सध्या महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना सत्ता कधी स्थापन करणार, मुख्यमंत्री कोण होणार आणि ऋषभ पंत फॉर्मात कधी येणार हे प्रश्न अनुत्तरित आहे. कदाचित महाभारतातला यक्षही याचं उत्तर देऊ शकणार नाही. २०१९ साली विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत भारतीय संघ पराभूत झाला आणि निवड समितीने पहिल्यांदाच धोनीचा बाजूला करत ऋषभ पंत हा आगामी स्पर्धांमध्ये भारताची पहिली पसंती असेल असं जाहीर केलं. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे धोनीच्या जाण्यानंतर ज्या-ज्या सामन्यात ऋषभ पंतला संधी देण्यात आली आहे, त्या-त्या सामन्यात ऋषभने निराशाच केली आहे. ऋषभ पंत हा प्रतिभावान खेळाडू असला तरीही सध्या त्याचं अपयश हे डोळ्यात भरणारं आहे. सोशल मीडियावरही सध्या ऋषभ पंत हटाव ही मोहीम जोरात सुरु आहे. पण पंतचं अपयशी होण्याला नेमकं कोण जबाबदार आहे, या प्रश्नाचा शोध घ्यायलाच हवा.

महेंद्रसिंह धोनी हा भारतीय संघाचा आतापर्यंतचा सर्वोत्तम यष्टीरक्षक आहे, असं विधान केलं तरीही ते वावगं ठरु नये. यष्टींमागची त्याची चपळाई, स्टम्पिंगदरम्यान विजेच्या वेगाने चालणारे हात, चेंडूचा टप्पा कुठे ठेवायचा इथपासून गोलंदाजाला दिलेले सल्ले ते DRS चा निर्णय घेताला लावलेला अचूक अंदाज यासाठी धोनी मशहूर होता. मात्र धोनी हा माणूस असून कोणत्याही प्रकारचं यंत्र किंवा देव नाही ही गोष्ट भारतीय निवड समिती आणि चाहते नेहमी विसरत आले. कोणताही सांघिक खेळ असो आणि खेळाडू कितीही मोठा असो त्याचा उत्तराधिकारी वेळेत तयार करणं हे निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाचं काम असतं. मात्र महेंद्रसिंह धोनीच्या Lager than Game च्या इमेजमुळे भारतावर सध्या ही वेळ ओढावलेली आहे.

२०१७ साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अंतिम फेरीत भारताला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला. याच काळात धोनीची फलंदाजी संथ होत चालली आहे अशी चर्चा चाहत्यांमध्ये आणि प्रसारमाध्यमांमध्ये सुरु झाली होती. यानंतर विंडीज दौऱ्यासाठी निवड समितीने ऋषभ पंतला संघात स्थान दिलं. मात्र विंडीजमधील एकाही सामन्यात ऋषभ पंतला अंतिम ११ जणांच्या संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. निवड समितीचं हे पहिलं चुकलेलं पाऊल ठरलं. विंडीजचा दौरा हा ऋषभ पंतला संधी देऊन त्याला आगामी मालिकांसाठी तयार करण्याची योग्य वेळ होती, मात्र ती संधी निवड समितीने चाहत्यांच्या दबावामुळे दवडली.

यानंतर २०१९ चा विश्वचषक जवळ यायला लागला आणि पहिल्यांदा धोनीला भारतीय संघात स्थान द्यायचं का? असा प्रश्न उघडपणे विचारला जाऊ लागला. या प्रश्नामागचं कारण होतं धोनीचं फलंदाजीतलं सातत्य. मात्र तरीही निवड समिती धोनीच्या नावावर ठाम राहिली. इतकच नव्हे तर विश्वचषकासाठी पहिल्यांदा संघ जाहीर झाला तेव्हाही पंतला संधी न देता निवड समितीने दिनेश कार्तिकला संघात स्थान दिलं. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग खेळण्याचा अनुभव पंतच्या पदरात कमी होता. यानंतर विजय शंकर विश्वचषकादरम्यान दुखापतग्रस्त झाल्यानंतर ऋषभ पंतला संघात स्थान देण्यात आलं.

निवड समितीने त्याकाळी घेतलेला हा निर्णयही अनाकलनिय होता. एका संघात ३ यष्टीरक्षक खेळवणं हे मूर्खपणाचं लक्षण होतं. यानंतर न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात पराभूत झाल्यानंतर निवड समितीचे डोळे उघडले. आगामी मालिकांसाठी ऋषभ पंतलाच पहिली पसंती मिळणार असल्याचं स्पष्ट झालं. मात्र तोपर्यंत पाणी पुलाखालून वाहून गेलं होतं. आयपीएलमध्ये चौकार-षटकारांची आतषबाजी करणारा पंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अपयशी होतो अशी अनेकांनी ओरड केली होती. मात्र दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये फरक असतो ही साधी गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी. ऋषभ पंतला संघात स्थिर होण्यासाठी थोडा वेळ हा द्यावाच लागेल. याचजागी दोन वर्षांपूर्वी निवड समितीने पंतला संघात संधी दिली असती आणि अजुनही पंत खराब कामगिरी करत राहिला असता तर त्याच्यावर टीका करणं योग्य ठरलं असतं.

ही झाली एक बाजू, पंतवर इतक्या लवकर टीका करणं चुकीचं असलं तरीही त्याच्या बेजबाबदार फलंदाजी आणि उथळ क्षेत्ररक्षणाला नजरअंदाज करुन चालणार नाही. माणूस एकदा चुक करतो, दुसऱ्यांदा चुक करतो पण तीच चुक सतत करत राहिला तर त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागतात. सध्याच्या घडीला ऋषभ पंत याच विचीत्र परिस्थीतीमध्ये अडकला आहे. विंडीज दौऱ्यात ऋषभ पंत सलग बेजाबदार फटके खेळून माघारी परतला. विंडीजविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यातली खेळी वगळता पंत प्रत्येक सामन्यात बेजबाबदार फटके खेळून माघारी परतला. पंतचं हे अपयश इतकं ठळकपणे डोळ्यात भरणारं होती की खुद्द विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना त्याची दखल घ्यावी लागली.

दुर्दैवाची आणखी एक गोष्ट म्हणजे पंत आपल्या चुकांमधून काहीही धडा घेण्याच्या तयारीत नाहीये. पंतचं यष्टींमागे उथळ वागणं, फलंदाजीतला बेजबाबदारपणा अजुनही कायम आहे. यष्टीरक्षक हा संघाचा अर्धा कर्णधार असतो असं म्हटलं जातं. सामन्याचं पारडं कोणत्या वेळी कुठे झुकतंय याचा अंदाज यष्टीरक्षकाला पहिला येतो. पायचीतचं अपील करताना चेंडू नेमका कुठे लागलाय, DRS बद्दलचे अंदाज हे यष्टीरक्षकाला पहिले येतात. मात्र पंतकडून या बाबतीतही सतत निराशाजनक कामगिरी होते आहे. बांगलादेशविरुद्ध पहिल्या सामन्यात पंतने रोहितला DRS घेण्यासाठी दिलेला चुकीचा सल्ला आपण सर्वांनीच अनुभवला असेल. या चुका सुधारत स्वतःचा खेळ सुधारणं हे पंतच्या हातात आहे, मात्र सध्यातरी हे होताना दिसत नाहीये.

काही वर्षांपूर्वी करुण नायर या खेळाडूला भारतीय संघात स्थान मिळालं होतं. इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात करुण नायरने त्रिशतक झळकावलं. त्याच्या या खेळीनंतर करुणचं कसोटी संघातलं स्थान पक्क असा अंदाज सर्वांनी बांधला होता. मात्र यानंतरच्या सामन्यात करुण अपेक्षेप्रमाणे खेळ करु शकला नाही, ज्याचा फटका त्याला चांगलाच बसला आहे. करुण नायर अजुनही संघात पुनरागमनासाठी धडपडतोय. दुर्दैवाने ऋषभ पंतची अवस्था करुण नायरसारखी होऊ नये इतकच. मोजक्या संधी देऊन एका नवख्या खेळाडूकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा करणं जसं चुकीचं आहे तसंच मिळालेल्या संधीचा फायदा न घेता सतत त्यात चुका करणंही तितकंच चुकीचं आहे. त्यामुळे आगामी काळात पंत आपलं स्थान कितीकाळ टिकवून ठेवतो हे पाहणं महत्वाचं ठरेल.