काल दुपारी अंगणात उभा होतो. उन्हाने अंगण तापलं होतं. समोरच्या डांबरी रस्त्यावरून तीन लहानग्या मुली चालत येत होत्या. दोघींच्या पायात चपला होत्या तर एक अनवाणी. दुपारचं टळटळीत ऊन, रस्ता तापलेला अन पायात काही नाही. मला त्या अनवाणी चालणाऱ्या मुलीची दया आली. मनात विचार आला, ‘किती हे दारिद्रय़ आपल्या सुशेगात समाजाच्या आजूबाजूला.’

‘पायात चपला का नाहीत’ असं मी त्या अनवाणी मुलीला विचारले, तर ती हसत उत्तर न देता पुढे गेली. बहुतेक दारिद्रय़ाच्या चटक्यापुढे उन्हाचे चटके तिला सौम्य भासत असावेत. ती माझ्या मुलीच्या वयाचीच असावी. माझ्या मुलीकडे किती चपला असतील घरात? त्या विचाराने मलाच वाईट वाटले. मी माझ्या लेकीला हाक दिली अन् घरातील तिचा चपलांचा एक जोड आणायला सांगितला. माझ्या लेकीला त्या अनवाणी पायाच्या मुलीची माहिती दिली. आमच्या दोघांनी तिचा शोध सुरू केला. मी दूर नजर टाकली. रस्त्याच्या कडेवरील जांभळाखाली ती मुलगी खाली पडलेली जांभळे वेचत होती. मी तिला जोरात हाक मारली. तिने माझ्याकडे पाहिले अन् ती सुसाट पळाली. बहुतेक जांभळं उचलली म्हणून मी तिला ओरडेन असं तिला वाटलं असावं. मला अजून अपराध्यासारखं वाटलं. माझ्या हातातील चपला तिच्या पायापर्यंत पोहोचणार नाहीत, अशी पुसटशी शंका आली.

मी माझ्या लेकीला सायकल घ्यायला सांगितली अन् सायकलच्या बकेटमध्ये चपला ठेवल्या. मी पायी अन् लेक सायकलवर असे आम्ही दोघे तिचा शोध घेत पुढे निघालो. ती अन् तिच्या दोन सख्या दूर रस्त्यावर चालताना दिसल्या. माझ्या लेकीने सायकलचा वेग वाढवला. मी मुद्दाम मागे थांबलो. लेकीने तिला गाठलं अन् तिला चपला दिल्या. तिला हे अनपेक्षित होतं. दूरवरून मला त्या मुलीच्या चेहऱ्यावर उमटलेलं हास्य दिसलं. माझीही लेक खूश होऊन परत येताना दिसली.

तिच्या पायाला लागणाऱ्या उन्हाच्या चटक्यांसाठी मी तात्पुरता दिलासा दिला होता; परंतु तिच्या दारिद्रय़ाच्या चटक्यांचे काय? ते कसे चुकणारं? माझी हतबलता मला अस्वस्थ करून गेली. मी तिच्याकडे पाहत होतो. दूर तिची पाठमोरी आकृती उन्हात अदृश्य होताना दिसली. जाताना काळजाला चटका लावून गेली.
सचिन मेंडिस – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader