आज किती तरी दिवसांनी बेडरूमच्या खिडकीशी मी निवांतपणे उभी होते. सकाळची बहुतेक कामं आवरली होती. आजचं वर्तमानपत्रही वाचून झालं होतं. मोठी नात श्रुती शाळेत गेली होती. धाकटी नात जुई एकटीच भातुकली खेळत होती. सूनबाई जुईच्या अवतीभवती काहीबाही करीत होती. हे आणि मुलगा त्यांच्या कामासाठी बाहेर गेले होते.
रात्रीपासूनच पावसाची रिपरिप चालू होती. समोरचा रस्ता स्वच्छ धुऊन निघाला होता. रस्त्यातच एक छोटा खड्डा होता. त्यात पावसाचं पाणी साचून त्याचं डबकं तयार झालं होतं. त्यात पावसाचे मोठे थेंब पडले की ते पाणी तिथल्या तिथेच जोरात वर उडत होतं. हळूहळू पाऊस पूर्णपणे थांबला. वाराही थांबला आणि डबक्यातलं पाणीही हलायचं थांबलं. मी त्या शांत, संथ पाण्याकडे एकटक पाहात होते. तेवढय़ात वरून झाडाच्या पानांवरून पाण्याचा एक थेंब त्या शांत संथ पाण्यात पडला आणि त्याबरोबर पाण्यात तरंग उठले. मग दुसरा थेंब पडला. तिसरा पडला. असे एकापाठोपाठ एक थेंब पडतच राहिले. प्रत्येक थेंबाबरोबर त्या पाण्यात एकात एक एकात एक असे असंख्य तरंग उठत राहिले.आणि काठापर्यंत पसरत गेले. किती सुंदर दिसत होतं ते पाणी. ते डबकं मी फक्त पाहात राहिले. मला आज खिडकीशी उभं राहिल्याचा खूप आनंद झाला.
तेवढय़ात पाठीमागून मला माझा पदर ओढल्यासारखा वाटला. नक्कीच जुई असणार. तिची ती सवयच आहे. भातुकलीचा खेळ संपलेला दिसतोय. आजी, आजी, तू इथे एकटीच काय करते आहेस? चल ना आपण बाहेर जाऊ या. ते बघ तिथे किती पाणी साचलंय. मला दिसत असलेलं डबकंच तिला दिसत होतं. आजी; आपण त्यात होडय़ा सोडू या का? हा आमचा नेहमीचाच खेळ होता. मी लगेच कागदाच्या दोन होडय़ा केल्या आणि आम्ही दोघी त्या डबक्याजवळ गेलो. तिला खरं तर त्या साचलेल्या पाण्यात उडीच मारायची होती; पण माझ्याकडे आणि होडीकडे बघून तिने तो विचार बदलला; मग आम्ही दोघींनी आमच्या होडय़ा अलगद त्या पाण्यात सोडल्या. त्यांना हळुवार फुंकर मारली. त्याबरोबर त्या संथपणे पाण्यात इकडून तिकडे फिरू लागल्या. जुई टाळ्या वाजवत त्या होडय़ांचं फिरणं पाहात होती. तिचा तो निरागस आनंद पाहून मलाही खूप गंमत वाटत होती.
एवढय़ात कुठून तरी एक बेडूक टणाटण उडय़ा मारीत आला आणि त्याने नेमकी आमच्या समोरच्या त्या डबक्यातच उडी मारली. आमच्या अंगावर एकदम जोरात पाणी उडालं. आम्ही घाबरून मागच्या मागे पडलो. जरा वेळाने परत फिरून पाहिलं तर बेडूक तसाच पुढे उडय़ा मारत निघून गेला होता, पण त्याने डबक्यात उडी मारल्यामुळे आमच्या होडय़ा मात्र पार तळाला गेल्या होत्या. जुईचा एकदम विरस झाला. आजी, चल आपण घरी जाऊ, असं म्हणून तिने मला ओढतच घरी आणलं.
पण काय गंमत. दरवाजातून आत शिरता क्षणीच कांदाभजीचा खमंग वास नाकात शिरला. जुई एकदम खूश झाली. आईने केलेली गरम गरम भजी तिने खाल्ली आणि तिचा रडवेला चेहरा एकदम खुलला. तिथपर्यंत मोठी नात श्रुतीही शाळेतून घरी आली. मग आम्ही सर्वानीच भरपूर भजी खाल्ली. आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली होती. दोन्ही नातींनी पावसात फिरायला जाण्याचा हट्ट धरला. मग दोघींना मी रेनकोट घातले. स्वत:साठी छत्री घेतली आणि आम्ही तिघी पावसात फिरायला बाहेर पडलो. कोपऱ्यापर्यंत गेलो तर पावसाला जोरातच सुरुवात झाली. दोघी माझा हात सोडून नाचायला लागल्या. त्यांना सांभाळताना माझी पुरती तारांबळ उडाली. समोरच एक माणूस मक्याची कणसं भाजत होता. आता ती भाजलेली कणसं खाल्ल्याशिवाय पावसात फिरणं आणि भिजणं पूर्ण होणारच नव्हतं. तिथेच उभं राहून म्हटलं, चला आता घरी. त्यांना खरं तर घरी यायचं नव्हतं. अजून पावसात खेळायचं होतं; पण आता आणखी थांबलो तर आई ओरडेल असं सांगितल्यावर घरी यायला तयार झाल्या. रेनकोट होता तरी दोघी पूर्ण भिजल्या होत्या.
त्यामुळे घरी आल्यावर लगेच आलं, तुळस घालून गरम गरम चहा सर्वानी प्यायला. कपडे बदलले आणि परत एकदा खिडकीशी बसून सबंध दिवस पावसात केलेली मजा आठवत बाहेर कोसळत असलेला पाऊस आम्ही बघत बसलो.
माझं मन मात्र केव्हाच भूतकाळात शिरलं होतं. माझ्या लहानपणी मीदेखील माझ्या आजीबरोबर अशीच सबंध दिवस पावसात मजा केली होती. त्याचीच पुनरावृत्ती आज कित्येक वर्षांनी मी परत एकदा अनुभवत होते. आजी- नातीचं नातं खरंच किती गोड असतं ना!
स्मिता गाडगीळ – response.lokprabha@expressindia.com