नमस्कार,
माझं नाव शिवराज यादव….माझे वडील पोलीस आहेत. म्हणजे आता ते निवृत्त झालेत पण माझा भाऊ आणि बहिण पोलिसात आहेत. दोघंही कॉन्स्टेबल पदावर आहेत. हो तोच पोलीस ज्याला तुम्ही पांडू वैगेरे अशा अनेक नावांनी हाका मारता. ज्याच्याकडे तुम्हाला आदराने कधी पाहवंसंही वाटत नाही किंवा कधी आपुलकीने चौकशीही करावीशी वाटत नाही. असो तुम्ही ते करावं अशी माझी अपेक्षाही नाही. मी एक विनंती करण्यासाठी आज आलो आहे. तुम्हाला माहितीये की गेल्या काही दिवसांपासून आपल्या राज्यात करोना नावाचा शत्रू आला आहे. तेव्हापासून माझा भाऊ, बहीण आणि त्यांच्यासारखे इतर सगळेच पोलीस कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत.
पण खरं सांगू का त्यांच्यावर करोनाचा कमी आणि तुमच्यातल्या काही बेशिस्त नागरिकांचा जास्त ताण आहे. घऱातून बाहेर पडू नका सांगितलेलं असतानाही रस्त्यावर काही जण मोकळ्या रानात फिरायला निघाल्यासारखे भटकत असतात. ते ही काही विशेष काम नसताना आधीच पोलीस व्यवस्थेवर इतका ताण असताना हे असं वागणं कितपत योग्य तुम्हीच सांगा.
पोलीस वारंवार विनंती करुनही जर आपण ऐकणार नसू तर मग कोणत्या भाषेत पोलिसांनी सांगायचं. पोलिसांनी सगळा वेळ फक्त तुमच्या आणि तुमच्या गाड्यांच्या मागे धावण्यातच घालवायचा का ? संचारबंदी आहे… घरातून बाहेर पडायचं नाही इतकी साधी गोष्ट आपल्याला कळत नसेल तर नागरिक म्हणवून घेण्याचा आपल्याला काय हक्क आहे. राज्य सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी फक्त पोलिसांचीच आहे का ?
बरं पोलिसांना काही हौस नाही. तुम्हाला घरात राहण्याची जी संधी मिळाली आहे ती त्यांच्याकडे नाही. मनात कितीही असलं तरी ते तसं करु शकत नाहीत. माझ्या बहिणीला चार वर्षांचा मुलगा आहे…त्याच्याकडे बघून तिचा पाय घऱातून निघत असेल का ? आपल्याला करोनाची लागण होईल याची भीती तिला वाटत नसेल का ? जर मला काही झालं तर त्याचं पुढं काय होईल असा विचार तिच्या मनात येत नसेल का ? पण हे सगळं असतानाही ती कामावर जाते. नाक्यावर जेव्हा ती बंदोबस्ताला उभी असते तेव्हा असेच तुम्ही बाहेर पडत असाल तर तिने काय करावं…बरं ज्याला ती अडवत आहे त्याला करोनाची लागण झालेली आहे की नाही याची तिला माहितीही नाही. आणि जर तिला लागण झाली तर मग चुकी कोणाची ? मग नेमकं तुम्ही काय मिळवताय तरी काय घराबाहेर पडून.
माझा भाऊ तर माझ्यापेक्षा लहान आहे. नुकताच त्याचा संसार सुरु झाला आहे. त्याची बायको गर्भवती आहे. त्याच्या जागी जर तुम्ही असता तर आपल्या बायकोला या अवस्थेत सोडून घराबाहेर पडला असता का ? याउलट आपल्या बायकोपर्यंत विषाणू पोहोचू नयेत याची किती काळजी घेतली असती. या परिस्थितीमध्ये दुसरा एखादा असता तर तिच्या बाजूने हलला पण नसता. तिला काय हवं नको याची अधिक काळजी घेतली असती. पण पोलीस असणाऱ्या माझ्या भावाच्या नशिबात हे भाग्य नाही. तुमच्या सुरक्षेसाठी घराबाहेर पडणे हे त्याचं कर्तव्यच आहे. पत्नी गर्भवती आहे, संसर्गाची भिती आहे ही असली कारणं माझा भाऊ सांगू शकत नाही.
तो रोज सकाळी उठून कामावर जातो. बाहेर जाताना त्यालाही वाटत असेलच ना की आपण घरी थांबू. बरं घरी आल्यावर आपल्याला भेटलेल्यापैकी कोणाला लागण तर झाली नव्हती ना अशी भीतीही त्याला वाटत असेलच की. पण तरीही तुमच्या, माझ्या, आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटत आहेतच ना…
आता तर पोलीस कमी पडू नये म्हणून सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करुन त्यांना ड्युटीवर तैनात होण्याचे आदेश आले आहेत. बरं या सुट्ट्या रद्द झालेल्यांमध्ये सिक लिव्ह म्हणजेच आजारपणाची सुट्टी रद्द करण्यात आलेल्यांचाही समावेश आहे. म्हणजे साधं आजारपणही पोलिसांच्या नशिबात नाही. का तर तुम्ही निरोगी रहावं.
मग अशा परिस्थितीत त्यांची काय अपेक्षा आहे आपल्याकडून… एकच की आपण सगळ्यांनी घरात थांबावं. इतकी साधी गोष्टही आपण करु शकत नाही का? एरव्ही ऑफिसात असताना घरची आठवण येते ना, मग आता घरी राहायला मिळतंय तर बाहेर फिरायची इतकी का हौस. ज्याप्रमाणे तुमचं कुटुंब आहे त्याप्रमाणे त्या पोलिसांचंही आहे. त्यांनाही त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण देऊन मोठं झालेलं पहायचं आहे. त्यांनाही निवृत्त झाल्यानंतर सुखी आयुष्य जगायचं आहे…जशी आपली स्वप्नं आहेत तशी त्यांचीही आहेत. मग ती स्वप्न मोडण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला. आणि जर तुम्ही त्या स्वप्नांच्या आड येणार असणार तर मग पार्श्वभागावर दोन दांडके पडले तर काय चुकीचं.
तुम्ही म्हणत असाल एवढं काय काम करतात पोलीस….नाक्यावर खुर्च्या लावून आरामशीर बसलेले असतात. पण खरं सांगतो एकाच जागी २४ तास बसून दाखवा. सिग्नलला त्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या जागी फक्त एक दिवस त्या उन्हात, प्रदूषण, कानाचे पडदे फाडणारं ते ट्राफिक सहन करुन दाखवाच. तुम्हाला नुसतं घरात बसून कंटाळा आला आहे, ते तर तिथं बाहेर रस्त्यावर पाऊस, ऊनाच्या झळा सहन करत बसलेले असतात. तुम्हाला त्या पोलीस हवालदाराच्या हातातली काठी दिसते पण त्याच्यातला माणूस शोधण्याचा कधी प्रयत्न केला का तुम्ही ?
करोनामुळे सुरु असलेला हा बंदोबस्त अजून किती दिवस महिने चालणार आहे माहिती नाही. बरं सुदैवाने हे लवकर संपलं तरी मग इतर बंदोबस्त आहेतच. मग सण येतील आणि आपण जे झालं ते सगळं विसरुन घराबाहेर पडू. कुटुंबासोबत मस्तपैकी धम्माल करु. पण तुम्ही हे सगळं करत असताना रस्त्याच्या पलीकडे एक पोलीस कर्मचारी नक्की बंदोबस्तासाठी उभा असेल.
मुलाच्या हातात जेव्हा बापाचा हात असतो ना तेव्हा त्याला जगात कशीचीच भीती वाटत नाही. पण दुर्दैवाने आम्हा पोलिसांच्या मुलांच्या आयुष्यात तो क्षण कधी येतच नाही. आमच्या बापाचा हात रात्री झोपल्यावर डोक्यावर फिरतो तोच….
बघा विचार करा..मी पोलिसांचं आयुष्य जवळून पाहिलं आहे. तुम्ही ते पाहिलेलं नाही. पण किमान ते आयुष्य सुखी राहील इतकी तर काळजी आपण घेऊच शकतो. शेवटी कर्तव्य आपलंही आहेच.
(तुमच्या प्रतिक्रिया shivraj.yadav@loksatta.com या ईमेल आयडीवर पाठवू शकता)