ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीत भारताने आज पराभूत केले आणि तब्बल ७१ वर्षांनी कसोटी मालिकेची सुरुवात विजयाने केली. आपल्या भूमीत सगळेच ‘शेर’ असतात, पण परदेशात खेळून दाखवा, असे म्हणत सक्षम विराटसेनेला हिणवणाऱ्या अनेकांची आज काही काळापुरती का होईना तोंडं बंद झाली. पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारलेल्या भारताने आपल्या कर्णधाराचा निर्णय दिवसअखेर निष्फळ ठरवला खरा, पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावापासून भारताने सामन्यात ‘कमबॅक’ केलं आणि शेवटपर्यंत सामन्यावरील पकड कायम ठेवली. तब्बल १० वर्षांनंतर भारताने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटी सामना जिंकला आणि १५ वर्षांनंतर अॅडलेडच्या मैदानावर आपल्या विजयाचे शिक्कामोर्तब केले.
भारताला हा ऐतिहासिक विजय मिळाला तो भारताच्या तीन शिलेदारांमुळे आणि त्यातील महत्वाचा शिलेदार म्हणजे चेतेश्वर पुजारा. पहिल्या डावात पुजाराने १२३ धावा ठोकल्या. मुरली विजय, लोकेश राहुल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत असे महत्वाचे बळी एकीकडे तंबूची वाट धरत असता पुजारा मात्र भिंतीप्रमाणे खेळपट्टीवर अढळपणे उभा राहिला. पुजाराने प्रत्येक फलंदाजाला हाताशी धरून छोट्या छोट्या भागीदाऱ्या केल्या आणि भारताला २५० धावांपर्यंत पोहोचवले. दुसऱ्या डावात भारताच्या फलंदाजांनी पहिल्या डावातील चुकांमधून बोध घेतला खरा, पण चांगली सुरुवात मिळाल्यानंतर त्यांनी बेजबाबदार फटके मारत आपली विकेट गमावली. अशा वेळी दुसऱ्या डावातही पुजाराने भारताला सावरले. भारताच्या धावसंख्येत सर्वाधिक ७१ धावांची भर घालत पुजाराने आपली संघातील निवड सार्थ ठरवली.
या सामन्यात विजयाचा दुसरा शिल्पकार ठरला तो योग्य वेळी संयमाने अर्धशतकी खेळी करणारा मुंबईकर अजिंक्य रहाणे. अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात ऑफ स्टम्पच्या बाहेरील चेंडूला बॅट लावत आपली विकेट गमावली. पण दुसऱ्या डावात मात्र त्याने तशी चूक केली नाही. मुंबईच्या खेळाडूंना सर्वात आधी बचावत्मक फटके कसे खेळावे, याचे प्रशिक्षण दिले जाते. त्या प्रशिक्षणाचा प्रत्यय अॅडलेडच्या भूमीवर पुरेपूर पाहायला मिळाला. अजिंक्य रहाणेने चेतेश्वर पुजाराला अपेक्षित साथ देत आपला डाव हळूहळू रंगवला. पुजारा बाद झाल्यावरदेखील रहाणेने आपली जबाबदारी ओळखत उत्तम खेळ केला. फक्त रिव्हर्स स्विपचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला, त्या फटक्याची त्यावेळी गरज नव्हती. पण पहिल्या डावात झालेली चूक लगेच दुसऱ्या डावात सुधारणारा अजिंक्य अशा गोष्टींकडे नक्कीच लक्ष पुरवेल, यात वाद नाही.
भारताच्या विजयात या दोघांच्या तुलनेत कमी पण मोलाचा वाटा ठरला तो वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचा. बुमराहने संपूर्ण सामन्यात ६ बळी टिपले. पण हे ६ बळी मोक्याच्या क्षणी टिपणे अतिशय महत्वाचे होते. पहिल्या डावात बुमराहने ४७ धावा खर्चून ३ गडी बाद केले. यात खेळपट्टीवर स्थिरावलेल्या आणि घातक ठरू शकणाऱ्या हॅंड्सकाँम्बचा समावेश होता. दुसऱ्या डावात तर बुमराहची कामगिरी अधिक मोलाची ठरली. जरा कुठे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची भागीदारी होताना दिसली की तेथे कर्णधार कोहली बुमराहच्या हाती चेंडू सोपवत होता आणि बुमराह त्याचा निर्णय सार्थ ठरवत होता. शॉन मार्श हा फलंदाज ६० धावा करून भारताच्या विजयाच्या आड येऊ पाहत होता, त्यावेळी बुमराहने त्याचा काटा काढला. पाठोपाठ कर्णधार टीम पेनलाही बुमराहनेच माघारी धाडले आणि त्यानंतर १२१ चेंडूत २८ धावांची चिवट खेळी करणाऱ्या कमिन्सलाही बुमराहने तंबूचा रस्ता दाखवला.
या तीन शिल्पकारांच्या जोरावर आज ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. त्याबरोबरच ही नव्या पर्वाची नांदी असल्याचे स्पष्ट संकेतही आक्रमक विराटसेनेने या विजयातून दिले आहेत.