Blog : एखादा चित्रपट जेव्हा राजकीय वळण घेतो तेव्हा त्या कलाकृतीचं एका आंदोलनात रूपांतर होतं, हे आपण गेल्या काही वर्षांत पाहिलं आहे. याआधीसुद्धा असे प्रकार होत होते, पण विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’मुळे राष्ट्रवादावर आधारित अशा चित्रपटांचा जो एक ट्रेंड सुरू झाला आहे तो दिवसेंदिवस भयानक वळण घेत आहे. कोणता चित्रपट प्रोपगंडा नसतो? याचं उत्तर चटकन आपण कुणीच देऊ शकणार नाही, कारण प्रत्येक चित्रपटाच्या माध्यमातून लेखक, दिग्दर्शक काहीतरी सांगू पाहत असतो, त्यामुळे अमुक एक चित्रपटच प्रचारकी आणि बाकीचे नाहीत हे आधी आपण डोक्यातून काढलं पाहिजे. ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रचारकी जरी असला तरी तो अत्यंत उत्तम रिसर्च केलेला, तथ्यांच्या आधारावर एक बोल्ड स्टेटमेंट करणारा चित्रपट होता हे अगदी कुणीही मान्य करेल.

नुकताच आलेला ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट मात्र ‘द कश्मीर फाइल्स’ने निर्माण केलेल्या वातावरणाचा गैरफायदा घेऊन राजकीय तसेच धार्मिक मतभेद निर्माण करणारा, त्यांना प्रोत्साहन देणारा आणि समाजात एक तेढ निर्माण करणारा चित्रपट आहे हे मी अगदी ‘डंके की चोटपर’ सांगू शकतो. नुकताच मुंबई ते डोंबिवली लोकलने प्रवास करताना आलेला एक अनुभव हा चित्रपट सामान्य लोकांच्या मनावर किती खोलवर परिणाम करतो हे मला सांगून गेला. तसं पाहायला गेलं तर ही फार किरकोळ गोष्ट आहे, पण ‘द केरला स्टोरी’मुळे याच छोट्याछोट्या गोष्टींतून लोकांच्या मनामधील धार्मिक द्वेष जाणवायला हा एक अनुभवच माझ्यासाठी पुरेसा आहे. धर्म, जात वगैरे सगळं सोडा पण हा प्रसंग अनुभवल्यानंतर आपण माणूस म्हणून कोणत्या दिशेने वाटचाल करतोय याची प्रकर्षाने जाणीव झाली.

Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Padmashri Physicist Dr Rohini Godbole Memoirs by Researcher Dr Radhika Vinze
विज्ञानव्रती
readers reaction on different lokrang articles
पडसाद : हा तर बुद्धिभेद
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…
jyachi tyachi love story review by sabby parera
ज्याची त्याची लव्ह स्टोरी!
Best American Short Stories O Henry Prize Stories author book
बुकबातमी: कथेतला ‘तृतीयपुरुष’ हरवला आहे?
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना

आणखी वाचा : ‘The Kerala Story’ला ‘The Kashmir Files’प्रमाणे डोक्यावर घेणाऱ्यांना ‘हे’ सत्य माहीत आहे का?

कोविडच्या कृपेमुळे नोकरीनिमित्त मुंबई ते डोंबिवली हा मोठा प्रवास आठवड्यातून मी साधारण एक ते दोन दिवस करतो. आता मुंबईचा प्रवास म्हंटलं की, वेगवेगळ्या तऱ्हेची माणसं आपल्या आसपास असतात. या प्रवासादरम्यान बाजूला बसलेली किंवा उभी असलेली व्यक्ती अनोळखी असली तरी हलकं स्मितहास्य किंवा किरकोळ गप्पा या होताना दिसतातच, पण नुकताच आलेला अनुभव पाहता मुंबई लोकलचं हे वातावरण कदाचित कलुषित होईल का असा प्रश्न मनात आला.

मी नेहमीप्रमाणेच ऑफिस उरकून संध्याकाळच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आलो. सध्या एसी लोकल्स सुरू झाल्याने शक्यतो त्याच गाडीने प्रवास करायचा मी प्रयत्न करतो. दोन दिवसांपूर्वी अशाच संध्याकाळच्या एसी लोकलसाठी प्लॅटफॉर्मवर थांबलो होतो. गाडी आली, मी गाडीत चढलो अन् खिडकीजवळची जागा पकडली. एसी लोकल जरी असली तरी या लोकललाही तुडुंब गर्दी असते, मात्र इतर लोकलमध्ये ज्याप्रकारे इतरांच्या घामाच्या वासाने जसं आपण हैराण होतो तसा प्रकार एसी लोकलमध्ये नसतो इतकाच काय तो फरक, बाकी गर्दी आणि माणसं ही तेवढीच. बरं एसी लोकल म्हटल्यावर त्यातून प्रवास करणारे प्रवासीही उच्चभ्रू मंडळीच.

मी खिडकीपाशी स्थिरावलो तशी माझी नजर समोर बसलेल्या व्यक्तीकडे गेली. समोरची व्यक्ती मुस्लीम होती, आता ती मुस्लीम होती हे वेगळं सांगायची किंवा ओळखायची गरज नव्हती. त्या माणसाचा पोशाख पाहून ते स्पष्ट झालंच होतं. ती व्यक्ती मोबाइलमध्ये काहीतरी पाहत होती, मीदेखील हेडफोन्समध्ये गाणी ऐकण्यात गुंग झालो. थोड्याच वेळात एक ३० ते ३५ शीची स्त्री आपल्या लहान मुलीला घेऊन माझ्याच डब्यात चढली. मुलगी साधारण ८-१० वर्षांची असावी. लगबगीने ती स्त्री आपल्या मुलीसह माझ्या समोरच्या जागेवर येऊन बसली जिथे ती मुस्लीम व्यक्ती बसली होती. सर्वप्रथम ती मुलगी त्या मुस्लीम व्यक्तीच्या बाजूला बसली होती. थोडा वेळ स्थिरावल्यानंतर त्या मुलीच्या बाजूला बसलेल्या आईची नजर खिडकीपाशी बसलेल्या त्या व्यक्तीवर गेली. मी हे सगळं सहज बघत होतो, त्या स्त्रीने एक वेगळाच कटाक्ष त्या खिडकीत बसलेल्या व्यक्तीकडे टाकत आपल्या मुलीला बाहेरच्या बाजूला बसवले अन् ती स्त्री आत खिडकीजवळील माणसापासून शक्य तितके अंतर ठेवून बसली.

मी अगदी सहज म्हणून ही गोष्ट बघत होतो आणि त्या स्त्रीने त्या व्यक्तीकडे टाकलेला कटाक्ष हा मला बरंच काही सांगून गेला. खिडकीपाशी बसलेल्या व्यक्तीला याची काहीही जाणीव नव्हती, त्यांचं आपल्या मोबाइलमध्ये लक्ष होतं, पण त्या स्त्रीने टाकलेला कटाक्ष मला अजूनही छळतोय. आता त्या स्त्रीने आपल्या मुलीला उठवून दुसऱ्या बाजूला बसवण्यामागे नेमकं कारण काय? तिने ‘द केरला स्टोरी’ पाहिलाय का या सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत. माझ्यासाठी त्या स्त्रीने ज्या पद्धतीने त्या माणसाकडे पाहिलं तेवढंच माझ्यासाठी पुरेसं होतं. ही घटना पाहून मला चटकन शाहरुख खानच्या ‘माय नेम इज खान’ची आठवण झाली. हा चित्रपटही अशाच धार्मिक विवादामुळे चर्चेत आला. या चित्रपटातही असाच एक सीन आहे ज्याची मला प्रकर्षाने आठवण झाली. ९/११ च्या भ्याड हल्ल्यानंतर अमेरिकेतही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातही असाच एका मुस्लीम व्यक्तीच्या बाजूला बसलेला माणूस आपल्या मुलाला घेऊन दुसऱ्या बाजूला बसतानाचा तो संपूर्ण प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला.

मी कोणत्याही धर्माची बाजू घेत नाही किंवा कोणत्याही धर्माची निंदा करू इच्छित नाही, पण या काही माथी भडकवणाऱ्या प्रचारकी चित्रपटांच्या मागे लागून आपण मनुष्यधर्म विसरत चाललो आहोत का, असा प्रश्न हा प्रसंग पाहिल्यानंतर माझ्या मनात आला. मी सेक्युलरिजमची बाजू घेणारा नाही किंवा कट्टरपंथीय नाही. मे केवळ तुमच्यासारखाच आपल्या घरासाठी नोकरी करणारा एक सामान्य माणूस आहे, जो बाहेर पडताना आपला धर्म घरात ठेवून येतो. कदाचित ती खिडकीजवळ बसलेली व्यक्तीदेखील तशीच असेल. आपल्यासमोर येणारा प्रत्येक मुसलमान हा तसाच असतो हा विचार आपण कधी थांबवणार आहोत? आपल्या पुढच्या पिढीवरही आपण हेच संस्कार करणार आहोत का?

आणखी वाचा : ‘द केरला स्टोरी’मधील व्हिलन ‘आसिफा’ खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड बोल्ड; चित्रपटासाठी घेतलं ‘एवढं’ मानधन

आज ज्या पद्धतीने ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाला एक मोहीम असल्यासारखं प्रमोट केलं जात आहे, ज्या पद्धतीने त्याचे मोफत शोज लावून जसा काही हा शाळेच्या अभ्यासक्रमातील महत्त्वाचा विषय असल्यासारखं नवीन मुलांमध्ये रुजवलं जात आहे, ते कुठेतरी थांबायला हवं. ‘द कश्मीर फाइल्स’बघून बाहेर पडणारी व्यक्ती ही डोळ्यात अश्रू घेऊन आली होती, तर ‘द केरला स्टोरी’ पाहून चित्रपटगृहातून बाहेर पडणारी व्यक्ती ‘आपणही असंच कट्टरवादी व्हायला पाहिजे’अशा प्रकारची विधानं करत आहेत. इथे एक माणूस म्हणून आणि प्रेक्षक म्हणून आपल्याला समजलं पाहिजे की, चित्रपटातून काय घ्यायचं आहे?

याचा अर्थ केरळमध्ये असा कोणताही प्रकार झालाच नाही का? तर नाही, केरळमधील परिस्थिती ही चिंताजनकच आहे, पण त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी इतरही बरीच साधनं आहेत. केवळ माथी भडकवणाऱ्या, चिथवणाऱ्या चित्रपटांमधून समाजाचं प्रबोधन होणार नाही. त्यासाठी इतर मार्ग आहेत ते अवलंबले पाहिजेत. कीर्तनाने समाज सुधरत नाही अन् तमाशाने समाज बिघडत नाही, तसंच असे प्रचारकी चित्रपट दाखवून समाज त्यातून योग्य बोध न घेता त्यात आणखी दरी निर्माण होते हे मला ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने आणि त्यामुळे समाजात निर्माण झालेल्या वातावरणाने पटवून दिलं आहे. यातून आपण वेळीच बोध घेतला तर ठीक, नाहीतर पुढे सगळंच कठीण होऊन बसेल.