इंटरनेट म्हणजे रोज लाखोंच्या संख्येने नवीन मजकूर तयार करण्याची आणि व्हायरल करण्याची जागा. असाच एक व्हिडीओ गणेशोत्सावामध्ये व्हायरल होत होता. भारतीय डिजीटल पार्टीच्या (नेटकऱ्यांच्या भाषेत ‘भाडिपा’) या व्हिडीओचे नाव होते ‘आई, बाप्पा आणि मी (भाग २): सोसायटीचा गणपती’. खरं तर मागील वर्षी ‘भाडिपा’ने ‘आई, बाप्पा आणि मी’ नावाने एक व्हिडीओ तयार केला होता ज्यामध्ये टिपीकल मराठी आई आणि मुलांच्या माध्यमातून गणपतीमध्ये माय-लेकांची तू-तू मैं-मैं कशी सुरु असते यासंदर्भातील मजेशीर चित्रण करण्यात आले होते. मागील वर्षी ज्याप्रमाणे ‘आई आणि मी’ सिरीजमधील तो व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला होता तसाच या वर्षी सोसायटीच्या गणपतीच्या थीमवर आधारित व्हिडीओने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. मात्र आता गणेशोत्सवानंतरही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे ते म्हणजे या व्हिडीओमधील आई आणि मुलाच्या जोडीचे गाजलेले संवाद. इंटरनेटवर सतत वावरणाऱ्या मराठी नेटकऱ्यांना ‘शास्त्र असतं ते’ आणि ‘काsssय?’ हे दोन मीम्स सध्या खूप व्हायरल झाले आहेत.
मराठी भाषेत डिजीटल कनटेंट तयार करणारा आणि आता अनेकांना ओळखीचा झालेला ग्रुप म्हणून ‘भाडिपा’कडे पाहिले जाते. मागील वर्षी ‘भाडिपा’ने ऐन गणपतीमध्ये ‘आई, बाप्पा आणि मी प्रत्येक घरचा गणपती’ या नावाने एक जवळजवळ सात मिनिटांचा व्हिडीओ आपल्या वेगवेगळ्या सोशल मिडीया फ्लॅटफॉर्मवर पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री रेणूका दफ्तरदार यांनी आईची तर अलोक राजवाडेने मुलाची भूमिका साकारली होती. टिपीकल मराठी घरामध्ये गणेशोत्सवादरम्यान घरी गणपती बाप्पा आणण्याची तयारी कशी सुरु असते यासंदर्भातील हा व्हिडीओ होता. यामध्ये आईचे ‘हे करु नको ते करु नको’ पासून ते ‘असं कर तसं कर’पर्यंतच्या सर्व सूचनांचा भडीमार दाखवण्यात आला आहे. तर दुसरीकडे आईच्या या अनोख्या आणि तरुणाईला बेसलेस वाटेल अशा ‘शास्त्राला’ वैतागलेला पण गणरायाच्या स्वागतासाठी आईचं सगळं काही ऐकून घेणारा मुलगा अशी जुगलबंदी चांगली रंगली. म्हणूनच या व्हिडीओला आजच्या तारखेला सहा लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत.
पहिल्या व्हिडीओच्या अभूतपूर्व यशानंतर दुसरा व्हिडीओ ‘भाडिपा’ने या गणेशोत्सवादरम्यान १८ सप्टेंबर रोजी युट्यूब चॅनेलवर पोस्ट केला. गणेशोत्सवाच्या या दोन सर्वात गाजलेल्या व्हिडीओ दरम्यान ‘भाडिपा’ने ऑक्टोबरमध्ये ‘आई-बाबा, दिवाळी आणि मी’ आणि जानेवारीमध्ये ‘आई,प्रायव्हसी आणि मी’ हे दोन व्हिडीओ पोस्ट केले होते. या दोन्ही व्हिडीओंना पाच लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. यापैकी केवळ ‘आई-बाबा, दिवाळी आणि मी’ या व्हिडीओतील कलाकार वेगळे होते. ‘आई आणि मी’ ही वेब सिरीज नेटकऱ्यांना तर आवडलीच पण जणकारांनीही या वेब सिरीजला ‘लाइक’ केलेय. म्हणूनच या वेब सिरीजला झी टॉकीजच्या कॉमेडी अवॉर्ड्स सोहळ्यात ‘बेस्ट मराठी वेब सिरीज’चा पुरस्कारही मिळाला.
यावर्षी पुन्हा जुन्याच कलाकारांना घेऊन तयार केलेला सोसायटीमधील गणपती या विषयावरील व्हिडीओ ‘भाडिपा’ने गणेशोत्सवामध्ये पोस्ट केला. सोसायटीचा गणपती बाप्पा या थीमवरील व्हिडीओला आधीच्या सर्व व्हिडीओपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या सात दिवसांमध्ये युट्यूबवर साडेतीन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओमध्ये ‘आई, प्रायव्हसी आणि मी’ मध्ये दिसलेली मृण्मयी गोडबोले आणि तिचा ‘बाबू’ही चांगलाच भाव खाऊन गेला.
‘आई, बाप्पा आणि मी (भाग २): सोसायटीचा गणपती’
‘आई, बाप्पा आणि मी’
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या व्हिडीओतील संवाद खूपच व्हायरल झाले असून त्यावर मीम्स तयार केले जात आहे. ‘भाडिपा’च्या फेसबुक, इन्स्टाग्राम पेजवरून चाहत्यांनी तयार केलेले मीम्स शेअर केले जात आहे. यात प्रामुख्याने रेणूका दफ्तरदार यांनी साकारलेल्या आईचा ‘शास्त्र असत ते’ हा संवाद खूपच लोकप्रिय झाला आहे. अनेकांनी सोशल नेटवर्कींगवरून ‘भाडिपा’कडे हा संवाद असणारी शर्ट आणि मर्चंडाइज बाजारात आणावीत अशीही मागणी केली आहे. व्हिडीओमध्ये अलोकने साकारलेल्या मुलाच्या भूमिकेला पडणाऱ्या प्रश्नांना किंवा न पटणाऱ्या किंवा ज्याला काही लॉजिक नाहीय अशा गोष्टींसंदर्भातील प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी दरवेळी शास्त्र असतं ते हे ठरलेलं उत्तर देणारी आई नेटकऱ्यांना खूपच आवडलेली दिसत आहे. आणि आईच्या या उत्तराला मुलाने अगदी आश्चर्यचकित होऊन विचित्र हावभावात विचारलेला ‘काssssय?’ हे प्रश्नही तितकाच मजेशीर वाटतो. त्यामुळेच अलोकचा फोटो असलेले ‘काssssय?’वाले मिम्सही व्हायरल होताना दिसत आहेत. अर्थात एखादे तर्कहीन वाक्य ऐकल्यावर सर्वसामान्यांची जी रिअॅक्शन असेल तशीच रिअॅक्शन असणारे हे मिम्स सध्या व्हायरल होत असले तरी आईच्या शास्त्र असते ते समोर हे मिम्स फिकेच आहेत. ‘भाडिपा’ने या व्हायरल ट्रेण्डसाठी #ShastraAstaTe आणि #Kaaay हे दोन हॅशटॅगच तयार केले आहेत. पाहुयात ‘भाडिपा’ने त्यांच्याच सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केलेले काही शास्त्रीय मीम्स…
आईचं टिव्हीचं शास्त्र…
या शास्त्राचा सर्वांनीच एकदा अनुभव घेतला असेलच
हे शास्त्र फक्त पुण्यापुरतचं आहे की???
लहानपणीपासून ऐकतोय टीव्हीबद्दलची ही गोष्ट त्यातही आहे शास्त्र
कमेंट करण्यामागेही शास्त्र…
जे पुणेकर नाही त्यांच असचं होतं…
खरचं असेही लोक असतात?
नगर स्पेशल शास्त्र
(सर्व फोटो आणि व्हिडीओ सौजन्य: भाडिपा )
सध्या व्हॉट्सअप स्टेटस, फेसबुक टाइमलाइनवर आणि इन्स्टाग्रामवरही या मराठमोळ्या मिम्सशी नेटकरी चांगलेच रिलेट होताना दिसत आहे. या व्हिडीओचे आणि मिम्सचे यश पाहता भविष्यात ‘भाडिपा’कडून ‘आई मी आणि…’ या थीमवर आधारित व्हिडीओची नेटकऱ्यांना नक्कीच प्रतिक्षा आहे.
– स्वप्निल घंगाळे
swapnil.ghangale@loksatta.com