– रवि पत्की

काल आयपीएलच्या अंतिम सामन्याचा शेन वॉटसनने मिसाईल लॉंचिंग कार्यक्रम बनवला. मिसाईल लाँचर ज्याप्रमाणे एका जागेवर उभे असते आणि अतिवेगाने क्षेपणास्त्र सोडते तसेच वॉटसनने एका जागेवरून प्रेक्षकात क्षेपणास्त्रे सोडली. उत्तर कोरियाचा क्षेपणास्त्रवेडा सम्राट किम जोंग वॉटसनवर भुलून त्याला शोधत फिरला तर आश्चर्य वाटायला नको.

जमेच्या बाजूनेच हैदराबादला दगा दिला:

संपूर्ण आयपीएल मध्ये हैदराबादच्या गोलंदाजांनी बोलबाला तयार केला होता.छोट्या छोट्या धावसंखयांचे त्यांनी लिलया संरक्षण केले होते. त्या पार्श्वभूमीवर हैदराबादला खूप धावा करण्याची गरज नाही असे वातावरण त्यांच्या चाहत्यांत आणि क्रिकेट वर्तुळात सुद्धा तयार झाले होते. त्याचा त्यांच्या फलंदाजांच्या शीघ्रतेवर परिणाम झाला का हा महत्वाचा विषय आहे.तसेच पहिल्या पाच षटकानंतर रशीद खान सोडून हैद्राबादने केलेली गोलंदाजी व्यावसायिक नक्कीच नव्हती.वेग बदल, लाईन अँड लेंग्थ वगैरे सगळे मूलभूत नियम हैद्राबादचे गोलंदाज विसरले.वॉटसन इतका बेफाम खेळला की गोलंदाज काही करू शकले नाहीत असे म्हणणे ही पळवाट झाली. पायाचा स्नायू दुखावलेल्या वॉटसनला विशेष पाय न हलवता जागेवरून बॅट फिरवून निवांत षटकार मिळत होते यावरून हैद्राबादच्या गोलंदाजांना अंतिम सामन्याचा तणाव आला होता असे वाटण्यास वाव आहे.केन विलीअमसनने काहीही वेगळे डावपेच वापरले नाहीत.तो पण साचेबद्ध विचार करत राहिला किंवा वॉटसन च्या वादळामुळे त्याचे विचारच थांबले.

वॉटसनने अनुभव पणाला लावला:

शेन वॉटसन हा तगडा अष्टपैलू खेळाडू पण त्याने त्याच्या क्षमतेला न्याय दिला नाही असे ऑस्ट्रेलियात लोक मानतात. कालच्या सामन्यात त्याने अनुभवातून आलेला आणि काही अंशी ऑस्ट्रेलियन स्वभावात असलेला चिवटपणा दाखवला.पहिल्या दहा चेंडूत एकच धाव काढता आली,पायाचा स्नायू दुखावला तरी विकेट टाकून मोकळे न होता त्याने संधीची वाट पाहिली.2015 च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानच्या वहाब रियाझने वॉटसनला अफाट वेगात टाकलेल्या बाऊन्सर्सने सळो की पळो केले होते.त्या परिस्थिती सुद्धा चेंडू अंगावर,हेल्मेटवर घेत तो उभा राहिला आणि सामना जिंकला.काल त्या सामन्याची आठवण झाली.

खेळपट्टी जलद झाली होती:

भुवनेश्वरने टाकलेल्या पहिल्या तीन षटकात खेळपट्टीने रात्री नूर बदलल्याचे जाणवले. जलद झालेल्या खेळपट्टीवर थ्रू द लाईन फटके मारणे सोपे झाले.अशा परिस्थिती हैदराबाद गोलनदाजांची विविधता कमी पडली.हैदराबादचे गोलनदाज खेळपट्टी संथ होईल आणि रशीद,शाकीब फायदा उठवतील या आशेवर होते.

धोनीचे आर अँड डी लाजवाब:

धोनी ज्या प्रकारे खेळाडूंची पारख करतो हा अभ्यासाचा स्वतंत्र विषय आहे.बंगलोरलने सोडलेल्या वॉटसनला आणि मुंबईने सोडलेल्या रायडूला धोनी पकडतो काय आणि हे दोघे आयपीएलचे विजयाचे शिल्पकार ठरतात काय !!परिसस्पर्श म्हणजे हाच बहुतेक.

ओ. टी. लोक आणि टी ट्वेन्टी:

1983 च्या विश्वचषक विजयानंतर बिशन सिंग बेदीने ओव्हर थर्टी (ओ. टी).खेळाडूंना डच्चू द्यावा अशी मोहीम छेडली होती.नंतर भारताने तीन मोठ्या स्पर्धा जिंकल्या.तेव्हा गावस्कर,मोहिंदर, बिन्नी,मदनलाल यांनी बेदीला उत्तर म्हणून फ्रॉम ओ टी टू बेदी विथ लव या शीर्षकाखाली एक फोटो काढला होता.चेन्नईने नऊ खेळाडू ओ. टी. असून सुद्धा टी ट्वेन्टी जिंकता येते हे दाखवून दिले. क्रिकेट मध्ये एकच गोष्ट निश्चित असते ती म्हणजे अनिश्चितता हे वारंवार सिद्ध होते.

– रवि पत्की
sachoten@hotmail.com

Story img Loader