अमित जोशी
क्रूझ क्षेपणास्त्र हे प्रमुख अस्त्र असलेली Oscar Class ( NATO ने दिलेले नाव ) या वर्गातील Kursk नावाच्या रशियाच्या अणु पाणबुडीला झालेल्या अपघातावर आधारित हा इंग्रजी भाषेतील सिनेमा असून हा सप्टेंबर २०१८ मध्ये रिलीज झाला. असं असलं तरी OTT प्लॅटफॉर्म नुकताच उपलब्ध झाला असून Prime Video वर हा सिनेमा आता बघायला मिळेल.
नुकतेच १९९९ मध्ये व्लादिमीर पुतिन हे राष्ट्राध्यक्ष झालेले असतात आणि पाणबुडीच्या जगाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या एका दुर्घटनेला – Kursk या सुमारे १३ हजार टन पेक्षा जास्त वजन असलेल्या अणु पाणबुडीच्या अपघाताला रशियाला सामोरं जावं लागतं. अण्वस्त्र वाहून नेणारी क्रूझ क्षेपणास्त्र या पाणबुडीवर तैनात केलेली असतात हे विशेष.
ऑगस्ट २००० मध्ये रशियाच्या नौदलाने अत्यंत विस्तृत स्वरूपातल्या युद्धसरावाचे आयोजन केलेलं असतं. १९९०-९१ ला रशियाची शकलं झाल्यानंतरचा हा सर्वात मोठा युद्धसराव असतो. यामुळे पुन्हा एकदा आपली ताकद दाखवण्याचा रशियाचा प्रयत्न असतो. तर अमेरिकेची बारीक नजर या युद्धसरावावर असते, कारण यानिमित्ताने रशियाची युद्धसज्जता – युद्धनौकांची तयारी याबद्दलची ताजी माहिती मिळणार असते. युद्धसरावाला सुरुवात होते आणि पाण्याखाली असलेली Kursk अणु पाणबुडी torpedoes डागण्याच्या तयारीत असतांना पहिल्याच torpedoes चा स्फोट होतो, आग पसरते आणि दोन मिनिटांनंतर मोठा शक्तिशाली स्फोट होत पाणबुडीचा पुढचा भाग उद्धवस्त होत सुमारे २०० मीटर खोल समुद्रात पाणबुडी बुडते – तळ गाठते. या घटनेचे गांभीर्य समजायला रशियाला तब्बल सहा तास जातात, तर युद्धसरावावर लक्ष असलेल्या अमेरिकेला याचे गांभीर्य लगेच लक्षात येते.
पाणबुडीत अजूनही कोणी वाचले असेल या अंदाजाने रशियाची पाणबुडीतील इतर लोकांना वाचवण्यासाठी धडपड सुरू होते. स्फोटामुळे एका तडाख्यात पाणबुडीतील ९० पेक्षा जास्त नौसैनिकांचा मृत्यू झालेला असतो. तर सुमारे २० जण पाणबुडीच्या शेपटाच्या भागात आश्रय घेतात. हातोडीने पाणबुडीच्या भिंतीवर प्रहार करत नौसैनिक आपण जिवंत असल्याचे सांगतात. मात्र अपुऱ्या यंत्रणामुळे पाणबुडीपर्यंत पोहचूनही जिवंत असलेल्या पाणबुडीतील नौसैनिकांना वाचवणे शक्य होत नसते. पाण्याची हळूहळू वाढणारी पातळी, प्राणवायूचे कमी होणारे प्रमाण, हाडे गोठवणारे थंड पाणी, अपुरे खाद्यपदार्थ याचा सामना करत तब्बल सहा दिवस हे नौसैनिक तग धरून रहातात.
दुसऱ्या ( प्रगत ) देशाची मदत मागितली तर नाक कापले जाईल म्हणून रशिया हा अमेरिका – ब्रिटन / नाटो देशांची मदत नाकारतो. मुख्य म्हणजे या मदतीच्या निमित्ताने बहुमोल अशा अणू पाणबुडीबद्दलची माहिती अमेरिकेला मिळण्याची शक्यता असल्याने मदतीचा हात रशियाकडून धुडकावला जातो.
एकीकडे या सर्व घडामोडी सुरू असतांना संबंधित नौसैनिकांची कुटुंब अस्वस्थ असतात. घटनेबद्दलची मोजकीच माहिती सांगितली जात असल्याने कुटुंबियांचा संयम सुटतो. रशियाचे अधीकारी हे सर्व दाबण्याचा प्रयत्न करतात.
अखेर रशिया अमेरिकेची मदत मागते. मात्र तोपर्यंत उशीर झालेला असतो. गोताखोर हे पाणबुडी पर्यंत पोहचतात मात्र शेवटच्या भागातही पाणी भरल्याने त्या नौसैनिकांना मृत्यू झालेला असतो.
असा हा प्रत्यक्ष घटनेवर आधारित चित्रपटाचा हा पट आहे.
रशियाच्या नौदलाचा ताफा, तत्कालीन नौदलाची मानसिकता, प्रत्यक्ष पाणबुडीचा अपघात, पाणबुडीतील नौसैनिकांची वाचण्याची धडपड, नौसैनिकांना वाचवण्याचे प्रयत्न, कुटुंबियांचा आक्रोश हे अत्यंत प्रभावीपणे या सिनेमात साकारले आहे.
चित्रपट संपल्यावर काही काळ मन सुन्न होऊन जाते.
या सिनेमाच्या निमित्ताने मुंबईच्या नौदल तळावर बुडालेल्या आयएनएस सिंधुघोष पाणबुडीच्या अपघाताची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.