नातवंडे घरात आली की आजी-आजोबांना जो आनंद होतो तो शब्दांत लिहिण्यापलीकडे असतो. ‘दुधावरची साय’ म्हणजे त्या पातळ दुधापेक्षा साय जास्त प्रिय अशी प्रत्येकाची स्थिती असते. ग्राहकांना बँकेत ठेवलेल्या मुद्दलपेक्षा व्याज प्रिय असावे तसेच! आजी-आजोबांची नातवंडे आल्यावर जुनीच चक्रे पुन्हा फिरवायला आजी आणि आजोबा तयार होतात. नातवंडे होणे यात आजीचे कर्तव्य खरे तर किंवा कष्ट नसतात असे म्हणता येत नाही. केळीच्या किंवा गर्भिणीच्या सुनेच्या बाळंतपणी तीसुद्धा चिंताजनक असतेच. आपल्याच पोटचा आतडय़ाचा तो गोळा असतो. लाड करायला एक जीव मिळतो व आजीला वृद्धत्वात नवा कोंब फुटतो, तो बालपणाचा असतो. वृद्धत्व हे रिकामपणच! आजी-आजोबा आईपेक्षा अधिक वेळ बालकांना-नातवंडाला देतात व त्यातच त्यांचे यश असते. एका लोकगीतात म्हटल्याप्रमाणे लेकीची मुले व लेकाची मुले असा नातवंडांत भेदभाव कधी होऊ शकतो.
लेकीच्या मुला उचलून घेते तुला
लेकाच्या मुला बस जा सांदिला,
‘जावयाचे पोर हरामखोर’ अशा शब्दांत नातवंडांची वर्गवारी नाखुशीने होते. थोडय़ाफार फरकाने लाडके दोडके होतेच.
तरीही आजी मात्र त्या सर्वानाच आवडते.
आई असते जन्माची शिदोरी
आजी असते खाऊची तिजोरी
आयुष्याच्या उतारावरी
फारशी नसते जबाबदारी
नातवंडांमध्ये मूल बनून
हौस घेते ती भागवून
बालपणाची, खेळण्याची नाचण्याची
आणि बागेतील सर्व फुले केसात माळण्याची
रांगण्याची रंगण्याची गाण्याची
रंगपेटी घेऊन दंगण्याची हसण्याची.
नातवापेक्षाही नात झाली की आजी जास्तीच खूश होते. नातीच्या रूपाने आपल्या मुलीचे बालपण पुन्हा उपभोगते, पुढच्या पिढीला आपण जे अंकुररूपी दान देऊन निरोप घेणार आहोत त्याची जोपासना आजी करते. सृजनाचा आनंद तृप्ततेने भोगते. तरुणवयातील विकार, चिडचीड व विचार वृद्धत्वात बदलल्याने आजीचे नाते अधिक प्रगल्भ व विचारी असते.
शुभांगी पासेबंद – response.lokprabha@expressindia.com