एखादा नवखा, पोरगेलासा तरुण पुढे खूप मोठा होतो, धंद्यात बरकत येते, नाव कमावतो, हाताखाली शेकडो कर्मचारी मावतील एवढा व्यवसायाचा पसारा मांडतो, हे सारं आपल्याला माहीत असतं. कारण गुजराती माणूस मुळात मुंबईला येतो, तेव्हा त्याच्या डोक्यात धंदा-व्यवसायाचीच स्वप्नं तरळत असतात. त्यासाठी तो पडेल ते कष्ट उपसतो आणि अखेर यशस्वी होतो. प्रत्येक यशस्वी गुजराती माणसाची कथा जवळपास अशीच, सारखीच असते..
ही कथा मात्र तशी नाही. या कथेची सुरुवात सर्वसाधारण गुजराती माणसाच्या कथेसारखीच असली तरी कथानक मात्र अचंबितपणे वेगळ्या वळणावर जाते. गुजराती आणि त्यातही पटेल समाजाचा माणूस म्हटलं, की तो धंद्याची स्वप्नं घेऊनच आयुष्याला आकार देणार हे ठरलेलं असलं, तरी जुनागढजवळच्या खेडय़ातील शेतकरी कुटुंबातून मुंबईला आलेल्या व्रजलाल पटेल नावाच्या तरुणाच्या डोळ्यात मात्र शिकून मोठं व्हायचं स्वप्न तरळत होतं. हे काहीसं वेगळंच होतं. म्हणूनच व्रजलाल पटेलच्या कहाणीत जागोजागी वेगळी वळणं पाहायला मिळतात. व्यापारधंदा करण्याऐवजी, शिकून मोठं व्हायचं स्वप्न, हा या कहाणीतील पहिला धक्का..
ते १९७५-७६ चं वर्ष होतं. व्रजलाल पटेलांचा मोठा भाऊ त्याआधी कधीतरी मुंबईला आला असताना, एका दग्र्यात उरुसाच्या वेळी पोहोचला आणि त्याची तेथे भक्ती जडली. पुढे दर वर्षी तो त्या उरुसाला हजेरी लावून सेवा करू लागला. त्या उरुसातच त्याची एका भाविकाशी मत्री झाली.
व्रजलाल पटेलची कहाणी येथून सुरू होते..
सहज गप्पा मारता मारता, व्रजलाल पटेलांच्या भावाने व्रजच्या डोळ्यातलं शिक्षणाचं स्वप्न त्या नव्या मित्राला सांगितलं आणि त्या मुस्लीम मित्रानं व्रजलाल पटेलांच्या भावाला शब्द दिला, ‘त्याला मुंबईला पाठव. मी घेईन त्याची काळजी!’ हे शब्द सोबत घेऊन उरुस आटोपल्यावर व्रजलाल पटेलांचा भाऊ गावी परतला, आणि कपडय़ांची पिशवी, थोडे पसे सोबत घेऊन सोळा-सतरा वर्षांचा व्रज पटेल मुंबईला आला. पत्ता शोधत शोधत भावाच्या त्या मित्राचे घर गाठले आणि अगोदर कधीच घराबाहेर न पडलेल्या व्रजला मुंबईत मायेचा आसरा मिळाला. मग त्या मित्राच्या मदतीनेच त्याने कॉलेजला प्रवेश घेतला. शिकून मोठं व्हायचं एवढंच माहीत असलं, तरी मोठं होण्यासाठी नेमकं काय शिकायचं ते मात्र व्रजला माहीतच नव्हतं. मग इकडे तिकडे चौकशी करून त्याने विल्सन महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. गुजरातेतील जुनागडच्या खेडय़ातील एका अशिक्षित शेतकरी कुटुंबातील एका मुलाचं मुंबईत महाविद्यालयीन शिक्षण सुरू झालं होतं. त्याच दरम्यान, काही मित्र यूपीएससीची तयारी करत होते. ते केल्यावर ‘आयएएस’ होता येतं, मोठं होता येतं असं कळल्यावर व्रजने त्या परीक्षेचाही ध्यास घेतला. तयारी सुरू केली. खूप अभ्यास केला. पण तीन वेळा प्रयत्न करूनही यश मिळालंच नाही. त्याच दरम्यान, विज्ञान शाखेची पदवी मात्र पदरात पडली होती. तरी तिच्या जोरावर ‘मोठं करणारी’ नोकरी मिळणं कठीणच आहे हे एव्हाना त्याच्या लक्षात आलं होतं. मग त्याने आपला मार्ग निवडला. सेंट्रल एक्साइजची परीक्षा दिली आणि त्याला राज्य शासनाच्या विक्रीकर विभागात नोकरीही मिळाली.
पण आपण केवळ सुविधांच्या अभावी ‘आयएएस’ होऊ शकलो नाही, याची खंत कायम मनाला पोखरत होती. आपल्यासारखीच अनेक मुलं आयएएस होण्याचं स्वप्न पाहात असतील, पण मार्गदर्शनासाठी पुरेसे पसे मोजता येत नसतील, सुविधा मिळत नसतील, पुस्तकं विकत घेऊन अभ्यास करणं परवडत नसेल आणि अखेर त्यांना आपले स्वप्न गुंडाळून ठेवून परिस्थिती नेईल त्या दिशेने जावे लागत असेल, या विचाराने व्रज अस्वस्थ होता. यावर काहीतरी केलं पाहिजे असं त्याने ठरवलं. तोवर नोकरीत बऱ्यापकी स्थर्य आलं होतं. मग हालचाल सुरू झाली. सनदी अधिकारी होण्याची इच्छा आणि तळमळ असलेल्या मुलांना साऱ्या सुविधा मोफत दिल्या पाहिजेत असे ठरवले आणि काही परिचितांशी बोलून त्यांना सोबत घेऊन ‘महर्षी दयानंद फाऊंडेशन’ नावाची एक संस्था सुरू केली. सनदी परीक्षांसाठी लागणारी सर्व पुस्तके गोळा करण्यासाठी व्रज पटेल झपाटून कामाला लागले. वाचनाचा छंद असल्याने हुतात्मा चौकात, ‘सीटीओ’च्या फूटपाथवरील पुस्तक विक्रेत्यांशी जुनी ओळख होती. तेथे जाऊन परीक्षार्थीना मार्गदर्शक ठरणारी पुस्तकं निवडून ‘वजनाच्या भावाने’ विकत घेणं हा फावल्या वेळातला कार्यक्रम सुरू झाला. बघता बघता पुस्तकांची संख्या वाढत गेली. संदर्भासाठी लागणाऱ्या कोणत्याही पुस्तकासाठी परीक्षार्थी उमेदवारास अन्यत्र कोठेही जावे लागणार नाही याची काळजी घ्यायची, असं व्रज पटेलनी ठरवलेलंच होतं. मग वेगवेगळ्या संस्थांकडेही हेलपाटे सुरू झाले. पुस्तकरूपी देणग्या मिळू लागल्या. ब्रिटिश कौन्सिलच्या ग्रंथालयाने तर या कामासाठी तब्बल दोन ट्रकभर पुस्तके देणगीदाखल दिली. भारतीय विद्या भवनने तीन टेम्पोभरून पुस्तकं दिली. भारतीय नौदलाने पुस्तकं दिली. अशा प्रकारे व्रज पटेलांच्या ग्रंथालयातील पुस्तकसंख्येने अडीच लाखांचा टप्पा ओलांडला.
युपीएससी परीक्षेच्या तयारीतच विद्यार्थ्यांला दीड-दोन लाख रुपये खर्च करावे लागतात. या ग्रंथालयामुळे पुस्तकांच्या खरेदीचा मोठा खर्च वाचला. ज्यांना पुस्तकं हवीत त्यांनी नाममात्र शुल्क भरून पुस्तक घेऊन जावे, अभ्यास करावा, नोटस् काढून घ्याव्यात आणि पुस्तक परत आणून दिले की शुल्काची रक्कम परत न्यावी. ज्यांना मार्गदर्शनाची गरज वाटते, अशा विद्यार्थ्यांसाठी शनिवार-रविवारी दररोज बारा तासांचे वर्ग सुरू झाले. अभ्यासासाठी स्वतंत्र व्यवस्थाही करण्यात आली. मार्गदर्शन वर्गासाठी मात्र नाममात्र शुल्क आकारण्याचे ठरले.
अगदी कालपरवापर्यंत फाऊंडेशनचे ग्रंथालय दादरच्या भाजप कार्यालयाच्या इमारतीत होते. पण जूनमध्ये करार संपला आणि पुस्तकांचा पसारा गुंडाळून जागा मोकळी करून द्यावी लागली. जवळपास चाळीस टन पुस्तके घेऊन व्रज पटेल यांनी दादर पूर्व स्थानकाबाहेरचे रेल्वे अधिकाऱ्यांसाठी पूर्वी बांधलेल्या जुन्या आलिशान इमारतींच्या रांगेतील ‘पाम वू’ या इमारतीतील आपले भलेमोठे घर गाठले आणि पुस्तकांना नवा मुक्काम मिळाला. तरीही सारी पुस्तके तेथे मावणे शक्य नव्हती. सौराष्ट्रात जुनागढ जिल्ह्यत एका शिक्षणसंस्थेने जागा देऊ केल्यावर चाळीस टन, जवळपास एक लाख पुस्तके तेथे पाठवली. त्या संस्थेचे मोठे संकुल आहे. सर्व अभ्यासक्रमांच्या पदवी, पदव्युत्तर परीक्षांपर्यंतची महाविद्यालये त्या संकुलात आहेत. आता तेथेही व्रज पटेलांचे ग्रंथालय सज्ज होत आहे. कल्याण येथे स्टेशनच्या जवळच सुमारे अडीच-तीन हजार चौरस फुटांची जागा मिळाली. महिनाभरात लाखभर पुस्तके तेथे हलविण्यात येतील. कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि परिसरातील इच्छुक उमेदवारांना त्याचा फायदा घेता येईल. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत अनेकजण या ग्रंथालयाचा आणि मार्गदर्शन वर्गाचा लाभ घेऊन यशस्वी झाले. विश्वास नांगरे-पाटील नावाचा सनदी पोलीस अधिकारी आपल्या ग्रंथालयात अभ्यास करूनच यशस्वी झाला, हे सांगताना व्रज पटेलांच्या चेहऱ्यावर आजही आनंद, समाधानाचे अनोखे मिश्रण तयार होते. मग ते टेबलाखालून एक जाडजूड फाइल काढून समोर ठेवतात. अनेक यशस्वी विद्यार्थ्यांचे लेख, त्यांच्या प्रतिक्रियांची कात्रणे, वर्तमानपत्रातील बातम्या आणि गेल्या तीस वर्षांत पंचवीस हजारांवरून अडीच लाख पुस्तकांपर्यंतचा पल्ला गाठलेलं संपन्न ग्रंथालय अशा अनेक विषयांवरील लेख-बातम्यांचा खजिना या फाइलमध्ये जिवापाड जपलेला दिसतो. आता बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र अभ्यासिकाही व्रज पटेल यांनी आपल्या घरातच तयार केली आहे. ज्यांची राहण्याची सोय नाही असे विद्यार्थी तेथेच मुक्काम करतात.
आयएएसच्या अभ्यासक्रमाची आणि एकूणच नोकरशाहीची आजची प्रतिमा फारशी चांगली नाही. या परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी आपल्या गुणवत्तेचा, ज्ञानाचा लाभ देशहितासाठी द्यावा, त्यातून देश मोठा व्हावा अशी अपेक्षा असते. मात्र, सध्या ‘आयएएस’ म्हणजे, ‘इंडियन अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सव्र्हिस’ नव्हे तर ‘इंडियन अरबपती सव्र्हिस’ होऊ घातली आहे. पसा नसेल तर प्रामाणिक आणि हुशार मुलांना या स्पर्धात्मक जगात पाऊलही टाकता येत नाही आणि गुणवत्ता वाया जाते. केवळ सुविधांच्या अभावी ही गुणवत्ता वाया जाऊ द्यायची नाही, असे व्रज पटेलांचे व्रत आहे. हे व्रत आपण वर्षांनुवष्रे पाळणार आहोत; कारण ते सुफळ संपूर्ण होण्याचा दिवस कधी येईल ते माहीत नाही. चांगले प्रशासकीय अधिकारी तयार होणे हेच या व्रताचे फलित असेल, असे सांगताना व्रज पटेल यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आत्मविश्वास स्पष्ट दिसतो.
दिनेश गुणे dinesh.gune@expressindia.com
विद्यादानाचे व्रत
गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यतील एका खेडय़ातलं एक गरीब शेतकरी कुटुंब. घरात फारसं कुणी शिकलंसवरलं नव्हतं.
Written by दिनेश गुणे
आणखी वाचा
First published on: 21-08-2016 at 01:36 IST
मराठीतील सर्व बावनकशी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian entrepreneur success stories