ट्रेकिंग करणाऱ्या लोकांबद्दल मला फार पूर्वीपासुनचं खूप आदर आहे. म्हणजे बघा ना मस्तपैकी ट्रेकिंगचे शूज, हातात एक काठी, पाठीवरती बॅग…त्या बॅगेमध्ये खाण्यापिण्याच्या-गरजेच्या जिन्नस इ. इ. अशा अनेक गोष्टी ही सर्व मंडळी आपल्या बॅगमध्ये ठेवत असतात. एखादा उंच किल्ला किंवा डोंगर ठरवायचा आणि त्यावर मजल-दरमजल करत चढत जायचं, या मंडळींकडे पाहिलं की मला शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची आठवण येते. पण असंही म्हटलं जातं की काही लोकांनी कितीही प्रयत्न केला तरीही त्यांना एखादी गोष्ट जमतच नाही. माझ्या पहिल्या वहिल्या ट्रेकिंगची गोष्टही अगदी अशीच काहीशी आहे. मुळात बायकोचा राग घालवण्यासाठी मी उत्तराखंडमधल्या ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ या ठिकाणी ट्रेकिंगसाठी जायचं मान्य केलं. आयुष्यात फक्त खाण्यावर प्रेम केलेला मी या गोष्टीसाठी कसा काय तयार झालो हेच मला अजुन कळत नाहीये. माझ्या आयुष्यातलं पहिलं वहिलं ट्रेकिंग संपवून मी घरी परतलोय, अनुभव तसा बरा आलाय…पण आज घराच्या बाल्कनीत बसून हा ब्लॉग लिहीताना सारखं असं वाटतय की हे माझं शेवटचं ट्रेकिंग, कारण येथे पाहिजे जातीचे; येरागबाळ्याचे काम नव्हे या म्हणीचा पुरेपूर प्रत्यय या ट्रेकिंगने माझ्या पदरात टाकला आहे.
देहरादून विमानतळावर उतरल्यानंतर, टूर ऑपरटेरने ठरवून दिलेला टॅक्सीवाला आम्हाला रिसीव्ह करायला आला. विमानतळ ते हॉटेल हा रस्ता जरा बरा वाटला, म्हणून मी एका कसलेल्या मुंबईकराप्रमाणे त्यांच्या शहरातील रस्त्याचं कौतुक केलं. “सरजी, आपके शहरके रस्ते तो काफी अच्छे है.” माझ्या या वाक्यानंतर टॅक्सीवाल्याने, “अभी तो आप आए हो भाईजी, कल घाटी से जाते वक्त बताईयेगा की रस्ते कैसे लगे”, असं म्हणत पुढचा प्रवास काही सोपा नसणार आहे याची कल्पना दिली. दुसऱ्या दिवशी ऋषिकेश ते जोशीमठ या प्रवासाला सुरुवात झाली. तब्बल ९ तासांचा प्रवास, वाटेत दरडी कोसळल्यामुळे १२ तासांचा झाला. देवभूमीतल्या ज्या रस्त्यांचं मी पहिल्या दिवशी कौतुक केलं, त्याच रस्त्यांनी दुसऱ्या दिवशी मला खरे रंग दाखवण्यास सुरुवात केली. एका अभेद्य डोंगरामधून जाणाऱ्या नागमोडी वाटेने माझा पुरता पिद्द्या पाडला. त्या प्रवासादरम्यान मला त्या टॅक्सीवाल्याचे, …..कल घाटी से जाते वक्त बताईयेगा की रस्ते कैसे लगे हे शब्द आठवत होते. भारतीय राजकारणी असो किंवा रस्ते, सब घोडे बारा टके ही म्हण सर्वत्र लागू पडते याची मला पुरेपूर खात्री पटली.
संपूर्ण उत्तराखंडमध्ये हा नागमोडी प्रवास काहीकेल्या तुमची पाठ सोडत नाही. मग ते केदारनाथ-बद्रीनाथ असो किंवा गोविंदघाट-घांगरिया-हेमकुंड साहिब सारखी ठिकाणं असोत. तर अखेरीस तो क्षण येऊन ठेपलाच. पुलना ते घांगरिया हे १० किलोमीटरचं अंतर आम्हाला कापायचं होतं, पण माझ्या या पहिल्याच प्रयत्नात घोडा आढवा आला. “साबजी १० किलोमीटर चढके जाना है, बैठ जाईये…घोडा पोहचा देगा”….आणि नकळत मी घोडेवाल्याच्या प्रलोभनाला बळी पडलो आणि १० किलोमीटरचं अंतर अगदी राजेशाही थाटात पार केलं. मग वाटलं झालं, १० किलोमीटर अंतर पार केलं ना…उद्या घांगरिया ते व्हॅली ऑफ फ्लॉवर हा ४ किलोमीटरचा रस्ता आपण सहज पार करु. पण पुढच्या दिवशी माझ्यासमोर देवाने काय वाढून ठेवलं होतं, याची मला खरचं कल्पना नव्हती.

दररोज घर ते रेल्वे स्टेशन, मग बसने ऑफिस असा प्रवास करणाऱ्या माझ्यासारख्या खाऊखुशाल माणसासाठी ट्रेकिंग म्हणजे बिल्डींगचे जिने चढणे. याव्यतिरीक्त सामन्य मुंबईकरांना फारकाही गोष्टी चढाव्या लागत असतील असं मला तरी वाटत नाही. असो, सकाळी साडेआठ वाजल्याच्या दरम्यान माझ्या ट्रेकिंगला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आदल्या दिवशी साठी पार केलेल्या म्हाताऱ्या आजी-आजोबांना चालत येताना पाहून माझी मान जरा शरमेनेच खाली गेली होती. मनात विचार आला, काय सालं आयुष्य जगतोय मी, इतक्या तरुण वयात मला एवढं अंतर चालता येऊ नये, ही वाईट गोष्ट आहे. म्हणूनच आदल्या दिवशी केलेल्या घोडेसवारीचं प्रायश्चित्य घेण्यासाठी मी ४ किलोमीटरच अंतर असलेली चढण चालत जाण्याचा विचार केला. रस्त्यात सुरुवातीला, फुलों की घाटी – ४ किलोमीटर असा फलक दिसला आणि मग वाटलं चला फार काही अंतर नाहीये, आपण करु शकतो हे पार. पण प्रत्यक्ष ट्रेकिंगला सुरुवात झाल्यानंतर हे ४ किलोमीटरचं अंतर ४० किलोमीटरइतक भासायला लागलं. दर ५ पावलांनंतर मी १० मिनीटं धापा टाकत बसत होतो.
मुंबईत असताना खाण्यावर वाट्टेल तसा मारलेला आडवा हात, अरबट-चरबट खाणं हे सगळं बाहेर पडत होतं. डोंगर-दऱ्यांमधून स्थानिक लोकांनी केलेली पायवाट ही खरच थकवणारी होती. एकतर अंगाला बोचेल असा थंड वारा, मध्येच येणारा रिमझीम पाऊस आणि खालची निसरडी पायवाट यामुळे हा प्रवास मला अधिक भीषण वाटायला लागला. मुंबईत जरा गरज पडली तर मोबाईलवर ओलाच्या अॅपमधून टॅक्सी मागवता येते. इथे तशीही सोय नाही. स्थानिक लोकं पर्यटकांना आपल्या पाठीवर बसवून वरपर्यंत नेऊन सोडतात. मात्र माझं वजन पाहता मी सुरुवातीला तो पर्याय टाळला. काहीही झालं तरी चालेल, भले १० पावलं चालल्यानंतर मी १५ मिनीटं आराम करेन, पण संपूर्ण रस्ता चालतच जाईन असा निर्धार मी मनाशी पक्का केला.

उत्तराखंडावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे यात काही शंकाच नाही. त्यात व्हॅली ऑफ फ्लॉवरच्या मार्गावर छोटी-छोटी फुलं तुमचं मन प्रफुल्लित करतात. अशा काही सुंदर गोष्टींना पाहत पाहत, बायकोशी गप्पा मारत मारत मग काही काळ जरा बरा गेला. बघता बघता अंतर कमी होतं गेलं. पण वाट काही केल्या संपायचं नाव घेईना. एक डोंगर पार करुन ज्यावेळा आपल्याला असं वाटतं की, अरे आलोच की आपण…त्याचवेळी समोर आणखी एक डोंगर तुमची वाट पाहतं असतो. अशाप्रकारे मजल-दरमजल करत मी नेटाने चालत राहिलो. कधीकधी असं वाटतं होतं, की आता आकाशातून इंद्रदेव बाहेर येईल आणि म्हणेल, अरे आता इतका चाललाच आहेस तर थेट वरतीच ये ना आता. पण तसं काही झालं नाही, इंद्रदेवांनी आकाशातून हात दिला नसला तरीही स्थानिक पिठ्ठूचा व्यवसाय (पर्यटकांना आपल्या खांद्यावरील एका खूर्चीत बसवून डोंगरावर सोडणाऱ्या व्यक्ती) करणाऱ्यांनी मला अखेर हात दिला.
आतापर्यंत बायकोनेही हार मानली होती. तिच्याकडे पाहून एक पिठ्ठूवाला प्रेमाने म्हणाला, साहब बैठ जाओ अभी, बहोत चल दिये आज आप.. त्या क्षणी त्या माणसात मला खरच देवाचा भास झाला. ४ किलोमीटरचं अंतर चालणार असा पण करुन प्रवास सुरु केल्यानंतर मी ३ किलोमीटरचं अंतर चाललो होतो. हे ही नसे थोडके असं म्हणत मी अखेर पिठ्ठूवर सवार झालो. काही मिनीटातचं अपेक्षित स्थळी पोहचलो, व्हॅली ऑफ फ्लॉवरचं सौंदर्य कॅमेऱ्यात कैद केलं, रिवाजाप्रमाणे बायकोसोबत फोटोही काढले. सगळं काही आटोपल्यानंतर तोच रस्ता खाली उतरुन हॉटेलवर परतलो. रात्री पायांनी प्रचंड त्रास दिला. गुडघे बोलायला लागले, पोटऱ्यांमध्ये गोळे येण्यास सुरुवात झाली. ७-८ किलोमीटरचा प्रवास चांगलाच अंगावर आला होता. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नंतर हेमकुंड साहिब येथील गुरुद्वारेत जाण्याचा प्लान मी लगेच रद्द केला. हॉटेलमध्ये रुमवर बसून सत श्री अकाल करत मी निद्रादेवीच्या अधिन झालो.
आठवड्याभराच्या सुट्टीनंतर अखेर मुंबईत दाखल झालोय. ट्रेकिंगचा विषय जरी काढला तरी काळजात धस्स होतं. काही दिवसांत नेहमीचं रुटीन सुरु होईल. ठरलेली लोकल, ठरलेलं काम आणि ठरलेला परतीचा प्रवास. पण या सगळ्या गोष्टींमध्ये ट्रेकिंगची आठवण येईल. बायको म्हणते ट्रेकिंग हे व्यसनासारखं आहे, एकदा चटक लागली की नंतर आपणच वेगवेगळ्या ठिकाणी जायच्या संधी शोधत बसतो. पण व्हॅली ऑफ फ्लॉवर्सच्या ट्रेकने अनेक गोष्टींची जाणीव करुन दिली. शरीर अजून सुदृढ बनवायला हवं, खाण्यापिण्यावर नियंत्रण गरजेचं आहे. अजुन वयाची तिशीही पार झालेली नाही तरीही थोडं चालल्यानंतर पाय दुखायला लागले, साठीमध्ये तर आम्हाला कदाचीत व्हिलचेअरचीच गरज लागले. घरी परतत असताना बायकोने विचारलं आता पुढचा ट्रेक कधी?? तिच्या प्रश्नाचं उत्तर देणं मी शिताफीने टाळलंय, बघू कसा योग जुळून येतो ते…