स्वाती वेमूल

वर्गातला एखादा अत्यंत हुशार मुलगा, जो परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत असेल, ज्याला शिक्षकांकडून सतत कौतुकाची थाप मिळत असेल तरीही अशा मुलाने अचानक एके दिवशी आत्महत्या केल्याची खबर कानावर आली तर मनात कसं धस्सं होतं. सगळंच तर चांगलं चाललं होतं, मग इतकं टोकाचं पाऊल का उचललं, का अशा पद्धतीने जगाचा निरोप घेतला, असे प्रश्न डोक्यात घोंघावू लागतात. तसंच काहीसं आज झालंय. अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याची बातमी कानावर पडल्यापासून एकच प्रश्न सतत सतावतोय, तो म्हणजे का?

शून्यातून सगळं निर्माण करणं काय असतं, हे सुशांतकडे पाहून सहज स्पष्ट होतं. अनेकदा मुलगा अभ्यासात हुशार असला की इंजीनिअरिंग, डॉक्टर अशा क्षेत्रात त्याने करिअर करावं असं पालकांना वाटत असतं. सुशांतनेही इंजीनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला. मात्र अभ्यासात अत्यंत हुशात असूनही कॉलेजच्या दुसऱ्याच वर्षी इंजीनिअरिंग सोडून अभिनयाची वाट धरण्याचं धाडस त्याने केलं. नृत्याची आवड तर सुरुवातीपासूनच होती. त्याला मनापासून जे काम करायची इच्छा होती, ते तो करू लागला. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेपासून त्याचं अभिनय, त्याचं काम मी पाहत आले. ‘मानव’च्या भूमिकेतला सुशांत आजही डोळ्यांसमोर स्पष्ट उभा राहतो. किती सहज अभिनय करत त्याने हे पात्र रंगवलं होतं. मालिका सुरू झाल्यानंतर चार वर्षांतच सुशांतला बॉलिवूड चित्रपटाची ऑफर मिळाली. अभिनय कौशल्याच्या जोरावर, मेहनतीच्या जोरावर त्याने हे साध्य केलं होतं. छोट्या पडद्यावरचा अभिनेता रुपेरी पडद्यावर यशस्वीरित्या आपली कामगिरी करु शकतो, हे सुशांतकडे पाहून कोणीही सहज मिळेल. ‘काई पो चे’ या पहिल्याच चित्रपटात सुशांतची वाहवा झाली. त्याच्यावर पुरस्कारांचा पाऊस पडू लागला. करिअरची सुरुवातसुद्धा चांगली झाली, मोठमोठे ऑफर्स मिळू लागले, मध्यंतरी ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’ यांसारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजले नाहीत पण त्यानंतर आलेल्या ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाने सर्वांनाच वेड लावलं. मग सगळं काही चांगलं सुरू असताना आत्महत्या का?

सुशांतच्या आत्महत्येच्या वृत्तानंतर एक विचार मनात सारख घोळत होता. तो म्हणजे फक्त व्यावसायिक पातळीवर, करिअरमध्ये सर्वकाही चांगलं असणं आयुष्यासाठी पुरेसं नसतं. परीक्षेत चांगले गुण कसे मिळवायचे, करिअर कसं घडवायचं, नोकरीत पुढे कसं जायचं हे सगळं आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला शिकवलं जातं. पण हे सगळं करताना स्वत:ला कसं खूश ठेवायचं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद कसा शोधायचा, अपयश आलं तरी खचून जायचं नाही हे फारसं कोणी शिकवताना दिसत नाही. सुशांतच्याही बाबतीत हीच गोष्ट अधोरेखित होताना दिसतेय. काही महिन्यांपूर्वी त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवरचे सर्व फोटो अचानक डिलिट केले होते. यामागचं नेमकं कारण कधीच समोर आलं नाही. पण त्याच्या खासगी आयुष्यात काहीतरी उलथापालथ होत होती याची कल्पना आली होती.

‘छिछोरे’ या चित्रपटातून सुशांतने तरुणाईला मोलाचा संदेश दिला होता. या चित्रपटात त्याचा मुलगाच अपयशाला खचून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो आणि अपयशाने खचून न जाता जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून कसं बघायचं हे तो मुलाला शिकवतो. मग स्वत:च्याच भूमिकेतून सुशांतने प्रेरणा का नाही घेतली? किंवा मग त्या भूमिकेपलीकडे असलेल्या व्यक्तीला खऱ्या आयुष्यात नैराश्याला सामोरं कसं जायचं, हे कोणीच सांगितलं नाही का?

एक-दोन दिवसांनी कदाचित आत्महत्येचं खरं कारणंही समोर येईल. त्यात मग नैराश्य असेल किंवा मग आणखी काही…पण तू जाताना आम्हाला विचार करायला लावलेला प्रश्न मात्र डोक्यातून जाणार नाही, तो म्हणजे का? आपल्याच चित्रपटांतून प्रेक्षकांना प्रेरणा देणाऱ्या सुशांतने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं? हे आयुष्य खरंच इतकं कवडीमोल आहे का?

swati.vemul@indianexpress.com