शेखर जोशी
‘झी फाईव्ह’वर १ मे रोजी ‘हुतात्मा’ वेबसीरिजचा प्रिमिअर
राम गणेश गडकरी यांनी महाराष्ट्राचे वर्णन ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ असे केले आहे. असा हा महाराष्ट्र मुंबईसह सहजासहजी मिळालेला नाही. त्यासाठी १०५ हुतात्म्यांना रक्त सांडावे लागले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळविण्यात संयुक्त महाराष्ट्र समितीचे महत्वपूर्ण योगदान आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि हा इतिहास आता वेबसीरिजच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे. ही वेबसिरिज मीना देशपांडे यांच्या ‘हुतात्मा’ या कादंबरीवर आधारित असून याचे दिग्दर्शन जयप्रद देसाई यांनी केले आहे. या वेबसिरिजचा प्रिमिअर येत्या १ मे रोजी झी फाईव्ह या अॅपवर होणार आहे.
ब्रिटिश राजवटीत मुंबई प्रांत कराचीपासून म्हैसूरपर्यंत पसरलेला होता.स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताची भाषावार प्रांतरचना करण्यासाठी नेहरू सरकारने अनेक आयोग नेमले. फाजल अली आयोगाने भारताची भाषावार प्रांतरचना केली. पण कच्छ सौराष्ट्र गुजरातमध्ये मुंबई राज्य निर्माण केले. त्यातून नागपूर बेळगाव कारवार भाग वगळला. या अन्यायाविरुद्ध सार्या महाराष्ट्रात संतापाचा उद्रेक झाला. सुरुवातीला नेहरूंचे मन वळविण्यासाठी अनेक समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. पण नेहरू आपल्या मतावर ठाम होते. अखेर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र मिळविण्यासाठी चळवळ सुरू करणे हा एकच उपाय मराठी माणसांसमोर होता.
महाराष्ट्रावर झालेल्या या अन्यायाच्या निवारणासाठी एस. एम.जोशी ,काॅ. श्रीपाद अमृत डांगे आणि आचार्य प्रल्हाद केशव अत्रे या प्रमुख नेत्यांच्या अधिपत्याखाली संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. सेनापती बापट, शाहीर अमर शेख, प्रबोधनकार ठाकरे आणि अन्य नेत्यांनीही या चळवळीत आपले मोठे योगदान दिले. पं. नेहरु यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री असलेले सी.डी. देशमुख यांनीही संयुक्त महाराष्ट्रासाठी आपला राजीनामा दिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या प्रचारासाठी आचार्य अत्रे यांनी ‘मराठा’ दैनिक सुुरु केले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळालाच पाहिजे यासाठी शांततापूर्ण मार्गाने चळवळी, सभा, आंदोलन सुरु होते. अशात तेव्हाच्या मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी मुंबईतील हुतात्मा चौक येथे (तेव्हाचे फ्लोरा फाऊंटन) आंदोलनकर्त्यांवर बेछूट गोळीबारात केला. त्या आधी झालेल्या आंदोलनात १०५ जणांचा बळी गेला.
अखेर संयुक्त महाराष्ट्र समितीच्या साडेचार वर्षांच्या अथक प्रयत्नांना यश मिळून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीला पं. नेहरु सरकारने मान्यता दिली आणि १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.
मीना देशपांडे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सत्य घटनांचे चित्रण ‘हुतात्मा ‘या कादंबरीत केले असून ही कादंबरी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षी म्हणजेच १ मे २०१० या दिवशी प्रकाशित झाली होती. मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या याच कादंबरीवर आधारित ही मालिका आहे. मालिकेत वैभव तत्ववादी, अंजली पाटील, सचिन खेडेकर आदी कलाकार असून ही मालिका सात भागांची असणार आहे.
– शेखर जोशी