ही घटना आहे १९९२ सालची. आज ही घटना आठवण्याचे कारण म्हणजे प्रसिद्ध चित्रपट अभिनेता भगवानदादा, आज त्यांचा जन्मदिवस! आज भगवानदादा ११० वर्षांचे असते… तर घडले असे, मनोज शर्मा या मित्राच्या घरी नेहमीचे जाणे- येणे होते. तो दादर पूर्वेला शिंदेवाडीत राहायचा. त्यावर्षी दहिहंडीच्या दिवशी त्याच्या घरी सहज गेलो होतो. खरे तर दादर पश्चिमेला असलेली रानडे रोडवरच्या व्यापाऱ्यांच्या सर्वात मोठी उंच दहिहंडीचे फोटो शूट करायचे होते. (त्यावेळेस तीच मुंबईतली सर्वात उंच आणि सर्वाधिक पैसे असणारी दहिहंडी असायची) त्या दिवशी नेमकी साप्ताहिक सुट्टी होती. दहिहंडी संध्याकाळी चारपर्यंत शूट केली आणि भूकेल्या अवस्थेत मनोजच्या घरी पोहोचलो… मनोजच्या आईने केलेल्या पोह्यांवर ताव मारत असताना बाहेर दहिहंडीसाठी मोठ्या स्पीकरवर लावलेले ‘नाम बडे और दर्शन छोटे’ कानावर आले. त्या गाण्यावर ठेका धरत मी म्हणालो, भगवान दादांचे आणि सी रामचंद्र अर्थात रामचंद्र चितळकरांचे हे गाणे अजरामर आहे… जेव्हा जेव्हा ताल, लय, ठेका असे एन्जॉयमेंट असणार तिथे तिथे हे गाणे हमखास वाजणारच!
मनोजचे बाबा अरविंद शर्मा हे सिनेटीव्ही आणि नाट्य कलावंत होते. त्याचबरोबर ते त्यावेळचे प्रसिद्ध वृत्तपत्रलेखकही होते. वृत्तपत्रलेखक संघाचे कार्यालय ही त्यांच्याच इथे शिंदेवाडीतील महापालिका शाळेत होते. ते म्हणाले… हे गाणं लागलं की दादांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा लागतात… मी विचारलं, तुम्ही पाहिलंय त्यांना, भेटलायत त्यांना? तर ते म्हणाले, अरे आता हे गाणं तेही ऐकत असतील आणि डोळ्यांना धार लागली असेल, अभिमानाने त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले असतील! ‘पण ते इथे कुठायत?’ अरविंद शर्मा म्हणाले, ‘अरे बाजूच्या चाळीत तर राहातात. रोज भेटतो त्यांना.’ भगवानदादा दादरच्या चाळीत छोटेखानी खोलीत राहातात हा धक्काच होता माझ्यासाठी. त्यांच्या विपन्नावस्थेबद्दल ऐकून खूपच वाईट वाटलं. पण त्यांना भेटण्याची खूप आंतरिक ऊर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. अरविंदजींना म्हटलं की, कधीतरी सहज भेटायला आवडेल… तर ते म्हणाले, कधी कशाला आताच जावूया!
त्यानंतरच्या पाचच मिनिटांत आम्ही भगवानदादांच्या घरासमोर होतो. अरविंदजींसोबत कुणी भेटायला आलंय हे कळल्यावर त्यांनी, ‘कोण?’ एवढंच विचारलं. अरविंदजींनी ओळख करून दिली. कोकणातले ना… असं म्हणून आस्थेने चौकशी केली. आणि मग गप्पांना सुरुवात झाली. मी त्यांना सुरुवातीलाच कल्पना दिली की, जी प्रश्नोत्तरे असतील ती मुलाखत म्हणून प्रसिद्ध करणार. चालेल का? त्यावर ते म्हणाले, अरे आता कोण येतं बोलायला? अरविंद येतो. राजा येतो. (अभिनेते राजा मयेकरांचा उल्लेख होता तो) थोडेसे निराश वाटत होते…. पण गप्पांना सुरुवात झाली आणि मग रंगत वाढत गेली, त्यासोबत त्यांची ऊर्जाही. खूप भरभरून बोलत होते. चित्रपटांबद्दल, त्यांच्या कारकीर्दीबद्दल! त्यांना हे असं भरभरून बोलताना पाहून खूप बरं वाटत होतं. एकेकाळी सिल्व्हरस्क्रीन गाजवलेला अभिनेता जेव्हा लोकांच्या नजरेआड जातो तेव्हा त्याच्या वेदना काय असतात, त्याची कल्पना त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती.
साहजिकच होतं की, गप्पांच्या ओघात आमची गाडी नाम बडे और गाण्याजवळ येवून थांबली. त्या गाण्याचा उल्लेख करताच अंगात ऊर्जा सळसळल्यासारखे भगवानदादा बोलू लागले… “दिवसभर सी. रामचंद्र आणि मी इथेच बसलो होतो गाणे घेऊन. अलबेला करतानाचे दिवसच काही वेगळे असायचे. आम्ही एकदम चार्ज्ड असायचो. दिवस मावळतीला आला तरी आमची गाण्याची भट्टी काही जमत नव्हती. शेवटी वैतागून मी म्हणालो, जाऊदेत आता किमान खाली जाऊन पाय मोकळे करून येऊ… आम्ही खाली उतरलो. आताशा सारखी तेव्हा या दादासाहेब फाळके रोडला गर्दी नसायची फार. दादर स्टेशनकडे जाऊन आम्ही हळूहळू चालत परत येत होतो. तेव्हा आमच्या गल्लीत शिंदेवाडीकडे वळण्याआधी उजवीकडे मेहतर समाजाची एक वस्ती होती… बहुतांश लोक मुंबईमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करणारे होते. संध्याकाळी काम आटोपून ते सगळे लोकसंगीत गात आणि वाजवत बसले होते. सी. रामचंद्र आणि मी दोघांच्याही कानांनी ती लय, तो ताल तिथेच पकडला… दोघांचीही पावले थबकली होती. आम्ही एकमेकांचे हात हातात पकडले आणि एकमेकांकडे पाहिले. जे हवे होते ते सापडले होते. तिथून धावतच दोघेही घरी आलो. रामचंद्र हार्मोनियमवर बसले आणि जन्माला आले… नाम बडे और दर्शन छोटे! “
थेट भगवानदादांकडूनच गाजलेल्या त्या गीताची कूळकथा ऐकताना अंगावर शहारा आला होता… गप्पा संपल्या आणि खाली उतरत होतो त्यावेळेस अरविंदजींना ते म्हणाले, चल मीही खाली येतो जरा पाय मोकळे करतो. खाली उतरतो, फार चालणार नाही. जरा मोकळा श्वास घेतो. त्यांच्याचसोबत खाली उतरलो. आणि चाळीच्या बाहेर आलो. मैदानाच्या दिशेने तोंड करून उभे होतो, तेव्हा दहिहंडी संपली होती… तरीही रेंगाळलेली मुलं मैदानात फेर धरून नाचत होती. आणि त्याचवेळेस स्पीकरवर गाणे लागले… नाम बडे और… मी वळून भगवानदादांकडे पाहिले… त्यांच्या अंगावर शहारा आला होता आणि डोळ्यांत चमक होती!