जय पाटील
जरा वेडेपणाच वाटेल, पण असं घडलं आहे खरं! इंग्लंडमधल्या ‘चायवाला’ नावाच्या रेस्टॉरन्टने समोसा अवकाशात पाठवण्याची आपली मोहीम अवघ्या तीन प्रयत्नांत यशस्वी करून दाखवली आहे.

मानवाने अवकाशात यानं पाठवली, विविध प्राणी पाठवले, त्याने स्वतङ्मही अवकाशवाऱ्या सुरू केल्या. पण नुकत्याच हाती घेण्यात आलेल्या या मोहिमेत समोसा अवकाशात पाठवण्याचा प्रयत्न करण्यात आला. कोविडमुळे निर्माण झालेल्या निराशाजनक वातावरणात थोडीशी गंमत करण्याच्या विचाराने समोसा अवकाशात पाठवण्याचा घाट घालण्यात आल्याचं हा प्रयोग करणारे चायवाला रेस्टॉरन्टचे मालक निरज गाधेर यांनी यूपीआय या वृत्तसंकेतस्थळाला सांगितलं. ‘पूर्वी एकदा मी गमतीने म्हटलं होतं की मी समोसा अवकाशात पोहोचवेन. आता साथीमुळे निर्माण झालेल्या कंटाळवाण्या वातावरणात

लोकांना हसण्यासाठी निमित्त मिळवून देण्याचा प्रयत्न करावा असं वाटलं आणि हा प्रयोग केला.’
समोशाला अवकाशात पाठवण्यासाठी त्यांनी हेलियमच्या फुग्यांचा वापर केला. पहिले दोन प्रयत्न फोल ठरले. पहिल्या वेळी फुगा त्यांच्या हातातून निसटला आणि उडून गेला. दुसऱ्या वेळी फुग्यातला हेलियम वायू अपुरा ठरला. पण तिसºया प्रयत्नात ते समोसा अवकाशापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाले.

गाधेर यांनी आणि त्यांच्या मित्राने गोप्रो कॅमेरा आणि जीपीएस ट्रॅकरच्या साहाय्याने फुग्याचा माग घेतला. फुगा सोडल्यानंतर काही वेळातच त्याचा जीपीएसशी असलेला संपर्क तुटला. तिसरा प्रयत्नही फोल ठरणार अशा निष्कर्षाप्रत ते पोहोचत असतानाच संपर्क पुन्हा प्रस्थापित झाला. समोसा अवकाशात तर गेला पण दुसºयाच दिवशी तो फ्रान्समध्ये एका शेतात कोसळल्याचं स्पष्ट झालं. शोध घेतला असता समोसा आणि त्याचं रॅपर गायब झालं होतं. समोसे तिथल्याच प्राणी-पक्ष्यांनी खाल्ले असावेत, असा गाधेर यांचा कयास आहे. समोसा कोसळला असला, तरी गाधेर यांची मोहीम मात्र यशस्वी झाली. लोकांमध्ये याविषयी धम्माल चर्चा रंगल्या.