बर्मिंगहॅमच्या कसोटीत पराभव स्विकारावा लागल्यानंतर लॉर्ड्सच्या मैदानात भारतीय संघावर डावाने पराभव स्विकारण्याची नामु्ष्की आली. १ डाव आणि १५९ धावांनी विजय मिळवत इंग्लंडने ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्या तेजतर्रार माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली. दुसऱ्या कसोटीत भारतीय सलामीवीरांनी केलेली खराब कामगिरी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलेली आहे. मात्र यासर्वांमध्ये संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेचा ढासळलेला फॉर्म हा भारतीय संघासाठी अधिक चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर अजिंक्य रहाणेची शैली चर्चेचा विषय बनली होती. मुंबई क्रिकेटमध्ये खेळत असताना घोटवून घेतलेलं तंत्र, मैदानावर तळ ठोकून चिवट खेळी करण्याची क्षमता यासारख्या गुणांमुळे अजिंक्यची तुलना राहुल द्रविडशी व्हायला लागली. अजिंक्यनेही आपल्या मुंबईकर खडूस खेळीला जागत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडायला सुरुवात केली. त्याच्या खेळीची दखल घेऊन भारतीय संघाचं उप-कर्णधारपद अजिंक्यला बहाल करण्यात आलं. मात्र गेल्या काही सामन्यांमधे अजिंक्यचा ढासळलेला फॉर्म भारतीय संघासाठी चिंतेचा विषय बनला आहे. एक मराठी खेळाडू म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला अजिंक्यबद्दल मनात एक सॉफ्ट कॉर्नर आहे. तसं असण्यामध्ये काही वावगं नाही, पण आपला अजिंक्य त्याची नेहमीची लय हरवून बसला आहे हे मान्य करायलाच हवं.
२०१६ ते २०१८ या वर्षातील अजिंक्यची कसोटी क्रिकेटमधली कामगिरी आपण बघितली तर आकडे फारशे चांगले नाहीत.
३० जुलै २०१६ – वेस्ट इंडिज – (नाबाद १०८ धावा)
८ ऑक्टोबर २०१६ – न्यूझीलंड – (१८८ धावा)
३ ऑगस्ट २०१७ – श्रीलंका – (१३२ धावा)
२०१६ ते आतापर्यंतच्या काळात अजिंक्य अंदाजे ३९ कसोटी सामने खेळला आहे, या कसोटींमध्ये अजिंक्यने केवळ ३ शतकं झळकावली आहेत. २०१८ साली भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अजिंक्यने केलेली ४८ धावांची खेळी ही त्याची या वर्षातली सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. याखेरीज २०१७ नंतर अजिंक्यला कसोटी क्रिकेटमध्ये एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाहीये. आता या आकडेवारीवर काही जणं, इतर खेळाडू तरी कुठे चांगलं खेळतायत असा प्रतिवाद करु शकतील. मात्र एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे या घडीला अजिंक्यची कोणत्याही खेळाडूशी तुलना करणं योग्य ठरणार नाही. इंग्लंड दौऱ्यात विराट कोहलीचा अपवाद वगळता एकही फलंदाज चांगली कामगिरी करु शकलेला नाही. मात्र मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा यासारखे फलंदाज किमान घरच्या मैदानावर धावा काढत आहेत, पण अजिंक्यच्या बाबतीत ही गोष्ट घडत नसल्यामुळे चिंतेचा विषय आहे.
अजिंक्यच्या शैली आणि त्याच्या क्षमतेबद्दल कोणाच्याही मनात प्रश्न नसावा. खुद्द कर्णधार विराट कोहलीने अजिंक्यला आपला पाठींबा दर्शवला आहे. मग पाणी नेमकं मुरतंय तरी कुठे? अजिंक्यच्या बॅटमधून येणारा धावांचा ओघ का आटलाय?? २०१७ सालपासून एकही शतक न झळकावता संघात आपली जागा कायम राखणं ही गोष्ट सोपी नाही. संघाचा उप-कर्णधार या नात्याने अजिंक्य पुढची काही वर्षही कसोटी संघात आपली जागा कायम राखेल. मात्र असा चाचपडणारा अजिंक्य आपल्याला पहायचा आहे का? मला वाटतं कोणताही सुजाण चाहता या प्रश्नाचं उत्तर नाही असंच देईल. मग अजिंक्यचा फॉर्म परत येण्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआय काही ठोस निर्णय का घेत नाही.
भारताचे अनेक माजी क्रिकेटपटू, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला फॉर्म गमावल्यानंतर स्थानिक क्रिकेट खेळलेले आहेत. भारतीय संघाकडून खेळत असताना आपला खेळ मनासारखा होत असेल तर एखाद्या खेळाडूला निवड समिती स्थानिक क्रिकेट खेळण्याचा सल्ला देते. आपलं हरवलेला फॉर्म परत मिळवणं आणि आपलं तंत्र पुन्हा एकदा घोटवून घेणं यासाठी स्थानिक क्रिकेट हा उत्तम पर्याय आहे. मग हा पर्याय अजिंक्य रहाणे का निवडत नाही?? भारतीय क्रिकेट संघाचं वेळापत्रक हे व्यस्त आहे. एक दौरा आटोपल्यानंतर संघ लगेच पुढच्या दौऱ्यासाठी रवाना होतो, अशावेळी अतिक्रिकेटमुळे एखाद्या खेळाडूचा फॉर्म हरवणं साहजिक गोष्ट आहे. २०१७ च्या रणजी हंगामात मुंबईच्या निवड समितीने अजिंक्यला मुंबईकडून खेळण्याबद्दल विचारणा केली होती. मात्र अजिंक्यने यावेळी आपण उपलब्ध नसल्याचं कळवलं होतं. यानंतर अजिंक्य मुंबईकडून अवघा १ सामना खेळून परत भारतीय संघात दाखल झाला. त्यामुळे म्हणावा तसा सराव किंवा हवा असलेला आराम अजिंक्यला मिळाला आहे का याबाबत प्रश्नचिन्हंच निर्माण झालेलं आहे?
उहाहरणासाठी एक गोष्ट सांगतो, २०१६ साली इंग्लंडच्या भारत दौऱ्यात करुण नायरने चेन्नई कसोटीत नाबाद ३०३ धावांची खेळी केली होती. मात्र या सामन्यानंतर करुण नायर हवीतशी कामगिरी करु शकला नाही. पाचव्या कसोटीनंतर करुण नायर सतत अपयशी ठरत गेला. परिणामी करुणला आपलं संघातलं स्थान गमवावं लागलं. यानंतर पत्रकारांशी बोलत असताना करुणने आपण चुकीच्या वेळी अपयशी ठरल्याचं मान्य केलं. यानंतर करुणने भारत अ आणि स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्याला पसंती देत भारतीय संघातलं आपलं स्थान मिळवलं. मात्र असं असलं तरीही करुण नायरला अंतिम ११ मध्ये स्थान मिळवता आलेलंच नाहीये. सध्याच्या घडीला मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, करुण नायर सारखे खेळाडू धडाकेबाज कामगिरी करत असताना अजिंक्य रहाणेचं असं सतत अपयशी होणं नक्कीच चांगली गोष्ट नाही.
सध्याचं भारतीय संघातलं स्थान पाहता अजिंक्यला संघातलं आपलं स्थान गमवावं लागेल अशी परिस्थिती नाही. मात्र पुढच्या काही सामन्यांमध्ये असचं चित्र राहिलं तर कधी होत्याचं नव्हतं होईल याचा अंदाज देता येत नाही. त्यामुळे भारतीय उप-कर्णधाराने रात्र वैऱ्याची आहे हे लक्षात घ्यायला हवं. मैदानात चाचपडणारा अजिंक्य पाहणं त्याच्या कोणत्याही चाहत्याला आवडणार नाही. एक चांगला फलंदाज याव्यतिरीक्त स्लिपमध्ये हक्काचा खेळाडू, कोहलीच्या अनुपस्थितीत संघाचं नेतृत्व करणारा कर्णधार अशा अनेक जबाबदाऱ्या रहाणेच्या खांद्यावर आहेत. मात्र या सर्व जबाबदाऱ्या निभावताना आमचा जुना अजिंक्य हरवू नये हीच अपेक्षा, आम्ही वाट पाहतोय तुझ्या त्याच जुन्या आणि बहारदार खेळीची.
- आपल्या प्रतिक्रीया prathmesh.dixit@indianexpress.com या इमेल आयडीवर पाठवा