वाट पाहूनी जीव शिणला, दिसा मागूनी दिस सरला….भारतीय हॉकी प्रेमींची अवस्था सध्या अशीच काहीशी झालेली आहे. ओडीशातील भुवनेश्वर शहरात सुरु असलेल्या हॉकी विश्वचषकात भारताचं आव्हान अखेर काल संपुष्टात आलं. उपांत्यपूर्व सामन्यात नेदरलँडने भारतावर २-१ अशी मात करुन उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं. १९७५ साली भारताने आपला पहिला आणि अखेरचा विश्वचषक जिंकला होता. एक काळ हॉकीवर आपली सत्ता गाजवणाऱ्या भारताची साधारणपणे याच कालखंडानंतर उलटी वाटचाल सुरु झाली. ध्यानचंद यांच्या काळात हक्काने सुवर्णपदक मिळवणारा भारतीय हॉकी संघ गेल्या काही वर्षांमध्ये कसाबसा ऑलिम्पिक पात्रतेची स्वप्न पाहू लागला आहे. देशातील क्रीडा संघटनांचं राजकारण, प्रशिक्षकांची सतत होणारी बदली आणि काळानुरुप खेळामध्ये न झालेले बदल या गोष्टींमुळे भारत आज हॉकीमध्ये पिछाडीवर पडला आहे.

भारतात उत्तरेकडील काही राज्यांचा अपवाद वगळला तर हॉकी खेळणारी राज्य तुम्हाला सापडणार नाहीत. गेल्या काही दिवसांमध्ये तर भारतीय हॉकीचा कारभार हाकणारी हॉकी इंडिया ही संस्था तर नेहमी चुकीच्या गोष्टींसाठीच चर्चेत राहिली आहे. प्रत्येक महत्वाच्या स्पर्धेत भारतीय संघ पराभूत झाल्यानंत, आमचा संघ संपूर्ण जोशानिशी खेळला, पुढच्या वेळी आम्ही अधिक चांगली मेहनत करुन मैदानात येऊ असं घासून गुळगुळीत केलेलं वाक्य ऐकायला मिळतं. पण काळानुरुप हॉकीमध्ये होणारे बदल, खेळामध्ये तंत्रज्ञानाचा वाढलेला वापर पाहता भारतीय हॉकीची ‘पुढच्या वेळी नक्की…’ कधी येणार आहे हे देवच जाणो.

यंदाच्या वर्षात भारतीय हॉकी संघाच्या कामगिरीचा एकंदरीत आढावा घेतला तर अवसानघातकी हा एकच शब्द योग्य ठरेल. सर्वात प्रथम रोलंट ओल्टमन्स यांची हकालपट्टी करत हॉकी इंडियाने महिला संघाचे प्रशिक्षक जोर्द मरीन यांना पुरुष संघाचं प्रशिक्षकपद दिलं. मरीन यांची कारकिर्द अवघ्या २-३ महिन्यांची झालेली असताना त्यांना राष्ट्रकुल स्पर्धेतील खराब कामगिरीचा फटका बसला. हॉकी इंडियाने मरीन यांची पुन्हा महिला संघाच्या प्रशिक्षकपदी नेमणूक करत हरेंद्रसिंह यांना प्रशिक्षकपद दिलं. मिळालेल्या माहितीनुसार संघातील काही खेळाडूंची मरीन यांच्या नावाला विरोध होता. यानंतर हरेंद्रसिंह भारताने प्रशिक्षक म्हणून आले, मात्र त्यांच्या कारकिर्दीतही भारताची निराशाजनक कामगिरी सुरुच राहिली. नेदरलँडच्या ब्रेडा शहरात झालेल्या हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीती रौप्य पदकाचा अपवाद वगळता भारतीय हॉकी संघ आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवू शकला नाही.

आता प्रशिक्षकांची बदल ही बाब संघाच्या खराब कामगिरीसाठी कशी कारणीभूत ठरु शकेल असं कोणालाही वाटणं साहजीक आहे. मात्र आंतरराष्ट्रीय हॉकीने आता कात टाकली आहे. युरोपियन देशांमध्ये लीग सामने खेळणारे संघही प्रगत तंत्रज्ञानाचा खेळात वापर करतात. नवीन रणनिती, प्रतिस्पर्ध्याचा बचाव भेदण्याचं तंत्र या सर्व गोष्टींची परिमाण आता बदलली आहेत. उदाहरणार्थ, नेदरलँड विरुद्ध भारत सामन्यातील भारत एक उदाहरण घेऊया, नेदरँलडच्या खेळाडूंचे पॉईंट टू पॉईंट पास हे भारतासाठी डोकेदुखी ठरले. कारण नेदरलँडच्या फटक्यांमध्ये ताकद होती. एका खेळाडूने दिलेला पास हा तितक्याच वेगाने दुसऱ्या खेळाडूकडे पोहचत होता, आणि समोरचा खेळाडू त्यावर नियंत्रणही ठेवत होता. मात्र भारतीय खेळाडूंनी दिलेल्या पासमध्ये ताकदीचा अभाव दिसून आला. एका खेळाडूने दिलेला पास हा दुसऱ्या खेळाडूपर्यंत पोहचेपर्यंत नेदरलँडचा बचावपटू तो बॉल इंटरसेप्ट करतो. मात्र ज्यावेळी भारतीय खेळाडूंच्या फटक्यांमध्ये ताकद येते त्यावेळी ते पास दिशाहीन असतात.

पेनल्टी कॉर्नरवर गोल करणं ही भारताची नेहमीची डोकेदुखी ठरली आहे. यासाठी हॉकी इंडीयाने ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ख्रिस सिरीलोची प्रशिक्षक म्हणून नेमणूक केली. पण प्रत्यक्ष मैदानात ड्रॅगफ्लिकींचं काम हे खेळाडूंना करायचं आहे, त्यासाठी प्रशिक्षक थोडी मैदानात येणार आहेत? बरं विश्वचषकासारख्या महत्वाच्या स्पर्धेत भारताने रुपिंदरपाल सिंह या हुकुमाच्या एक्काला संघाबाहेर बसवलं. याचं कारण शेवटपर्यंत कोणालाही समजलं नाही. हरमनप्रीत सिंह हा उमदा खेळाडू आहे, मात्र त्याच्या फटक्यांचा अंदाज हा समोरचा गोलकिपर सहज लावतो. ड्रॅगफ्लिक करताना पेनल्टी एरियातलं सिंगल बॅटरी-टू बॅटरी कॉम्बिनेशन, परिस्थितीनरुन खेळाडूंची जागा बदलणं, डमी शॉट्स क्रिएट करणं या सर्व बाबींमध्ये वैविध्य आणणं भारताला गरजेचं आहे. जर एकाच पठडीतले फटके खेळाडू खेळत राहिला तर समोरच्या खेळाडूला त्याचा अंदाज येतो, आणि संपूर्ण स्पर्धेत भारताला याचाच फटका बसला आहे.

नेदरलँडविरुद्ध सामना झाल्यानंतर भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्रसिंह यांनी सदोष पंचगिरीला दोष दिला. त्यांच्या दाव्यामध्ये तथ्य असलं तरी ही सबब देणं योग्य ठरणार नाही. हॉकीमध्ये पंचांचं काम हे खऱ्याअर्थाने अवघड असतं. गोल करण्याची धडपड सुरु असताना स्टिक चेक, चेंडू कोणत्या खेळाडूच्या पायाला लागला आहे की नाही यासारख्या अनेक तांत्रिक गोष्टींवर लक्ष ठेवणं. तसेच कोणता खेळाडू नियमांचं भंग करत असेल तर त्याला ताकीद देणं अशी कामं पंचांना करावी लागतात. अशावेळी काही चुका होणं हे अपेक्षितच असतं, याच कारणासाठी तिसऱ्या पंचांची मदत हॉकीच्या सामन्यांमध्ये उपलब्ध असते. पण पंचांना दोष देण्याऐवजी आपण खेळ सुधारला तर बिघडतंय कुठे?? फक्त या गोष्टी करणार कोण आणि कधी हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

एक संघ आणि भारंभार प्रशिक्षक, असताना खेळाडूंच्या कामगिरीवर त्याचा चांगला परिणाम होईल अशी अपेक्षाच करणं चुकीचं आहे. ही परिस्थीती गोंधळ निर्माण करतो. संघ खराब खेळला की बदलं प्रशिक्षक यासारख्या कारनाम्यांनी कोणत्याही संघाची घडी व्यवस्थित बसणार नाही. संघाला स्थैर्य आणण्यासाठी एका योग्य व्यक्तीला किमान २-३ वर्षांसाठी संघाची जबाबदारी देणं गरजेचं आहे. याच बेफिकीर कारभारामुळे भारतीय हॉकी संघाला आशियाई खेळांमध्ये मलेशियाकडून हार पत्करावी लागली. जी स्पर्धा भारताला हक्काचं ऑलिम्पिक तिकीटं मिळवून देते, त्याच स्पर्धेत भारतीय संघ तोंडावर आपटला. याचसोबत जर विश्वचषकात चांगली कामगिरी झाली नाही तर कठोर निर्णय घ्यावा लागेल असं हॉकी इंडियाने याआधी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकातली खराब कामगिरी पाहता कोणत्या न कोणत्या प्रशिक्षकाला आपलं पद गमवावं लागले अशी दाट शक्यता आहे. पण वेळेतच ही परिस्थिती बदलली नाही, तर भारतीय हॉकीची आणि त्यांच्या प्रेक्षकांची वाट पाहतं राहणं निरंतर काळासाठी सुरुच राहिलं एवढं मात्र नक्की!!

Story img Loader