-अक्षय नाईकधुरे
सध्या फेसबुकवर कानाखाली मारणाऱ्या आणि मार खाणाऱ्या माणसांची जोरदार चर्चा चालू आहे.व्हिडिओमध्ये मार खाणाऱ्यांची अवस्था बघताना अनेकजण मजा घेत आहेत आणि मार देणाऱ्या दाढीधारी व्यक्तीप्रति प्रेमसुद्धा व्यक्त करत आहेत. २०१५ साली अक्षय कुमारचा ‘गब्बर इज बॅक’ नावाचा चित्रपट आला होता. त्या चित्रपटात अक्षय कुमारचा एक संवाद आहे.”पचास पचास कोस दूर जब कोई रीश्वत लेता है तो सब केहते है मत ले वरना गब्बर आ जाएगा”. अशाच एका गब्बरची मुंबईमध्ये सध्या चर्चा आहे. फक्त ह्या गब्बरचा संवाद ‘थोडा’ वेगळा आहे. दिवसा-रात्री-अपरात्री कुठेही असणारा आणि अनेकांच्या छातीत धडकी भरवणारा हा गब्बर नेमका कोण हे एव्हाना ठाऊक झालेच असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे खंदे समर्थक नितीन नांदगावकर हे सोशल मीडियावर सध्याचा ‘ट्रेंडीग’ विषय बनले आहेत. अमजद खान आणि अक्षय कुमार यांनी साकारलेल्या गब्बरच्या भूमिकेमध्ये खूप फरक होता. शोलेमधला गब्बर हा ‘समाजाचे घेणे’ तर अक्षय कुमारचा गब्बर हा ‘समाजाचे देणे’ लागत होता.त्यामुळे नांदगावकर यांची तुलना अक्षय कुमारच्या नव्या गब्बरशी नक्कीच करता येऊ शकते. तरुणांमध्ये जबरदस्त फॅन फॉलोईंग असलेले नांदगावकर २०१० पासून सक्रिय राजकारणात आहेत.फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी जनतेच्या प्रश्नासंबंधीचे,अवैधरित्या वाहन चालवणाऱ्यांना शिक्षा करण्याचे,फसवणुक करणाऱ्या आरोपींच्या मारहाणीचे,वयोवृद्धानां न्याय दिल्यासंबंधीचे अनेक व्हिडीओ अपलोड केले आहेत. सळसळत्या रक्ताने आणि जोशाने भरलेल्या तरुणाईचा सवयीप्रमाणे त्यांच्या या प्रयत्नांना उदंड प्रतिसादसुद्धा लाभला आहे. आपला ‘मसिहा’ भेटल्यामुळे अनेकजण दर बुधवारी एल्फिन्स्टच्या ‘महाराष्ट्र गडावर’ त्यांना भेटण्यासाठी गर्दीसुद्धा करतात.परंतु हे सर्व मान्य असले तरी हिंसा करणे कितपत योग्य आहे? आणि त्यांच्या कायदा हातात घेण्याच्या कृतीला कोणतेही समर्थन देता येईल का?

महाराष्ट्रात मराठीच्या अस्मितेचा मुद्दा सध्या जुना झाला असला तरी तो एखाद्या वणव्याप्रमाणे आहे. त्यामुळे तो कधीही पेटू शकतो.सोशल मिडियाचा वापर हा चांगल्या कामांसाठी करता येतो हे आपण पाहिले आहे. परंतु जेव्हा राजकारण त्याचे अंग बनते तेव्हा ते स्वार्थ साधण्याचे माध्यम बनते हेसुद्धा आपण पाहिले आहे. त्याचा जंतर-दाखला किंवा मंतर-पुरावा देण्याची येथे गरज उरत नाही.त्यामुळे नितीन नांदगावकर यांनी अंगीकारलेले फेसबुक धोरण हे पब्लिक स्टंटबाजी तर नाही ना? असा प्रश्नसुद्धा अनेक ठिकाणी उपस्थित केला जात आहे.अनेक विनंत्या करून प्रशासन ऐकत नसेल तर एकट्या नांदगावकरांनी जनतेची जबाबदारी स्वीकारणे योग्य आहे का? याचा विचार स्वतः जनतेने केला पाहिजे.तळागाळातील प्रश्न हाताळताना मारणे,ठोकणे,धोपटणे हे शब्द तात्पुरता ‘बघायला’ मस्त वाटत असले तरी ती अंतिम उपायाची शस्त्रे नाहीत.

आगामी निवडणुकीचा विचार करता सर्व राजकीय पक्ष सोशल मिडिया व्यवस्थित ‘हँडल’ करताना दिसतात.मुंबई पोलिसांकडून मिळालेली दोन वर्षांची तडीपाराची नोटीसदेखील नांदगावकरांच्या आणि पक्षाच्या प्रसिद्धीचे कारण बनते आहे.फक्त त्याचे परिवर्तन मतांमध्ये होणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल.मनसेकडे सध्या ‘एकला चलो रे’ धोरण राहिल्यामुळे तिची ‘आघाडी’ फक्त सोशल मिडियासोबतच घडू शकते असे दिसते.नांदगावकरांच्या पाठोपाठ अनेक महाराष्ट्र सैनिकांनी आपापल्या भागामध्ये घडणाऱ्या चुकीच्या घटनांसबंधी व्हिडीओ इंटरनेटवर टाकण्यास सुरुवात केली. या सर्व प्रकाराला जनतेप्रति उफाळलेले प्रेम म्हणावे की खरच जागृत झालेला स्वाभिमान हे सांगणे तूर्तास तरी कठीण जाईल. त्यामुळे या नायकांची खरी प्रचिती निवडणुकींनतरच अनुभवास येईल.कारण गॅलिलिओने म्हटलेच आहे की,ज्याला नायकाचे महत्व कळत नाही तो समाज दुर्दैवी नसतो तर ज्याला एखादा नायक लागतो तो समाज दुर्दैवी असतो.