१०० कोटी लोकसंख्या पार केलेला देश आणि त्यात एकाही क्रीडा प्रकाराला राष्ट्रीय खेळ हा दर्जा नाही. ही बाब मला पहिल्यापासून खटकत आली आहे. नाही म्हणायला, बहुतांश लोकांप्रमाणे माझाही असाच समज होता की हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. मात्र सरकारने आतापर्यंत अशी कोणत्याही प्रकारे घोषणा केलेली नाही. त्यामुळे हॉकी हा भारताचा अघोषित राष्ट्रीय खेळ आहे, असं म्हणायला हरकत नाही. सध्या कोणी कितीही नाकारलं तरीही भारतीयांचं क्रीडाविश्व हे क्रिकेटमय आहे. संघ हरला की लोकं क्रिकेटपटूंना शिव्या घालतात, त्यांच्यावर फिक्सिंगचे आरोप करतात (जे सर्वस्वी चुकीचं आहे), पण तरीही भारतीय लोकं अजुनही क्रिकेटवरच जास्त प्रेम करतात. मग अशा क्रिकेटवेड्या देशात, ज्या माणसाने हॉकीला एक वेगळं रुप दिलं त्याचा वाढदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून का बरं साजरा करत असतील? मेजर ध्यानचंद हे खऱ्या अर्थाने हॉकीचे जादूगार होते. ज्या काळात भारतीय क्रिकेटचा संघ हा अधूनमधून एखादा सामना किंवा मालिका जिंकायचा, त्या काळात ध्यानचंद आणि हॉकीने भारताला ऑलिम्पिक खेळांमध्ये सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.

मग असं नेमकं काय झालं, की ज्या खेळात भारत पदकांची लयलूट करत होता, त्यात अचानक एकदम मागे पडला? ध्यानचंद यांच्यानंतर भारतात त्यांच्या तोडीचा किंवा त्या तडफेने हॉकी खेळणारा एकही खेळाडू तयार होऊ शकला नाही? याचं कारण म्हणजे भारतीय हॉकी ध्यानचंद यांच्या सुवर्णकाळात अडकून राहिली. काळानुरुप भारतीय हॉकीने खेळातले बदल लवकर आत्मसात केले नाहीत. भारतीय हॉकीने कधीही नवीन ध्यानचंद निर्माण करण्याची तसदी न घेता, त्याच त्याच जुन्या आठवणींमध्ये रमण पसंत केलं. म्हणूनच ज्या खेळामध्ये एकेकाळी भारतीय संघ प्रतिस्पर्ध्याचा धुव्वा उडवायचा, त्या खेळात आता भारताचा हॉकी संघ चुकूनमाकून आणि कधी रडत-खडत एखादा सामना जिंकतो.

ध्यानचंद हे त्यांच्या जागी एक महान खेळाडू होते. त्यांच्यासारखं ड्रिबलींग स्किल असलेला एकही खेळाडू तुम्हाला भारतात काय जगाच्या नकाशावरही पाहायला मिळणार नाही. पण दुर्दैवाने त्यांच्याच वारसदारांनी (खेळातले) त्यांनी निर्माण करुन ठेवलेल्या ज्ञानभांडाराकडे पाठ फिरवली. नाही म्हणायला, धनराज पिल्ले, अर्जुन हलप्पा, दिलीप तिर्की, धनंजय महाडीक, विरेन रस्किना यांच्यासारखे काही उत्तम दर्जाचे खेळाडू भारताने तयार केले. मात्र क्रीडा संघटनांचे राजकारण आणि दुखापतींच्या विळख्यात हे खेळाडू कधी संपले याचा पत्ताही नाही लागला. दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांचा अपवाद वगळता हॉकी उर्वरित भारतात कधी पोहोचलीच नाही. महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ यासारख्या राज्यांमधून आता-आता काही खेळाडू हॉकीकडे वळायला लागले आहेत. पण त्यांचं प्रमाणही अत्यल्प आहे.

पंजाबमधील संसारपूर गावात १०० मीटरच्या एका गल्लीत तब्बल १४ ऑलिम्पिकपटू राहतात. यातील काही जणांनी भारताचं तर काही जणांनी कॅनडा, केनिया सारख्या देशांचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. क्रीडाक्षेत्रासाठी ही बाब किती गौरवास्पद आहे. माझ्या दृष्टीने ही गल्ली म्हणजे एखाद्या तीर्थक्षेत्रासारखीच आहे. जर देशाच्या एका भागात हॉकीमध्ये एवढं मोठं टॅलेंट लपलेलं आहे, तर संपूर्ण देशात संसारपूरसारख्या अशा किती गल्ल्या असतील याचा तुम्ही विचार करा. दुर्दैवाने क्रीडा मंत्रालय, हॉकी इंडिया असो अथवा ‘साई’ यापैकी एकाही संघटनेने देशात हॉकी वाढवण्याचे मनापासून प्रयत्न केलेच नाहीत. त्यामुळेच या खेळाला आज देशात राजमान्यता नाही असं म्हणावं लागेल.

खेळांच्या बाबतीत आपण एक रसिक म्हणून स्वतःला किती मोजकं ठेवलेलं आहे याचं उदाहरण देतो. चॅम्पियन्स करंडकात भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना होता, त्यावेळी लंडनमध्ये वर्ल्ड हॉकीलीग सेमीफायनल स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान हॉकी सामना होता. मात्र यावेळी देशातला संपूर्ण मीडिया हा भारत-पाक क्रिकेट सामन्यावर तुटून पडला होता. मीडियाने या सामन्याला एका युद्धाचं स्वरुप दिलं. मात्र यावेळी अंतिम सामन्यात भारत पाकिस्तानकडून हरला. मात्र याच वेळी भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानवर ७-१ अशी मात केली. ही बातमी कळताच सर्व क्रीडारसिक हे हॉकीचं गुणगान गायला लागले, क्रिकेटपटूंना शिव्या घालायला लागले. म्हणजे विचार करा, क्रिकेटमध्ये सामना हरलो म्हणून लोकांना हॉकीची आठवण झाली. अचानक लोकांना हॉकी जवळची वाटायला लागली. अशावेळी मीडियाने केलेला तामझाम वाया गेला. मग नाईलाज म्हणून हॉकीची बातमी ही खाली एका पट्टीत चालवून मीडिया मोकळा झाला. ज्या तडफेने आपण सर्व क्रिकेटमधला विजय साजरा करतो, त्या तडफेने हॉकी किंवा इतर खेळांमधला विजय का साजरा नाही करत? हा प्रश्न आताच्या मीडियानेही स्वतःला एकदा विचारुन बघायला हवा.

प्रत्येक वेळी हॉकीचे सामने आले की, तज्ज्ञ मंडळी ध्यानचंद यांच्या खेळाचे दाखले देतात, हॉकीच्या सुवर्णकाळाची आठवण देऊन सध्याच्या खेळाडूंना दोष देत राहतात. मात्र सध्याच्या खेळाडूंचा खेळ कसा सुधारता येईल, याकडे कोणीही लक्ष देत नाही. किंवा त्यावर बोलायला तयार होतं नाही. माझ्या मते हॉकीसाठी ही सर्वात मोठी धोक्याची बाब आहे. जोपर्यंत आपण प्रत्येक खेळाडूची आणि हॉकी संघाची कामगिरी स्वतंत्र नजरेने पाहत नाही, तोपर्यंत हॉकीला पुन्हा अच्छे दिन येणार नाहीत.

मात्र सुदैवाने आता परिस्थिती बदलतेय, असं म्हणायला हरकत नाही. रोलंट ओल्टमन्स यांच्या देखरेखीखाली खेळणारा भारतीय संघ हॉकीत नवे बदल करतोय. मग रघुनाथसारख्या अनुभवी खेळाडूला संघातून बाहेर करणं, सरदार सिंहसारख्या दिग्गज खेळाडूच्या हातून कर्णधारपदाची कमान काढून घेणं, युरोप दौऱ्यात सर्व सिनिअर खेळाडूंना विश्रांती देऊन तरुणांना संघात स्थान देणं ही काही आश्वासक उदाहरणं म्हणता येईल. दुर्दैवाने ध्यानचंद यांच्यानंतर भारतीय हॉकी त्यांच्या गोड आठवणींच्या कुशीत झोपून होती. आता कुठे जाग आल्यानंतर, जग आपल्यापुढे निघून गेल्याचं तिला समजलंय. त्यामुळे आता हळूहळू का होईना बदल घडताना दिसतायत. ऑलिम्पिकमध्ये पदकांच्या दुष्काळाचा काळ हा इतका मोठा होता की आता त्यातून सावरायला भारतीय हॉकीला थोडा वेळ लागेलच. फक्त तोपर्यंत सरकार आणि भारतीय चाहत्यांनी या खेळाडूंच्या मागे उभं रहावं आणि मेजर ध्यानचंद यांच्या आठवणींमध्ये न रमता हॉकी इंडियाने नवीन ध्यानचंद निर्माण करावेत. भविष्यकाळात असं काही घडलं, तरच आपण ध्यानचंद यांना खऱ्या शुभेच्छा देऊ शकतो.

– प्रथमेश दीक्षित
prathmesh.dixit@loksatta.com