सुहास जोशी
दुर्दैव आणि योगायोग हे दोन्ही शब्द एकत्र वापरणे संयुक्तिक ठरत नाही. पण दुर्दैवानेच असे घडते. अरुण सावंतचा कोकणकडा ट्रॅव्हर्स करताना दरीत पडून मृत्यू झाला ही बातमी ऐकल्यावर आठवला तो 1986 चा कोकणकड्यावरील भर पावसाळ्यातील एका ट्रेकरचा मृत्यू आणि त्याचा मृतदेह शोधण्यासाठी अरुणने केलेली धडपड.
1986 साली अनंत जनार्दन बर्वे याचा मृतदेह शोधणे आणि तो पायथ्याला आणणे हे काम अत्यंत कठीण होते. आज डोंगरातील अपघातप्रसंगी रेस्क्यूला जाताना बरीच साधनसामग्री असते, वॉकीटॉकीदेखील अनेकांकडे असतात. पण त्यावेळी यातले काहीच नव्हते. त्या रेस्क्यूचे आव्हान अरुणने स्वीकारले.
अरुणच्या तोंडून कोकणकडावरील या रेस्क्यूची सारी हकीकत 30 वर्षानंतर ऐकतानादेखील अंगावर काटा उभा राहीला होता. मर्यादित साधनसामग्री घेऊनच तो निघाला. त्यावेळी पोलिसांनी गिर्यारोहकांवरील विश्वासापोटी अरुणला वॉकीटॉकी वापरायला दिला होता. अरुणने मोठ्या हिकमतीने ती शोधमोहीम पार पाडली. आज त्याच कोकणकड्याच्या ट्रॅव्हर्सवर अरुणचा दुर्दैवी मृत्यु झाला.
2005 मध्ये आम्ही गिरिमित्र संमेलनासाठी 50 वर्षातील गिर्यारोहणातील घडामोडींच्या नोंदी करत होतो तेव्हा अरुणची भेट झाली. तसा तो माझ्यापेक्षा खूपच मोठा. मी आपलं नेहमीप्रमाणे सर वगैरे म्हणू लागलो पण पुढच्या वाक्यालाच ‘अरे तुरे हाक मार रे’, असे सांगून हे अंतर कमी केले.
अरुणची डोंगर भटकंती 75 पासूनच सुरू झाली होती. पुढे गिर्यारोहणाचा शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देखील त्याने घेतले होते. महाराष्ट्राच्या गिर्यारोहण क्षेत्रामध्ये नव्वदचे दशक हे खूप महत्वाचे आहे. 1955 पासून सुरु झालेल्या गिर्यारोहणाला मोठ्या प्रमाणात संस्थात्मक स्वरुप आल्याचा तो काळ. 1982-83 दरम्यान राज्यात गिर्यारोहणाच्या दहा संस्था स्थापन झाल्या आणि गिर्यारोहणाला प्रचंड चालना मिळाली. सुळके आरोहणाची सुरुवात 1978 पासूनच झाली होती. पण कृत्रिम प्रस्तरारोहणासाठी आवश्यक असणाऱ्या एक्सपान्शन बोल्टच्या मार्च 1983 मधील वापरानंतर सुळके आरोहणचे पेव फुटले.
अरुणने या तंत्राचे कौशल्य आत्मसात करत आरोहणाचा धडाकाच लावला. डिसेंबर 1983 मध्ये ‘केव्ह एक्सप्लोरर्स’ या संस्थेच्या माध्यमातून दिलिप झुंजारराव, रमाकांत महाडिक, अरुण सावंत, हिरा पंडित आणि दिलिप धुमाळ यांनी माहुलीतील भटोबा सुळक्यावर आरोहण केले. पाठोपाठ एप्रिल 1984 मध्ये नेचर लव्हर्स, हॉलिडे हायकर्स आणि केव्ह एक्सप्लोरर्स यांनी संयुक्तपणे सटाण्याजवळच्या तुंगी सुळक्यावर आरोहण केले. दिलिप झुंजारराव, हिरा पंडीत, अरुण सावंत, नरेन शेटिया, जगन्नाथ राऊळ यांचा या मोहिमेत समावेश होता.
अरुणची धडाडी पुढे सुरुच राहिली. हरिश्चंद्रगडाजवळचा शेंडी सुळका, कळकराय, भिव्याची काठी अशी आरोहणे सुरु झाली. पण त्याचा खरा मानाचा सुळका म्हणजे ड्यूक्स नोज.
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर बोर घाटातून वर जाताना अखेरच्या टप्प्यात उजवीकडे आकाशात घुसलेले एक सह्याद्रीचे टोक आभाळात घुसलेले दिसते. तोच ड्यूक्स नोज अर्थात नागफणीचा कडा. सुळके आरोहणात आत्तापर्यत याकडे फारसे लक्ष गेले नव्हते. अरुणला ड्यूक्स 1984च्या सप्टेंबरपासूनच खुणावत होता. ड्यूक्सच्या आरोहणासाठी केव्ह एक्सप्लोरर्सच्या त्याच्या चमूने 12 वेळा त्या परिसरात भटकंती केली. ड्यूक्सच्या पायथ्यापर्यंत पोहचण्यास तशी काही पायवाटदेखील नव्हती. मधमाशांचा धोकादेखील होताच. त्यामुळे शोधाशोध करण्यात तयारी मोहिमांमध्ये सात-आठ महिने गेले. अखेरीस 1985 च्या एप्रिलमध्ये मोहिमेची सुरुवात झाली. तब्बल 800 फूटाचे आरोहण. आरोहकांच्या जिद्दीने ही मोहिम यशस्वी झाली. अरुणच्या नावावर ड्यूक्सचे श्रेय कायमस्वरुपी कोरले गेले. त्यानंतर अनेकांनी अनेक प्रकारांनी ड्यूक्सवर आरोहण केले असेल, त्यांना अरुणने घालून दिलेली वाटच स्वीकारली.
नंतरच्या काळात अरुणने आरोहणापेक्षा अधिक लक्ष हे सह्याद्रीतील अनगड अशा ठिकाणांकडे वळवले. त्याचजोडीला रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंगचे नवनवे उपक्रम केले. पण या सर्वात विशेष म्हणजे त्याचा तरुण पिढीशी असलेला संपर्क. आमच्यावेळी असे नव्हते वगैरे दुढ्ढाचार्य घेतात तशी भूमिका न घेता त्याने नव्या पिढीशी स्वत:ला खूप छानपणे जुळवून घेतले. त्यांच्यासोबत अनेक उपक्रम केले. सह्याद्रीतील चढाईसाठी कठीण असणाऱ्या अलंग, मदन आणि कुलंग या किल्ल्यांची भटकंती त्याने केवळ 9 तास 39 मिनिटात वयाच्या 54 व्या वर्षी पूर्ण केली. त्यालादेखील आत्ता सात वर्षे झाली.
केवळ स्वतःचेच उपक्रम नाही तर तो अनेकांना मुक्त हस्ते मदत करायचा. नविन काही करणाऱ्यांना प्रोत्साहन द्यायचा.
अशाच अनोखेपणाच्या ओढीतून अरुणने कोकणकड्याच्या ट्रॅव्हर्सचा उपक्रम आखला. डिसेंबरच्या अखेरीस त्याच्या चमूने हा रुट स्वत: पूर्ण केला आणि आत्ता त्याच रुटवर आणखीन काही भटक्यांना घेऊन गेला होता.
सतत भटकणारा हा हाडाचा भटक्या आज सह्याद्रीच्या कुशीतच विसावला. एका सच्च्या डोंगरभटक्याची अखेर झाली. पण त्याचे ड्यूक्सवरचे आरोहण कौशल्य चिरंतन आहे.