‘‘आई, तुझी फेवरेट कोअर व्हॅल्यू कोणती?’’ क्षणभर मी शून्यच झाले. डॉक्टर किती वाजता येणार ते विचारायचे, नर्सने लिहून दिलेली औषधे आणायची, रात्री बजेटचा ई-मेल मॅनेजमेंटला पाठवायचा, पीएच.डी. विद्यार्थ्यांला खडसवायचे अशी ‘टू डू लिस्ट’ (कामाची यादी) डोक्यात घोळवत मी आयसीयूच्या वेटिंग हॉलमध्ये शिरले होते.. राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक विषयांवर घरात सतत चर्चा (ज्याला सभ्य भाषेत ‘वाद’ म्हणतात) झडतच असतात. नुकतेच बाबांचे आणि त्यांच्या नातीचे पिढय़ांनुसार बदलणारी मूल्ये यावर फटाके फोडून झाले होते. पण लेकीकडून व्हिजिटर पास घेऊन तिला घरी पाठवायचे आणि मग आत बाबांना भेटायला जायचे अशा माझ्या एकूण कार्यक्रमात हा लेकीचा प्रश्न आणि त्यावरची चर्चा अजिबात बसत नव्हती. पास हिसकत मी तिला घरी गेल्यावर काय काय करायचे हे सांगू लागले, पण ती हटकूनच बसली. तळागाळातल्या मुलांबरोबर शैक्षणिक काम करणाऱ्या एका संस्थेची फेलोशीप मिळाल्यापासून तिला शिक्षणाबद्दल आणि एकूणच आयुष्याबद्दल स्वत:च्या मतांची शिंगं फुटली होती. तिला आवरते घेण्यासाठी ‘उद्या नक्की विचार करून सांगते’ हा हुकमी एक्का तिच्यासमोर टाकून मी बाबांना भेटण्यासाठी आयसीयूकडे वळले.

पण त्या दिवसानंतरचा ‘उद्या’ काही वेगळाच होता. दहा दिवसांपासून हॉस्पिटलात असलेले बाबा अचानक आम्हाला सोडूनच गेले. आपल्या डायरीच्या पहिल्या पानावर ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ या ओळी लिहून ठेवणारे बाबा म्हणजे भालचंद्र हुद्दार मरणावर कसे प्रेम करावे हे शिकवून गेले. अती उत्साही नव्वदीचा हा लहान मुलगा एका दिवसात अचानक एक मृत्यू प्रमाणपत्रच बनून गेला.

पहिले काही काळ कशाचा काहीच अर्थच लागेना. डॉक्टर काय सांगत आहेत, फोनवर कोण काय म्हणत आहे, आपल्याला काय करायचे आहे, एकदम भिरभिरायलाच झाले. प्रथम कशाने भानावर आले तर ‘देहदान’ या शब्दाने. बाबांनी लिहून ठेवलेल्या इच्छेनुसार त्यांना देहदान करायचे होते. अरे हो, हे त्यांनी अनेक वेळा सांगितलेच होते. त्यांच्या समाजवादी विचार बैठकीच्या पाश्र्वभूमीवर यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नव्हते. डोळे, किडनी, हृदय असे आपले अवयव दुसऱ्याला उपयोगी पडावे असे वाटणे आणि पुढे तसे व्हावे याची तरतूद आपल्या हयातीतच त्यांनी करून ठेवणे हेही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी सुसंगतच होते. पण ‘अवयवदान’ आणि ‘देहदान’ यातील फरक लक्षात आल्यावर मात्र आम्हाला ते पचवणे कठीणच गेले. कितीही आधुनिकतेचा आव आणला आणि परंपरा झुगारून दिल्या तरी प्रिय व्यक्तीचे शरीर मृत्यूनंतर नुसतेच ‘हॉस्पिटलला देऊन टाकायचे’ हे कर्मकठीणच असते. ‘जसे त्यांनी लिहून ठेवले आहे तसेच करा’ या आपल्या निर्णयावर आई ठाम राहिल्यानेच केवळ देहदानाची बाबांची इच्छा पूर्ण होऊ शकली.

देहदानासाठी लागणारा फॉर्म बाबांनी १० वर्षांपूर्वीच जे. जे. हॉस्पिटलमध्ये जाऊन भरला होता. मृत्यूनंतर काय करायचे, काय करायचे नाही अशा आपल्या इच्छा स्पष्टपणे ज्या फाइलमध्ये त्यांनी लिहून ठेवल्या होत्या, त्या फाइललाच जे. जे. हॉस्पिटलचे कार्ड आणि फोन नंबर इत्यादी जोडलेले होते. म्हणजे ‘इच्छा होती पण काय करायचे, कुठे जायचे’ या चर्चेचे दोरच त्यांनी कापून ठवले होते. ज्या मेडिकल सायन्सचा फायदा घेऊन मी माझ्या वृद्धत्वाचा काळ सक्रियपणे घालवू शकलो त्या मेडिकल सायन्सच्या विकासासाठी माझे शरीर मी देऊन टाकतो या भावनेला कृतज्ञता म्हणायचे, सार्थकता की वैचारिक सुस्पष्टता! अर्थातच विधी, अंत्यसंस्कार, तेराव्याचा संस्कार इत्यादी करायचे नाही हे सारे त्यांच्या विचारसरणीला धरूनच होते. सारे कुटुंबीय या संस्काराचे असल्याने ते ओघानेच आले. देहदान प्रक्रिया मात्र आम्हाला वैचारिक, भावनिकदृष्टय़ा खूप काही देऊन गेली. ‘खूप कटकटीचे असते, खूप वणवण होणार’ अशी चिंता अनेकांनी व्यक्त केली होती पण प्रत्यक्षात ही प्रक्रिया खूपच सोपी आणि जे. जे. हॉस्पिटलच्या शरीरशास्त्र (अल्लं३े८) विभागातील डॉक्टरांच्या सहकार्याने खूपच सुलभ ठरली. योग्य कागदपत्रे व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व केल्याने देहदानाचा हा सोहळा अत्यंत समृद्ध करणारा ठरला. त्यातून जर ऐहिकाच्या पलीकडे जाण्याचा संदेश बाबांना द्यायचा असेल तर ते शंभर टक्के यशस्वी ठरले. त्यांच्या या निर्णयाने सर्वच काहीसे अंतर्मुख झाले आणि अर्थातच देहदानाविषयी गांभीर्याने विचारही करू लागले.

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी विभागात दीर्घकाळ कार्यरत असल्याने आणि माणसाशी जोडून घेत पुढे जाण्याची वृत्ती असल्याने ओळखींचा आणि मित्रमंडळींचा मोठा परीघ! वाढत्या वयातील नागपूरमधील वैचारिक वातावरण; माडखोलकर, मासोदकर, बोबडे, जैन, पोद्दार, धर्माधिकारी, तिडके अशा दिग्गजांचा दीर्घ सहवास आणि गांधीवादाचा पगडा यामुळे बाबांच्या वृत्ती, कृती आणि उक्ती यामध्ये सुसंगती होती. बाबा स्वातंत्र्यसैनिक होते पण त्याचा पेन्शन, आरक्षण, सदनिका असा कोणताच फायदा त्यांनी घेतला नाही. गांधीजींशी प्रत्यक्ष बोललेल्या ज्या काही थोडय़ा फार व्यक्ती आज भारतात असतील त्यापैकी एक बाबा होते. सक्रिय राजकारणात नसूनसुद्धा खादी आणि केवळ खादीचाच वापर करणाऱ्या पिढीचेसुद्धा ते शेवट शेवटचे शिलेदार ठरावेत.

त्यांच्या जगण्याशी सुसंगतच असे हे त्यांचे मरणोत्तर जगणे होते. देवधर्म, पूजाअर्चा यात कधीच न रमणारे बाबा माणसात खूप रमायचे. त्यांनी गप्पा मारल्या नाहीत असा आमच्या आसपासच काय दूरदूरच्या वर्तुळात कोणीच नव्हते. म्हणूनच बाबांच्या अंतिम दर्शनासाठी खूप मोठी गर्दी लोटली होती. ते गेल्यानंतर भेटायला येणाऱ्यांची जी रीघ लागली होती त्यात इमारतीत फारशी कोणामध्ये न मिसळणारी मंडळी, कोणाच्या अध्यातमध्यात नसणारे भाडेकरू, काहीसे आपल्याच जगात वावरणारे टीनएजर्स तर होतेच पण सोसायटीचे वॉचमन, कामवाल्या बायका, माळी, झाडूवाला, दूधवाला, पेपरवाला, धोबी, भाजीवाला, दुकानदार यांचीसुद्धा मोठी संख्या होती.

आज मागे वळून पाहताना वाटते बाबांचा पोटापाण्याचा व्यवसाय, लोकसंग्रह, शेवटपर्यंत हाऊसिंग सोसायटीची कामे पाहण्याची धडपड, परिसरातील बागेच्या स्वच्छतेची कळकळ, स्थानिक कार्यकर्त्यांच्या मागे लागून परिसराची कामे करून घेण्याची चिकाटी, खादीचा आग्रह, छंद, आवड, गांधीवादी विचार, त्याची अभिव्यक्ती, मित्रपरिवार, देहदान आणि जीवन मरणाकडे बघण्याची दृष्टी या सर्वात एक अखंडता, सुसूत्रता किंवा एक ताळमेळ होता. अरेच्चा! लेकीच्या त्या प्रश्नाचे उत्तर असे बाबांच्या जाण्याच्या निमित्ताने सापडायचे होते तर! तिने प्रश्न विचारल्यापासून कोणकोणते जीवनमूल्य मला आवडत असावे याचा विचार डोक्यात चालू होताच. येस्स. कॉनकॉर्ड! हो, विचरातील ताळमेळ हे माझे आवडते जीवनमूल्य असू शकते. चोवीस वर्षांच्या तुमच्या सहवासाने ते मला थोडेफार जरी अंगी बाणवता आले तरी भरून पावले बाबा!

बाबा; तुम्ही ऱ्हस्व-दीर्घ न सुधारून दिलेले हे पहिले लिखाण- तुमच्याविषयी आणि तुमच्याचसाठी! भाषेत काय किंवा आयुष्यात काय चुका दाखवून देणारा घरचा स्पेलचेक नसेल तर किती असुरक्षित वाटू शकते हेही तुमच्या जाण्यानेच शिकवले.
डॉ. अस्मिता हुद्दार – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader