सारिका कुलकर्णी
‘‘अल्बुकर्क साहेब, आधीच अवकाळी, अकाली, उन्हाळी का अवेळी असे कुठल्या तरी ‘ळी’ पावसाने आंब्याला झोडपले आहे. नुकसान भरपाई कशी कुठे करायची यावर आजच चर्चासत्र भरवणार आहोत. तुम्ही अजून फाटक्या चादरीत पाय घाला. शोभतं का तुम्हाला? एक काम करा, आपण चर्चा करू ना तुमच्या प्रस्तावावर. एखादी समिती बसवू की तुमच्या त्या हापूस आंब्याच्या चौकशीला. आहे काय अन नाही काय! कशाला काळजी करता? आम्ही आहोत ना. काये आमच्याकडे उन्हाळा फार असतो. एवढ्या उन्हाळयात आनंद देणारी एकमेव गोष्ट म्हणजे आंबा. त्यातल्या त्यात हापूस आंबा. त्यावर पण तुम्ही जर टॅक्स लावला तर कसं व्हायचं? मी काय म्हणतो, आपण चर्चा करू. बोलू. तुम्ही आमच्या साहेबांच्या पाहुणचाराला थांबा. जरा समुद्र किनारी फिरून या. मागच्या काही जन्मातील आठवतंय का बघा. आंबा आठवला तसा तुम्ही केलेले अत्याचार आठवतात का बघा. तुम्ही एकवेळ आमचा प्राण मागितला तर चालेल पण हापूस आंबा मागू नका. तो नावाने ‘आम’ असला तरी आमच्यासाठी ‘खास’ आहे.’’

सकाळी दहाची वेळ. महाराष्ट्राच्या राजाच्या दरबाराची वेळ केव्हाच होऊन गेली होती. राजे थोड्या वेळापूर्वी दरबारी पोचले होते, पण सर्वसामान्य जनतेचे प्रधानजी अजून आलेच नव्हते. (खरेखुरे राजे तर ते आहेतच शिवाय त्यांचे आडनाव देखील राजे आहे.) राजेसाहेबांनी जरा वैतागूनच दुसऱ्या सामान्य जनतेच्या प्रधानजींकडे बघितले. हल्ली राज्यात हे असे झाले होते. कुठलीही पदे दोन दोन जणात वाटून दिली जात. राजे दुसऱ्या प्रधानजींना म्हणाले, ‘‘प्रधानजी, तुमचे जोडीदार येत नाहीत तोपर्यंत तुम्ही राज्यकारभार सुरू करा.’’

तत्काळ प्रधानर्जीनी उत्तर दिले, ‘‘छे छे साहेब, आज ज्या विषयांवर चर्चा आहे तो पोर्टफोलियो आमच्याकडे नाही.’’

राजे चिडून म्हणाले, ‘‘अहो, पण दरबाराचा वेळ वाया जातोय. तुम्ही सुरु करा तोपर्यंत ते येतीलच.’’

‘‘साहेब, तुम्ही हे असले काही सांगत जाऊ नका बरे. मागे एकदा असेच मी त्यांच्या अनुपस्थितीत राज्यकारभार सुरू केला तर केवढा गहजब झाला होता. सेन्ट्रल लाईनवर आज जरा लोकलचा खोळंबा आहे. त्यामुळे त्यांना यायला उशीर होत असेल.’’

राजे म्हणाले, ‘‘अहो, पण सरकारने घोडागाडीची एवढी फॅसिलिटी दिलेली असूनही हे लोकल ट्रेनने का येतात?’’

प्रधान म्हणाले, ‘‘सर्वसामान्यांचा प्रधान आहे असे त्यांना मिरवायचे आहे ना म्हणून असे फिरतात.’’

राजेंनी विचारले, ‘‘मग तुम्ही कोण आहात ?’’

प्रधान म्हणाले, ‘‘मी सामान्यांचा प्रधान आहे आणि ते सर्वसामान्यांचे प्रधान आहेत.’’

तितक्यात धापा टाकतच तिथे सर्वसामान्यांचे प्रधानजी आले. दिलगिरी व्यक्त करत ते म्हणाले, ‘‘राजे साहेब, माफी असावी. पण आज उशीर हा लोकलच्या खोळंब्यामुळे झालेला नाही तर वेगळ्याच कारणाने झाला आहे. या दाढी नसलेल्यांना आम्हा सर्वसामान्य माणसाच्या अडचणी कळत नाहीत. म्हणून असे टोमणे मारत असतात.’’

‘‘आता तुम्ही एकमेकांना बोलण्यात वेळ घालवणार आहात की राज्यकारभार पुढे नेणार आहात? स. सा. प्रधानजी, आजची केस तुमची आहे म्हणे. बोला लवकर. कारभार संपवून मला जायचे आहे. आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सची मॅच आहे. किमान खेळात तरी मुंबई गुजरातेशी जिंकलेली बघू या.’’ राजेंना घाई झालेली होती.

दाढीवाले प्रधानजी म्हणाले, ‘‘राजे साहेब, अहो मुंबईचे काय धरून बसलात, संपूर्ण देशाची खूप मोठी संपत्ती सोडून द्यावी लागेल की काय असा डाव रचला आहे आपल्या विरोधात.’’

सा. प्रधानजी ओरडले, ‘‘कोण आहे रे तो आमच्या जमिनींवर सातबारा सांगायला आलाय?’’

स. सा. प्रधानजी म्हणाले, ‘‘जिथे तिथे तुम्हाला सातबाराच दिसतो का हो? सातबाऱ्यापेक्षा भयानक अडचण आपल्या समोर उभी राहिलेली आहे. आणि म्हणोन मला असे वाटते की आपण सगळ्यांनी मिळून या अडचणीचा सामना करायला हवा.’’

राजे साहेब म्हणाले, ‘‘तुमचं भाषण सुरू करू नका प्रधानजी. काय झाले ते सांगा.’’

स. सा. प्रधानजी उत्तरले, ‘‘अहो राजे, एक कोणीतरी कर्क म्हणून माणूस आलाय आणि म्हणतोय की हापूस आंबा आमचा आहे.’’

राजे साहेबाना कुंडलीचे चांगलेच ज्ञान होते त्यामुळे ते पटकन म्हणाले, ‘‘अहो प्रधानजी, कर्क हा माणूस नसून ती बारा राशीतील एक रास आहे. अशा नावाचा कोणी माणूस मला तरी ठाऊक नाही.’’

स. सा. प्रधानजी, ‘‘राजे साहेब, तुम्ही किनई भलतीकडेच घुसता. अहो, हा माणूस म्हणे पोर्तुगालहून आलाय आणि म्हणतोय हापूस आंबा त्याचा आहे.’’

सा. प्रधान पुढे सरसावले, ‘‘अहो मग देऊन टाकायचा ना हापूस आंबा त्याला. एवढ्या लांबून आपल्या इथला आंबा खायला आलाय. प्रधानजी, तुम्हाला म्हणून सांगतो. अतिथी देवो भव. जेवढा आनंद आतिथ्य करण्यात आहे तेवढा चार चार वेळा शपथ घेण्यात देखील नाही.’’

स. सा. प्रधानजी आता चांगलेच वैतागले, ‘‘माझी दाढी उगीच काळ्याची पांढरी झाली का हो? मला एवढं कळत नाही का? अतिथी म्हणून आला असता तर त्याला असा पंगतीलाच नसता बसवला का? आडवा होईपर्यंत हापूसचा रस खायला घातला असता. पण अडचण वेगळी आहे. हा जो कोणी आपल्या राशीला आलेला कर्क आहे ना तो म्हणतोय की हापूस आंबा म्हणे त्याने भारतात आणलाय. त्यामुळेच इथे हापूस आंब्याची लागवड झाली. आपण हापूस आंबा निर्यात करून जे काही उत्पन्न कमावतो आहोत ते त्याच्यामुळे असे त्याचे म्हणणे आहे. तर त्या हापूसच्या निर्यातीतून जे काही उत्पन्न मिळते त्यातील काही वाटा त्याला टैरिफ म्हणून हवा आहे.’’

राजेसाहेब उ‌द्वेगाने म्हणाले, ‘‘आता इथेसुद्धा टैरिफ का? ट्रम्प साहेबांच्या कृपेने आधीच आपल्या देशावर एवढ्या मोठ्या रकमेचा भार पडलाय. त्यात आता हे. तुम्ही एक काम करा प्रधानजी, त्या कर्कला इथेच बोलवा. आपण थेट सगळ्या दरबारासमोर त्याच्याशी बोलूया. उगीच आपण एकटेच का मरा?’’

स. सा. प्रधानजी चिडलेच, ‘‘राजे साहेब, आता तुम्ही देखील कामरा वरून चिडवायला लागले का?’’

राजे साहेब समजुतीच्या स्वरात म्हणाले, ‘‘अरे बाबा, मी म्हणालो आपण का मरा? तुम्हाला जळी स्थळी काष्ठी पाषाणी तेच दिसते आहे.’’

स. सा. प्रधानजी म्हणाले, ‘‘मी त्या कर्कला इथेच बोलवले आहे. पोचेलच कुठल्याही क्षणी.’’

तितक्यात एक कोणीतरी बाहेरच्या देशातील नागरिक दरबारात प्रवेश करता झाला.

प्रधानजी म्हणाले, ‘‘आला बुवा कर्क.’’

विदेशी नागरिक म्हणाला, ‘‘आला बुवा कर्क नाही. अल्बुकर्क. अल्फोनसे दी अल्बुकर्क असे माझे नाव आहे.’’

राजे साहेब अल्बुकर्कचे स्वागत करत म्हणाले, ‘‘या या अल्बुकर्क साहेब. तुमच्या देशात देखील ‘चला हवा येऊ द्या’ अथवा ‘हास्यजत्रा’ बघतात वाटते. एकदम आला बुवा कर्क वरून त्याच प्रकारातील विनोद केलात. काय खबरबात? तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी, की लिंबू सरबत? की हापूसचा रस मागवू तुमच्यासाठी?’’

अल्बुकर्क हसून म्हणाला, ‘‘माझेच मलाच देण्याची ही चांगली रीत आहे तुमची.’’

सा. प्रधानजी इतका वेळ शांत होते, पण आता मात्र त्यांची शांतता भंग पावली आणि ते म्हणाले, ” अल्बुकर्क साहेब, तुमची जरा विस्तृत ओळख करून द्याल का? आमचा सगळ्यांचा जरा गोंधळ उडाला आहे. म्हणजे हापूस आंबा हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. तसे आमच्या अस्मितेचे पुष्कळ प्रश्न आहेतच. आणि त्यावर वारंवार आपापल्या परीने सगळ्यांचे घाव घालणे चालूच आहे. तरीही आता अजून एक फार मोठा प्रश्न तुम्ही उपस्थित करता आहात. शिवाय आधीच महाराष्ट्रातील बरेचसे उदयोग शेजारील राज्यात जात असताना आमच्या आंब्यावर देखील कोणी क्लेम केला तर कठीण होईल. एक वेळ रोजगार नाही मिळाला तर मराठी जनता ऐकून घेईल, उत्तम शिक्षण आरोग्य नाही मिळाले तर मराठी जनता ऐकून घेईल पण असले अस्मितेचे प्रश्न तुम्ही छेडणार असाल तर मराठी माणूस अजिबातच ऐकणार नाही हे सांगून ठेवतो.’’

अल्बुकर्क साहेब ताठ बसत बोलू लागले, ‘‘हे बघा प्रधानजी. मी अल्फान्सो दी अल्बुकर्क.’’

मधेच राजे बोलले, ‘‘अल्फान्सो की अल्फोनसे? भाषेच्या बाबतीत खेळ चालणार नाही ह. नुकताच आम्ही मराठीला अभिजात दर्जा मिळवून दिलाय.’’

अल्बुकर्क म्हणाला, ‘‘अहो पण माझे नाव पोर्तुगीज आहे. मराठीचे काय सांगता?’’

स. सा. प्रधानजी म्हणाले, ‘‘साहेब तुम्ही पोर्तुगीजे? मग एवढी भारी मराठी कशी बोलता?’’

राजे बोलले, ‘‘स. सा. प्रधानजी, कुठल्या वेळी काय बोलायचं ही कधी कळणार तुम्हाला? अहो हे अल्फोनसे दी अल्बुकर्क. १५०९ साली तो भारताचा दुसरा पोर्तुगीज गव्हर्नर होता. त्यानेच भारतात हापूस आंबा आणला. पण काय हो अल्बुकर्क साहेब, तुम्ही तर पंधराव्या शतकात इथे होता, मग आता अचानक २०२५ साली कुठून आलात आणि हे हापूस आंब्याचे गाडलेले मुडदे उखडण्याचे काय काढलेत?’’

अल्फोनसे तिरकस हसत म्हणाला, ‘‘कुठलं हो राजे साहेब, गाडलेले मुडदे उखडणे, कोणाची तरी कबर खोदून काढणे हे आमचे काम नाहीच. माझा तर हा पुनर्जन्म आहे.’’

स.सा. प्रधानजी नरमाईने म्हणाले, ‘‘पण अहो अल्फोनसे साहेब, तुम्ही इतक्या वर्षापूर्वीचे काय काढताय? आणि शिवाय तेव्हा पोर्तुगीजांनी आमच्या लोकांना गुलाम म्हणून विदेशी बाजारात विकले. आमच्या इथली संपत्ती लुटून नेली. जहाजे भरून संपत्ती नेली, मसाले नेले. आम्ही कधीतरी काही मागायला आलो का? एक आंबा तो काय इथे सोडलात त्याची परतफेड मागायला आलात?’’

अल्फोनसे म्हणाला, ‘‘ट्रम्प टैरिफ मागतो ते तुम्हाला चालते. शिवाय इंग्रजांनी, फ्रेंचांनी असे सगळ्यांनी तुम्हाला लुटले. तुमच्याच देशातील काही लोकांनी तुमच्याच देशातील जनतेला लुटले तरीही तुम्ही खपवून घेता. त्यांना तुम्ही काही बोलत नाहीत. खरे तर ज्या ज्या कशावर बोलायला हवे त्या कशावरच तुम्ही बोलत नाहीत. भलतेच काहीतरी काढून बसता. मग आम्हीच आमचा हिस्सा मागितला तर बिघडते कुठे?’’

स.सा. प्रधानजी, ‘‘अल्बुकर्क साहेब, आधीच अवकाळी, अकाली, उन्हाळी का अवेळी असे कुठल्या तरी ‘ळी’ पावसाने आंब्याला झोडपले आहे. नुकसान भरपाई कशी कुठे करायची यावर आजच चर्चासत्र भरवणार आहोत. तुम्ही अजून फाटक्या चादरीत पाय घाला. शोभतं का तुम्हाला? एक काम करा, आपण चर्चा करू ना तुमच्या प्रस्तावावर. एखादी समिती बसवू की तुमच्या त्या हापूस आंब्याच्या चौकशीला. आहे काय अन नाही काय! कशाला काळजी करता? आम्ही आहोत ना. काये आमच्याकडे उन्हाळा फार असतो. एवढ्या उन्हाळयात आनंद देणारी एकमेव गोष्ट म्हणजे आंबा. त्यातल्या त्यात हापूस आंबा. त्यावर पण तुम्ही जर टॅक्स लावला तर कसं व्हायचं? मी काय म्हणतो, आपण चर्चा करू. बोलू. तुम्ही आमच्या साहेबांच्या पाहुणचाराला थांबा. जरा समुद्र किनारी फिरून या. मागच्या काही जन्मातील आठवतंय का बघा. आंबा आठवला तसा तुम्ही केलेले अत्याचार आठवतात का बघा. तुम्ही एकवेळ आमचा प्राण मागितला तर चालेल पण हापूस आंबा मागू नका. तो नावाने ‘आम’ असला तरी आमच्यासाठी ‘खास’ आहे.’’

अल्फोनसे साहेबांची मर्जी गृहीत धरून राजे साहेबानी त्यादिवशीचा कारभार संपला असे जाहीर केले होते. अल्फोनसेला काय ठाऊक की आपल्याकडील राजे, प्रधानजी चर्चा करण्यात माहीर आहेत. आपल्या समित्या वर्षोनुवर्षे चौकशी चालू ठेवण्यात निष्णात आहेत. मी तर असे ऐकले आहे की या हापूस आंब्याच्या चौकशीसाठी एका समितीचे काही सदस्य युरोपीय देशांमध्ये जाणार आहेत. त्यात कुठलेतरी एक प्रधानजी देखील आहेत. अल्फोनसेने चर्चा करण्याची तयारी दाखवली ना, आता त्याने पुढचे दहा जन्म घेतले तरी चालतील. हापूस आंबा आणि त्याचा टॅक्स काही त्याच्या हाती लागत नाही.

sarika@exponentialearing.in