स्वप्निल घंगाळे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेन वॉर्नचं निधन झाल्याचं कळतंय… असा मेसेज ऑफिसच्या ग्रुपवर पाहिला आणि मोर्चा लगेच ट्विटरकडे वळवला तर बातमी खरी निघाली… खरं तर त्याला ना कधी भेटलो, ना त्याचे रेकॉर्ड तोंडपाठ आहेत ना मी ऑस्ट्रेलियन टीमचा चाहता आहे. पण त्याच्या निधनाच्या बातमीने इतर सेलिब्रिटी डेथच्या बातम्यांप्रमाणे पुन्हा एकदा एक गोष्ट अधोरेखित झाली की आयुष्य फारच अनसर्टन आहे…. दुसरा त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे बालपणीच्या आठवणींचा एक मणी निखळला…

अर्थात मी काही फार मोठा नाहीय वयाने आणि कतृत्वानेही पण ९० च्या दशकामध्ये जन्मलेल्या आणि लहानपणापासून क्रिकेट पाहत आलेल्या प्रत्येकाला ही बातमी ऐकून, वाचून, पाहून धस्स नक्कीच झालं असणार. तो प्रतिस्पर्धी संघातला असला तरी काय झालं तो उत्तम खेळाडू होता. म्हणजे त्यावेळी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकवा म्हणून किंवा सचिन ९० च्या रेंजमध्ये असल्यावर हा गोलंदाजीला आल्यावर सचिनचं शतकं व्हावं यासाठी जागचे न हलणारे आपल्यासारखे अनेकजण या व्यक्तीला वाईट साईट बोललोय किंवा त्याची कामगिरी त्याच्या नावाला साजेशी होऊ नये अशी प्रार्थना करायचो…

म्हणजे याच्याबद्दल विरोधी संघाला वाटणारी भीती आणि तुम्हा आम्हासारख्या कोट्यावधी क्रिकेट चाहते असलेल्यांना त्याच्या वाईट कामगिरीसाठी प्रार्थना करावी लागायची यातच त्याचं मोठेपण आलं. समोरच्याच्या मनात दहशत निर्माण करण्याची ताकद त्याच्या मनगटात होती. आपल्याला घरी बसून उतावळा झाल्यासारखं करण्याची क्षमता असणारा हा गोलंदाज होता तर फलंदाजांबद्दल न बोलेलं बरं…

याच्याबद्दलची आणखी एक गोष्ट म्हणजे आयपीएल. २००८ साली झालेल्या पहिल्या आयपीएलमध्ये याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लिंबू टींबू समजल्या जाणाऱ्या राजस्थान रॉयर्सनं चषक जिंकून साऱ्यांनाच धक्का दिलेला. त्यानंतर पुढील काही वर्ष हाच कर्णधार राहिला संघाचा पण तसा करिष्मा पुन्हा यांना जमला नाही. मात्र त्याच्या नेतृत्वामधील आवडती गोष्ट म्हणजे तो नव्या पोरांना फार संधी द्यायचा. म्हणजे तो कर्णधार असताना एक खेळाडू चांगलाच लोकप्रिय झालेला. स्वप्निल असनोडकर. त्याचं नंतर काय झालं ठाऊक नाही पण त्याला वॉर्नर फार सपोर्ट करायचा असं दिसायचं. आज याच क्रिकेट लीगमधून ऋतूराज गायकवाड, इशान किशन वगैरेसारखी तरुण पोरं सापडलीयत पण याची सुरुवात कुठे ना कुठे वॉर्नसारख्या माणसामुळे झालेली.

नाण्याचा जशा चांगली बाजू असते तशी वाईटही असते. हा ऑन फिल्डबरोबरच ऑफ फिल्डही चांगलाच चर्चेत होता. कधी कोणाची छेड तर कधी काही वक्तव्य अशा बऱ्याच प्रकरणात तो चर्चेत राहिला. पण त्याची लोकप्रियता आणि कामगिरी या साऱ्या वादांपेक्षा सरस ठरली. म्हणूनच आज त्याच्या निधनानंतर अनेकजण अचानक मनाला चटका लावून जाणारी एक्झीट असं म्हणत हळहळलेत आणि त्याचमुळे सध्या सोशल मीडियावर आणि व्हॉट्सअप स्टेटसवर श्रद्धांजलीचा पाऊस पडतोय.

ब्रेट ली, सायमंड, वॉर्ननर, पॉण्टींग, शेन वॉटसन यासारखे अनेक खेळाडू आता मनाने भारतीय झाल्यासारखे आहेत. पण याची सुरुवातही वॉर्नने केली.

एक चांगला विरोधक म्हणून वॉर्न हा भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या त्यातही ९० च्या दशकात जन्मलेल्या ९० ज किड्सच्या कायमच लक्षात राहील. आता जसे आमच्या वडिलांची पिढी गावस्करांबद्दल सांगते तसं आम्ही ज्या काही मोजक्या खेळाडूंबद्दल सांगू त्यामध्ये वॉर्न नक्की असेल…

अलविदा किंग ऑफ स्पीन….

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blog australia cricket legend shane warne will always be remembered by indian cricket fans scsg