– कीर्तिकुमार शिंदे

शेवटी जे अपेक्षित होतं, ते झालंच. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी-शहा सरकारचे कपडे उतरवण्याचा जो एककलमी कार्यक्रम आपल्या प्रचारसभांमधून राबवला त्यामुळे महाराष्ट्रातील आणि देशातीलही भाजप बिथरला आहे. राज ठाकरेंना रोखण्यासाठी भाजप (आणि शिवसेनेनेही) केलेले सर्व प्रयत्न फोल ठरताना दिसत आहेत. आता एकच पर्याय त्यांच्याकडे शिल्लक राहिला आहे, आणि तो म्हणजे राज यांच्या राज यांच्या बदनामीचा. हाच प्रकार भाजपने पाच वर्षांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत केला होता.

शिवाजी पार्कवरील गुढीपाडव्याच्या सभेनंतर गेल्याच आठवड्यात राज यांनी नांदेड, सोलापूर, इचलकरंजी, सातारा, खडकवासला-बारामती आणि महाड या सहा ठिकाणी प्रचार सभा घेतल्या. हजारो लोकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सभांमधून त्यांनी मोदी-शहा यांनी पांघरलेला राष्ट्रभक्तीचा बुरखा टराटरा फाडला. त्यानंतर काल (मंगळवार २३ एप्रिल) मुंबईतील काळाचौकी येथे राज यांची सभाच होऊ नये, यासाठी भाजप-शिवसेनेने खूप प्रयत्न केले. विशेषत: शिवसेनेने. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार, राज यांची मुंबईतल्या भांडूप येथे २३ एप्रिलला तर काळाचौकी येथे २४ एप्रिलला सभा होणार होती. मात्र, राज यांची सभा काळाचौकीत होऊच नये, यासाठी शिवसेनेने २४ एप्रिलच्या दिवसासाठी या परिसरातील सर्वच्या सर्व मैदानं आरक्षित करून टाकली. त्यामुळे मनसेला काळाचौकीत २४ एप्रिलला सभा घेण्यासाठी मैदानच शिल्लक राहिलं नाही. अखेर, काळाचौकीची सभा २३ एप्रिलला आणि भांडूपची सभा २४ एप्रिलला घेण्याचं ठरलं आणि हा तिढा सुटला. शिवसेना रडीचा डाव खेळली. पण शिवसेनेचं पितळ उघडं पडलं. आता शिवसेना काळाचौकीतल्या सर्व मैदानांवर आज २३ एप्रिलला कोणाकोणाच्या सभा आयोजित करते ते पाहायला मजा येईल!

काळाचौकीला झालेल्या सभेत राज यांनी त्यांच्या गेल्या सहा-सात सभांतील सर्व मुद्यांची उजळणी केली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. गेल्या आठवडाभरात त्यांच्यावर भाजप नेत्यांकडून आणि ट्रोल्सकडून झालेल्या टीकेचा समाचारही त्यांनी घेतला. ‘राज हे बारामतीचे पोपट आहेत’, ‘राज यांचे बोलविते धनी पवार आहेत’ या टीकेला प्रत्युत्तर म्हणून राज यांनी मोदींनी कशी पवारांवर स्तुतीसुमनं उधळली होती, याचे काही व्हिडिओ दाखवले. ते पाहून मोदींनाही पवारच चालवतात की काय, अशी शंका भाजप समर्थकांच्या मनातही निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही! अर्थात, पवारांचा राजकीय मोठेपणा मान्य करण्याचं राजकीय शहाणपण मोदींमध्ये असलं तरी त्यांच्या भक्तांमध्ये-ट्रोल्समध्ये ते असू शकत नाही. त्यामुळेच तर कांग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी या आपल्या राजकीय विरोधकांवर टीका करायचं सोडून भाजप समर्थक फक्त आणि फक्त या निवडणुकीत एकही उमेदवार उभा नसलेल्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. ही वेळ भाजपवर का आली, यासाठी राज ठाकरेंनी उपस्थित केलेले प्रश्न आणि मुद्दे एकदा समजून घ्यायला हवेत.

– २०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजप सत्तेत आल्यास “प्रत्येक भारतीयाच्या बॅंक खात्यात १५ लाख रुपये जमा केले जातील, हे आश्वासन म्हणजे ‘चुनावी जुमला’ होता”, हे अमित शाह यांचं वक्तव्य राज ठाकरे एका मुलाखतीच्या व्हिडिओच्या आधारे लोकांना दाखवत आहेत.

– “शेतक-याने आत्महत्या केली तर तो निवडणुकीचा मुद्दा, मात्र सैनिकांची हत्या झाली तर तो निवडणुकीचा मुद्दा का नाही” हे नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य दाखवून मोदी निर्लज्जपणे सैनिकांचा-शहिदांचा वापर राजकीय प्रचार करण्यासाठी करत आहेत, हे राज ठाकरे लोकांना पटवून देत आहेत.

– “सीमेवर जो सैनिक असतो त्यापेक्षा व्यापारी अधिक हिंमतवान असतो” हे मोदी यांचं वक्तव्य दाखवून मोदींच्या मनात सैनिकांविषयी खरोखरच किती तळमळ आहे, हा प्रश्न राज लोकांना विचारत आहेत.

– पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या नावाने मत देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फर्स्ट टाइम व्होटर्स’ना करत आहेत. अशा प्रकारची आवाहनं करताना मोदी शहीद जवानांच्या फोटोंचा बॅकड्रॉप म्हणून वापर करत असल्याचे व्हिडिओ राज लोकांना जाहीर सभांमधून दाखवत आहेत.

– नरेंद्र मोदी यांच्याच कार्यकाळात देशाचे सर्वाधिक जवान मारले गेल्याचा आरोप राज ठाकरे प्रत्येक सभेत करत आहेत.

– बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, महिलांवरील अत्याचार यांसंबंधीची आकडेवारी राज जाहीरपणे मांडत आहेत. गेल्या दोन वर्षांतील आकडेवारीच मोदी सरकार उघड करत नसल्याचा साधार आरोपही राज पुन्हा पुन्हा करत आहेत.

– अमोल यादवसारख्या विमाननिर्मितीचं स्वप्न बाळगणा-या तरुणाचं उदाहरण देऊन राज ठाकरे मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्र यांसारख्या सरकारी कार्यक्रमांवर जोरदार टीका करत आहेत.

– हरिसालसारखं डिजिटल व्हिलेज किंवा धसईसारखं कॅशलेस व्हिलेज येथील सत्य परिस्थिती राज ठाकरे लोकांना स्क्रीनवर दाखवत आहेत.

– सोशल मीडियावर नमोभक्त कसा खोटारडा प्रचार करत आहेत, हे राज ठाकरे पुराव्यानिशी दाखवत आहेत. काळाचौकीच्या सभेत तर त्यांनी गिरणगावातील एका कुटुंबालाच लोकांसमोर आणलं. या कुटुंबाचा एक फोटो ‘मोदी हैं तो मुमकीन हैं’च्या जाहिरातीसाठी त्यांच्या परवानगीशिवाय ‘मोदी फार न्यू इंडिया’ या फेसबुक पेजवर टाकण्यात आल्याचं राज यांनी उपस्थित लोकांना सिद्ध करून दाखवलं.

राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही प्रश्नाला किंवा मुद्द्याला भाजपकडून आतापर्यंत समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही. आणि हीच गोष्ट राज ठाकरे प्रत्येक सभेत आणि त्यांच्या प्रत्येक मुलाखतीत वारंवार सांगत आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत ज्या गोष्टींचा म्हणजे- आर्थिक विकास, दोन कोटी बेरोजगारांना रोजगार, शेतक-यांना हमीभाव आणि दुप्पट उत्पन्न, काळा पैसा भारतात परत आणणं, १५ लाखांचं आश्वासन यांचा आता मोदी-शाह यांच्यासह भाजपचा एकही नेता साधा उल्लेखही करत नाही. सरकारने केलेल्या विकासकामांचाही भाजपच्या प्रचारसभांमध्ये विशेष उल्लेख केला जात नाहीए. नोटाबंदीसारखा महत्वाचा निर्णय किंवा जीएसटी करप्रणाली यांबद्दल चकार शब्द उच्चारला जात नाहीए.

भाजपचा संपूर्ण प्रचार हा पुलवामा-बालाकोट-सर्जिकट स्ट्राइक-शहीद जवान-राष्ट्रभक्ती याभोवती सुरु आहे. आणि अशा वातावरणात “पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान भारतात नरेंद्र मोदी निवडून यावेत अशी इच्छा का व्यक्त करताहेत” असा सवाल राज उपस्थित करत आहेत. युद्धज्वराशिवाय नरेंद्र मोदी पुन्हा सत्ताधारी बनू शकत नाहीत, हे राज ठाकरे अनेक पुराव्यांनिशी लोकांच्या मनावर ठसवत आहेत.

राज ठाकरेंनी मोदी-शहांविरोधात काढलेल्या व्यंगचित्रांची भ्रष्ट नक्कल करणं, राज यांना बारामतीचा पोपट म्हणून हिणवणं किंवा त्यांच्या नियोजित सभा होऊ न देणं हा भाजपसाठी राज यांना रोखण्याचा पहिला टप्पा होता. पहिल्या टप्प्यातला भाजपचा हा प्रयत्न राज ठाकरे यांनी उधळून लावल्यानंतर आता भाजपने त्यांचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं आहे. हे ब्रह्मास्त्र आहे राज य़ांच्या बदनामीचं. त्यासाठी राज यांच्या जीवनातील जुन्या जुन्या गोष्टी उकरून काढल्या जात आहेत. मनसेच्या स्थापनेनंतर राज यांनी तेव्हाचे सत्ताधारी पक्ष- काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याविरोधात केलेल्या भाषणांच्या क्लिप्स भाजपच्या आयटी सेलकडून जाणीवपूर्वक पसरवण्यात आल्या. पण आता तर राज यांच्याकडेच काळा पैसा प्रचंड असल्यामुळे त्यांचं नोटाबंदीच्या वेळी खूप नुकसान झाल्याचे मेसेजेस फिरवले जात आहेत. इतरही अतिरंजित आरोप केले जात आहेत.

राज ठाकरे आपल्या प्रचार सभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचा विध्वंस करत आहेत. या प्रतिमानिर्मितीसाठी गेली अनेक वर्षं भाजपने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. त्यासाठी सरकारी निधीतूनही प्रचंड जाहिरातबाजी केली गेली. राज यांच्या सध्याच्या ‘सत्याग्रही’ प्रचारसभांमुळे भाजपची ही सर्व मेहनत वाया जाऊन मोदींची प्रतिमा समाजमनातून हळहळू पुसली जात आहे. त्यामुळेच तर खोटी आश्वासनं, खोटी आकडेवारी आणि फेक प्रचाराचं शेण खाणा-या भाजपला, मनसेचं तोंड हुंगावं लागत आहे.

Story img Loader