– हर्षल प्रधान

शिवसेना भाजपा युती शेवटी झाली हे उत्तमच झाल कारण अविचारी लोक एकीकडे एकत्र येत असताना ३० वर्षे हिंदुत्वाच्या विषयावर युती झालेल्या पक्षांनी का म्हणून युती करायची नाही ? हा महत्वाचा प्रश्न नव्हे का ?

शिवसेना भाजपा युती होउ नये म्हणून जे विरोधी पक्षातील लोक देव पाण्यात बुडवून बसले होते त्यांच्या अंगाची आता लाही लाही झाली असेल त्याची परीणीती आता शिवसेनेवर टिका करण्यात होईल यात शंकाच नाही. पण त्याची पर्वा शिवसैनिकांनी करण्याची गरज नाही.

शिवसेनेला आत्तापर्यंत दुय्यम स्थान दिलेल्या भाजपाला शेवटी मान खाली घालून मातोश्री वर यावच लागल ना? बर युती करतानाही सन्मानानी युती व्हावी हिच शिवसैनिकांची मनोमनी ईच्छा होती ती फलद्रूप झाली अस म्हणायला पाहिजे.

उध्दवसाहेबांनी युती तुटल्याची घोषणा केली त्यावेळची पार्श्वभूमी काय होती? तर भाजपा नेते मस्तीत चालत होते ती मस्ती तर उतरलीच ना ?
बर शिवसेनेचे विरोधाचे मुद्दे काय होते? तर ते सर्व सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे आणी अस्मितेचेच होते ना.

१) शिवसेनी पहिला विरोध लोकसभेत केला होता तो केंद्रशासनाच्या जमीन अधिग्रहण कायद्याला विरोध…

या कायद्यामुळे बारमाही घेणाऱ्या सुपीक जमिनी, जमीन मालकांना कुठलीही नोटीस न देता सरकार अधिगृहीत करू शकणार होती.
शिवसेनेच्या विरोधाचा परीणाम होउन ह्या कायद्यात बदल झाला आणी जमीन मालकाच्या सम्मत्तीची गरज असल्याच कलम टाकल गेलं.

२) राम मंदिर तातडीने व्हावे

आता राम मंदिराच्या परीसरातील वादातीत जमीन हिंदूंच्या ताब्यात मिळणार आहे आणि राम मंदिराच्या बांधणीला लवकरच सुरुवात होण्याची चिन्हे दृष्टीपथात आलीत.

३) कोकणातील नाणार येथील विनाशकारी प्रकल्प नाणारवासीयांच्या विरोधाला न जुमानता पुढे रेटण्याचा निर्णय शासनानी घेतला होता. याला शिवसेनेनी विरोध केला होता तो मान्य करून हा प्रकल्प इतरत्र, लोकेच्छा जाणून घेउन हलवण्याचा निर्णय.

४) मुंबई ठाण्यातील ५०० चौफूट घराला मालमत्ता करातून पूर्ण सुटका करण्याचा निर्णय शिवसेनेनी घेतला त्याची फाईल राज्यसरकारनी दाबून ठेवली होती त्याला मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला.

५) देशाच्या सुरक्षिततेत हलगर्जीपणा होतोय त्यासाठी कठोर उपाययोजना योजायला पाहिजेत यासाठी सरकार विरूध्द शिवसेनेनी टिका केली होती.
या भावनेचा आदर केला जाईल याची ग्वाही सरकारकडून मिळाली.

६) शेतकऱ्यांना सरकारनी जाहीर केलेली मदत मिळत नसल्याची खंत शिवसेनेनं व्यक्त केली होती. त्याबाबत सरकारमधील दोन्ही पक्षांचे नेते प्रत्येक विभागात जाऊन याची पूर्तता काटेकोरपणे करण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

७) पंतप्रधान पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नव्हते त्याविरुद्ध शिवसेनेनी टिका केली. त्याचीही काटेकोरपणे अमलबजावणी केली जाईल याची ग्वाही सरकारनी दिली.

खरतर हे सर्व मुद्दे शिवसेनेच्या फायद्याचे आहेत का? नाही तर हे सर्व प्रश्न कष्टकरी, शेतकरी, भूमीपूत्रांचे प्रश्न आहेत. आज युती करण्याची तयारी उध्दवसाहेबांनी दाखवल्यामुळे हे प्रश्न मार्गी लागले तर शिवसेनेचे काय चुकले?

खरतर भाजपावर, नरेंद्र मोदींवर शिवसेना सातत्याने जहरी टिका करत आली आहे अस असूनही भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यां सह भाजपाच्या नेते मंडळीं बरोबर मातोश्रीवर दोन वेळा आले आणी शिवसेनेच्या सर्वसामान्य माणसांच्या हिताच्या प्रश्नांना मान्यता दिली हे कशाचे द्योतक ? हा तर उध्दव नितीचा विजयच नव्हे का?

उद्धवसाहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है….

(लेखक शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख आहेत)

Story img Loader