– अॅड. गिरीश राऊत

आज मुंबईच्या बेस्ट या सार्वजनिक बस सेवेतील कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिसरा दिवस. इतर वेळी माणसे रस्त्यावर उतरतात. पण येथे नेहमी रस्त्यावर असणाऱ्या ड्रायव्हर कंडक्टरना घरी थांबावे लागले. पगारवाढ व इतर रास्त मागण्यांसाठी संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जनतेने सहानुभूती व पाठिंबा देण्याची गरज आहे.

सोबत रस्त्यावरील वाहतुकीत असलेली बेस्ट बसची महत्वाची भूमिका स्पष्ट करणारे पत्रक जोडले आहे. रस्त्यावर कमीतकमी जागा व्यापून सर्वाधिक प्रवाशांना सेवा देणाऱ्या बेस्टला मागील सुमारे शंभर वर्षांप्रमाणे अधिक वाव देण्याऐवजी बेस्टचे सन १९९५ पासुन खच्चीकरण करण्यात आले. ५५ उड्डाणपुलांपासुन आलेल्या सर्व योजनांमुळे मुंबईत प्रवासाला विलंब होऊ लागला. प्रदूषण वाढत गेले. त्या वेगाने वाहतुक देणाऱ्या बेस्ट बसच्या विरूध्द होत्या. पण प्रसारमाध्यमांद्वारे चलाखीने खोटा प्रचार करून, जनतेतील अज्ञानाचा गैरफायदा घेऊन, याचे खापर जिच्यावर अन्याय होत होता त्या बेस्ट बसवर फोडण्यात आले. मोटारींनी, मेट्रो- मोनोरेलच्या खांबांनी रस्ते व्यापणे नागरिकांना जलद बस सेवा देण्याच्या आड येते. बसची प्रवासी क्षमता त्यांच्याजवळ नाही.

बेस्टच्या संघटनांनी ५५ उड्डाणपुलांपासुन गेल्या २३ वर्षांत आलेल्या सर्व अशासकीय वाहतुक प्रकल्पांना विरोध करणे आवश्यक होते. कारण हे प्रकल्प बेस्ट व मुंबईच्या हिताचे नव्हते. या काळात नेते व नोकरशहांनी संगनमताने बेस्टच्या जमिनी विकल्या. याबाबतही संघटना गप्प राहिल्या. कर्मचारी फक्त स्वतःच्या नोकरीचा विचार करत होते. पण बेस्टच मृत्युपंथाला लावली जाते याबद्दल व्यापक विचार ते आजही करताना दिसत नाहीत.

आमच्यासारखी माणसे ९५ सालापासुन सार्वजनिक जलद बस सेवेचा सतत पुरस्कार करत आली. आम्ही ‘वांद्रा वरळी सी लिंक’ विरूध्द आंदोलन
करून भराव थांबवला. त्यामुळे २६ जुलैच्या अधिक मोठ्या प्रलयापासुन मुंबई वाचली. धोकादायक ‘गडकरी चौक सब वे’ विरूध्द आंदोलन करून आम्ही तो थांबवला व रद्द केला. या काळात संघटनांच्या लक्षात आणून देऊनही त्या बघ्याच्या भूमिकेत राहिल्या. ही आत्मकेंद्रित स्वार्थी वृत्ती शेवटी घात करते. अजूनही संघटनांनी आपले स्वातंत्र्यलढ्यातील मूळ ओळखून व्यापक विचार करावा. कर्मचाऱ्यांनी वाहतुक व्यवस्थापनातील बेस्टची भूमिका समजुन घेतली व जनतेला समजावून दिली तर त्यांच्यावरील अन्याय दूर होण्यास मदत होईल.

जगात सार्वजनिक बस सेवेचे महत्व मान्य झाले असताना शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ उत्कृष्ट सेवा देणाऱ्या बेस्टची अवहेलना होणे ही जनतेच्या दृष्टीने लाजिरवाणी गोष्ट आहे. दीर्घ मार्गावर धावणाऱ्या बसमधुन जाणारे सगळे प्रवासी धरले तर एका खेपेस एका बसमधुन शेकडो माणसे प्रवास करतात. लाखो माणसे रस्त्यांवर असतात. हे शहर तणावांनी भरले आहे. अशा परिस्थितीत मनाचे व शरीराचे स्वास्थ्य कायम ठेवणे व जनतेला सुरक्षित ठेवून अपघात टाळून वाहन चालवणे हे अत्यंत अवघड आहे. त्यात नगण्य वाहतुक क्षमता असून रस्ते व्यापणाऱ्या मोटारींना दिलेल्या चुकीच्या प्रोत्साहनामुळे भयंकर वायू व ध्वनीप्रदूषणाचा सामना करावा लागतो, प्रवासाला विलंब होतो. बेस्टचे ड्रायव्हर तुटपुंज्या पगारात कुटुबाची चिंता करत हे अग्निदिव्य रोज पार पाडतात.

या स्थितीत संपामुळे मुंबईकर वेठीस धरले गेले असे म्हणणे कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारे आहे. खरी गोष्ट ही आहे की प्रशासनाने व मुंबईकरांनी बेस्ट कर्मचार्यांना, विशेषतः ड्रायव्हरांना वेठीस धरले आहे. उन्हाळ्यात तर त्यांना भट्टीत भाजल्याचा अनुभव येतो. आंतरराष्ट्रीय शहर असल्याचा ढोल वाजवून काही लाख कोटी रूपयांचे अनावश्यक वाहतुक प्रकल्प मुंबईत गेल्या २३ वर्षांत केले गेले. मेट्रो – ३ भूयारी रेल्वेसारखा आता ५०००० कोटी रूपयांपर्यंत गेलेला व सुरूवातीसच १२००० कोटी खर्च दाखवलेला सागरी रस्ता हे मुंबईची समस्या वाढवणारे प्रकल्प केले जात आहेत. पण वाहतुक अभ्यासांनी वेळोवेळी सांगितले असूनही, प्रश्न सोडवणार असलेल्या बेस्टवर फक्त दोन हजार कोटी खर्च करण्यास टाळाटाळ केली जाते.

याबाबत शंभर वर्षे मोटारींच्या संशोधनात पुढे असलेल्या जर्मनी कसा वागतो ते पहा. ६ नोव्हेंबर २०१७ ला तेथील बाॅन शहरात झालेल्या युनोच्या पर्यावरण परिषदेत जागतिक हवामान संघटनेने तापमान वाढतच राहणार एव्हढा कार्बन वातावरणात जमा झाल्याचे जाहीर केले. याचा अर्थ मानवजातीचे उच्चाटन होणार. याला मुख्य कारण मोटार आहे हे लक्षात घेऊन जर्मनीने मोटारविरोधी धोरण बनवले. देशात उत्कृष्ट सार्वजनिक बस सेवा मोफत करण्यात आली. आपल्या देशात मात्र मोटारींना पेट्रोल, डिझेल, प्लास्टिक पुरवण्यासाठी कोकण उध्वस्त करणारी नाणार रिफायनरी आणली जाते.

मुंबईसारख्या प्रतिकूलतेत काम करणाऱ्या बस ड्रायव्हरला जर्मनी वा अन्य देशांनी मासिक एक लाख पगार आनंदाने दिला असता.

आपल्या देशात तर त्याच वर्षी जगात सर्वाधिक सुमारे २५ लाख माणसे वायूप्रदूषणाने बळी पडली. सर्वाधिक प्रदूषित शहरे भारतात आहेत, त्यात मुंबईचा वरचा क्रमांक आहे. आपण मागच्या पिढ्यांनी दिलेली ठेव असलेली व आज जास्तच गरज असलेली बेस्टची उत्तम सेवा बरबाद करत आहोत.

याला नेते, नोकरशहांइतकीच, प्रतिष्ठा व ऐषआरामाच्या खुळ्या कल्पना बाळगणारी जनतादेखील जबाबदार आहे.

(लेखक भारतीय जीवन व पर्यावरण रक्षण चळवळीचे निमंत्रक आहेत.)

Story img Loader