मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी २१ सप्टेंबर रोजी ओंकारेश्वर येथे आद्य शंकराचार्यांच्या १०८ फूट उंचीच्या ‘स्टॅच्यू ऑफ वननेस’चे अनावरण केले. शंकराचार्य १२ वर्षाचे असताना ओंकारेश्वरला गेले होते, त्यामुळे या मूर्तीत आद्य शंकराचार्यांना लहान बटूच्या रूपात दर्शविण्यात आले आहे. खांडवा जिल्ह्यातील मांधाता बेटावर असलेल्या मंदिर शहराचा विकास करण्यासाठी सरकारने २२०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. हा प्रकल्प उज्जैन, महेश्वर आणि मांडू या धार्मिक शहरांसह एक महत्त्वाचे पर्यटन सर्किट असेल. या अनुषंगाने आद्य शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानाविषयी जाणून घेऊया…

वैशाख शुद्ध पंचमी म्हणजेच आद्य शंकराचार्यांचा जन्मदिवस. उपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र या प्रस्थानत्रयींवर भाष्य, अद्वैत मताचा प्रसार, विविध स्तोत्ररचना आणि विपुल ग्रंथरचना आद्य शंकराचार्यांनी केली. इसवी सनाच्या सातव्या-आठव्या शतकात जन्मलेले आद्य शंकराचार्य आणि त्यांचे तत्त्वज्ञान आजच्या काळात उपयुक्त आहे का, हे पाहणे नक्कीच औचित्यपूर्ण ठरेल.

हेही वाचा : गणपतीचे वाहन उंदीर का आहे? मोर हे गणेशाचे वाहन होते का ? जाणून घ्या कथा…

आद्य शंकराचार्य

केरळमधील पेरियार (पूर्णा ) नदीच्या तीरावरील कालडी गावातील शिवगुरू आणि आर्याम्बा या नंबुद्री ब्राह्मण दाम्पत्याच्या पोटी आद्य शंकराचार्यांचा जन्म इसवी सनाच्या सातव्या-आठव्या शतकात झाला. त्यांच्या जन्मकाळाविषयी अनेक मतभेद आहेत. केवलाद्वैत तत्त्वज्ञानाला अधिष्ठान देण्याचे महान कार्य त्यांनी केले. केवलाद्वैत या तत्त्वज्ञानात त्यांनी आत्मा आणि ब्रह्म यांचं ऐक्य सांगून या जगाचं मिथ्यत्व सांगितलं आहे. केवल अद्वैत म्हणजेच आत्मा आणि ब्रह्म यांचे कायमस्वरूपी ऐक्य होय. ‘शांकरविजय’ या ग्रंथात आद्य शंकराचार्यांच्या जीवनचरित्राची झलक देणारा एक श्लोक येतो –

अष्टवर्षे चतुर्वेदी, द्वादशे सर्वशास्त्रविद । षोडशे कृतवान भाष्यं, द्वात्रिंशे मुनिरभ्यगात ।। म्हणजेच आठव्या वर्षी चारही वेदांचे अध्ययन, बाराव्या वर्षी सर्व शास्त्रांचे ज्ञान, सोळाव्या वर्षी प्रस्थानत्रयींवर भाष्य आणि बत्तीसाव्या वर्षी महाप्रस्थान,हे आचार्यांचे जीवन होते. भाष्य ग्रंथांव्यतिरिक्त जवळपास ४०० स्फूट ग्रंथ त्यांनी लिहिल्याचे हस्तलिखितांच्या समग्र याद्यांवरून दिसून येते. त्यांनी आपल्या सर्व लिखाणामधून ज्ञान आणि भक्ती यांचा पुरस्कार केला. भारतभ्रमण करून वैदिक धर्माची पुनर्स्थापना त्यांनी केली. अनेक विद्वतसभांमध्ये ते सहभागी झाले आणि विविध संप्रदायांना अद्वैताच्या छताखाली आणले.

वैदिक सूक्तांमध्ये आढळणारे आणि उपनिषदांत परिपूर्ण रीतीने परिणत झालेले ब्रह्म-आत्मा यांच्या ऐक्याचे प्रतिपादन आणि उपनिषदवाक्यांमध्ये आढळणाऱ्या विरोधांचा परिहार करून, त्यांचा तर्क-ज्ञानाच्या आधारे समन्वय घालून व सांख्य-योग, न्याय-वैशेषिक, पूर्वमीमांसा अशा आस्तिक व बौद्ध, जैन, लोकायत अशा नास्तिक दर्शनांचे पद्धतशीर खंडन करून केवलाद्वैत तत्त्वज्ञानाची भक्कम पायावर मांडणी करणे, हे आचार्यांचे सर्वात मोठे योगदान आहे. देशभर परिभ्रमण करून आचार्यांनी बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी व शृंगेरी अशा चार दिशांना मठ स्थापन करून व तेथे अधिकारी पीठाधीशांना नेमून आपल्या तत्त्वज्ञानाची परंपरा अखंडपणे चालू ठेवण्याची व्यवस्था केली.

आद्य शंकराचार्यांचे तत्त्वज्ञान

आद्य शंकराचार्यांनी केवलाद्वैत या तत्त्वज्ञानाची स्थापना केली. केवलाद्वैत म्हणजे एकच निर्गुण ब्रह्म हेच सत्य आहे. जीवात्मा हा आत्म्याहून भिन्न नाही आणि हे सर्व विश्व मिथ्या आहे, असे प्रतिपादन करणारे तत्त्वज्ञान म्हणजे केवलाद्वैतवाद तत्त्वज्ञान होय. ‘केवल’ म्हणजे निर्गुण हा अर्थ सांख्यदर्शनातील पुरुषतत्त्वाच्या ‘केवल’ या विशेषणावरून घेतला आहे. द्वैत म्हणजे दोन किंवा एकापेक्षा अधिक. द्वैत म्हणजे द्रष्टा व दृश्य यांचे भिन्नत्व. द्वैतविरहीत असते ते अद्वैत होय. या दोहोंना एकच समजणे हे अद्वैत तत्त्वज्ञानाचे मुख्य प्रयोजन आहे. हे अद्वैत तत्त्वज्ञान सांगत असताना आद्य शंकराचार्यांनी जीवनमुक्त ही संकल्पना मांडली. मोक्ष ही केवळ मृत्यूनंतरची अवस्था नसून सध्या जगत असतानाही माणूस जीवनमुक्त होऊ शकतो, असे ते म्हणतात. मग जीवनमुक्त होण्याचा प्रवास सामान्य व्यक्ती कशी करेल, तेव्हा आचार्य स्तोत्ररचना करतात. स्तोत्रांमधून मनाची शुद्धता, एकाग्रता, परमेश्र्वराप्रति ध्यान, समाधी असा प्रवासमार्ग ते दाखवतात. म्हणून गणेशपंचकम्, अपराधक्षमापन स्तोत्र, हिरण्यगर्भ सूक्त, मानसपूजा स्तोत्र आणि निर्वाणषटकम् ते रचतात. आद्य शंकराचार्यांनी रचलेली असंख्य स्तोत्रे आज उपलब्ध आहेत.

२१ व्या शतकात आद्य शंकराचार्यांचे तत्त्वज्ञान

आद्य शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे आजही मनाच्या एकाग्रतेसाठी आणि मनाच्या समृद्धतेसाठी उपयुक्त ठरतात. अनेक ध्यानकेंद्रांमध्ये स्तोत्र ही मनाच्या स्थिर स्थितीसाठी म्हटली जातात. नैतिक मूल्यांचे अवमूल्यन होत असताना अद्वैत स्थिती तत्त्वज्ञानात्मक अंगाने न घेता आपल्यातल्या सुप्त उत्तम गुणांच्या जागृतीशी अद्वैत साधले पाहिजे. ‘तत् त्वम् असि ।’ असे आद्य शंकराचार्य जेव्हा म्हणतात, तेव्हा सर्वगुणसंपन्न परमात्मा म्हणजेच तू आहे, हे त्यांना सांगायचे असते . त्यातून आपल्यातील नीतिमूल्यांची विकास त्यांना अपेक्षित आहे.

जगाचे मिथ्यत्व आद्य शंकराचार्य सांगतात. जैन-बौद्ध ही नास्तिक दर्शनेही आशा,मोह आणि लोभ यांना शत्रू मानतात. आद्य शंकराचार्यांनी सांगितलेले जगाचे मिथ्यत्व समजून घेऊन ऐहिक सुख आणि दुःख याच्यापलीकडे सार्वभौम विचार केला पाहिजे, असे त्यांना सुचवायचे असू शकते. केवळ मी, माझे याच्या पलीकडे आपण, आपले हा वैश्विक विचार आद्य शंकराचार्यांनी दिला. त्यांनी कायम कर्मकांडाचा निषेध करून ज्ञानमार्ग सांगितला. ज्ञानाच्या आधारे स्वविकास करावा, असे आद्य शंकराचार्य सुचवतात. आद्य शंकराचार्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे तत्त्वज्ञान केवळ ग्रंथबद्ध न ठेवता त्याचे आजचे उपयोजन समजून घेणेही तेवढेच आवश्यक आहे.

Story img Loader