मित्रहो,
सरकारच्या ऊर्जानिर्मितीच्या धोरणांत मूलभूत गफलत असून केंद्र सरकारने वेळेत कोळसा ऑर्डर न केल्याने देशावर वीजटंचाईचे संकट येत आहे, संपूर्ण देश अंधारात बुडणार आहे” अशा आशयाचे मेसेज देशद्रोही आणि धर्मद्रोही लोकांकडून पसरविले जात आहेत. तुम्ही खरे देशप्रेमी असाल तर शेतकऱ्यांचे आंदोलन आणि लखीमपूरच्या घटनेकडे आपण जसे दुर्लक्ष केले तसेच दुर्लक्ष वीजटंचाईच्या मुद्यावरही कराल आणि हिंदुस्तानची बदनामी करणाऱ्या या आंतरराष्ट्रीय कटाला बळी पडणार नाही अशी मला आशा आहे.
खरं पाहता, अंधार हा नैसर्गिक असून, दिवे लावून कृत्रिम प्रकाश निर्माण करणे हे निसर्गधर्माच्या विरुद्ध आहे. आपल्या ऋषीमुनींनी म्हटलेलंच आहे की, अंधाराच्या शून्यात ईश्वर आपल्या सर्वात जवळ असतो. ज्याप्रमाणे प्रकाशाशिवाय आस्थेची कल्पना केली जाऊ शकत नाही, त्याचप्रमाणे अंधाराशिवाय विश्वाची कल्पना अशक्य आहे. आज आपण अंधाराकडे पाठ करून मोठी किंमत मोजत आहोत. आपले डोळे दिवसभर स्क्रीनवर लागून असतात. रात्री विजेचा प्रकाश आपल्या झोपेत अडथळा आणतो. अंधारापासून वाचण्याऐवजी आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे. तो आपल्या कित्येक अडचणींवर इलाज करू शकतो कारण अंध:कारात दैवी रहस्य लपले आहे. आपण इतके सुदैवी की, अंधाराचं महत्व जाणणारे सरकार आज आपल्याला लाभले आहे.
माणसाचा ईश्वराशी जवळचा सामना अंधारातच झाला आहे. दिवाळीसारखा आपला सर्वात मोठा सण अमावास्येच्या अंधाऱ्या रात्री असतो. भगवान श्रीकृष्णाचा जन्म कृष्ण पक्षात रात्री बारा वाजता झाला आणि बाळ कृष्णाला वाचविण्यासाठी वसुदेव मध्यरात्रीच यमुना पार करून गेला. रामराज्यात कुठेही विजेचे दिवे असल्याचा उल्लेख नाही तरीही रामराज्यातील जनता सर्वात सुखी होती. बायबलमधे सांगितल्याप्रमाणे ईश्वराने मोझेसला अंधारातच दहा आज्ञा सोपविल्या होत्या. येशूचा जन्मही अंधारात एका तार्याखाली झाला होता. येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थानही अंधार्या गुहेत झाले होते. गौतम बुद्धांनी अंधाऱ्या गुहेत ध्यान केले. महंमद पैगंबरांना मक्केच्या बाहेर एका अंधाऱ्या गुहेत कुराण प्राप्त झाले. असे असताना, आपण अंधारापासून वाचण्याचा प्रयत्न करतो, याचा अर्थ असा नाही का, की आपण ईश्वरापासून लांब पळत आहोत?
आपण प्रकाशाचा फुकाचा बाऊ करून अंधाराला उगीच अंडर-एस्टीमेट केले आहे. अंधार म्हणजे प्रकाशाची गैरहजेरी हे आपल्याला ठाऊक आहेच. म्हणजेच ज्या क्षणाला प्रकाश एक ठिकाण सोडतो त्याच क्षणाला अंधकार त्याचे अस्तित्व दाखवतो. थोडक्यात दोघांचा प्रभाव आणि वेग सारखाच आहे किंबहुना अंधार प्रकाशापेक्षा प्रभावशाली आहे.
आज खऱ्या अर्थाने देव, धर्म आणि संस्कृतीचा आदर करणारे सरकार आपल्याला लाभले आहे. येत्या काळात येऊ घातलेली वीज टंचाई हा एक ईश्वरी संकेत आहे. आपले सरकार विजेवरील अवलंबित्व कमी करून अंधाराला आणि पर्यायाने ईश्वराला जाणण्यासाठी आपल्या प्रत्येकाला आमंत्रित करत आहे.
माणसाने अंधाऱ्या रात्री हळूहळू चालावे. अंधारात पायी चालल्याने डोळ्यांव्यतिरिक्त इतर चार ज्ञानेंद्रिये अधिक जागरूक होतात. बुद्धी आणि विवेक निर्माण होतो. भीतीपासून मुक्ती मिळते. आपण ईश्वराच्या अधिक जवळ जातो. रात्री घरातल्या विजेवर चालणाऱ्या सर्व वस्तू बंद कराव्यात. एखाद्या अंधारल्या जागी बसावे. नवे जीवन अंधारात सुरू होते. जमिनीतील बीज असो, पोटातील बाळ असो, कंसाच्या कैदेतील कृष्ण असो, वनवासातील राम असो थडग्यातील येशू ख्रिस्त असो, सगळ्यांची सुरुवात अंधारात झाली आहे.
आपल्यासाठी पवित्र अंधारयुग अवतरणार आहे, त्याचे खुल्या मनाने, टाळ्या-थाळ्या वाजवून स्वागत करूया.