दुर्योधन, दुःशासन आणि ध्रुतराष्ट्र असं वाचून कदाचित शंका आली असेल की हे नक्की काय? आणि कोणाबद्दल आहे. सध्या राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या तिघांचा संबंध आहे तो म्हणजे कोकणातल्या राजकारणाशी. कोकण म्हटलं तर कदाचित आतापर्यंत थोडंफार चित्र स्पष्ट व्हायला लागलं असेल. कोकणातल्या राजकारणातला सध्या गाजणारा हॉट टॉपिक म्हणजे राणे पिता पुत्रांचा. नारायण राणे यांचं पुत्रप्रेम काही लपलेलं नाही. पुत्रप्रेमापायी त्यांच्यावर माफी मागण्याची वेळही आली होती. असो… शिवसेना, काँग्रेस आणि आता स्वाभिमान पक्ष असा लांबचा प्रवास केलेल्या राणेंनी अखेर परिस्थिती पाहून आपला पक्ष भाजपामध्ये विलिन करण्याचा निर्णय घेतला. निर्णय घेतला असला तरी याला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही हेदेखील सत्य आहे. त्यातच नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनीदेखील काही दिवसांपूर्वी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपाचं सदस्यत्व स्वीकारलं. त्यानंतर त्यांना लगेच भाजपाकडून उमेदवारीही जाहीर झाली. मग काय त्यांचा आनंद एकदम गगनात मावेनासाच झाला.

एकीकडे शिवसेनेनं महाष्ट्रातील जनतेसाठी नमतं घेत १२४ जागांवर समाधान मानत भाजपाबरोबर युती केली असली तरी बंडखोरांचं आव्हान थोपवण्यात मात्र त्यांना यश येताना दिसत नाहीये. राणे पुत्राला मिळालेला मतदारसंघही याला अपवाद नाही. कणकवली-देवगड विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजपाचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. इतकंच काय तर कोणाला पाठिंबा द्यायचा यावरून भाजपामध्येच दोन गट पडलेत. त्यातच नारायण राणे हे पुत्रप्रेमात आंधळे झालेले ‘धृतराष्ट्र’ आहेत, असं भाजपाचे नेते संदेश पारकर यांनी म्हटलंय, तर निलेश आणि नितेश राणे यांना चक्क दुर्योधन-दुःशासन या बंधूंची उपमा देऊन टाकली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी सतीश सावंत यांना त्यांनी पाठिंबाच जाहीर करून टाकला. त्यांची नाराजी तशी स्वाभाविकच आहे असं म्हणावं लागेल. अचानक कोणीतरी पक्षप्रवेश करतो आणि त्याला उमेदवारीही मिळते, अशावेळी अशी भावना निर्माण होणं स्वाभाविकच आहे. दुसरीकडे विनायक राऊत यांनी भाजपाने विकृतीला जवळ घेतलं असल्याचं म्हणत साप तो साप शेवटी डंख मारणारचं असं म्हटलं. नितेश राणे आणि भाजपा यांचं किती जवळचं नातं आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला अनेक उदाहरणं पाहता येतील. त्यासाठी आपल्याला जास्त लांबही जायला नको. विधानसभा निवडणुकांपूर्वी देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. लोकसभा निवडणुकांपूर्वी शिवसेना आणि भाजपाने एकत्र येत युतीची घोषणा केली. केवळ लोकसभेसाठी नाही तर विधानसभा निवडणुकांमध्येही युती करणार असल्याचं त्यांनी जाहीर करून टाकलं. मग काय? नितेश राणेंनी थेट त्यांच्यावर हल्ला चढवला आणि ही युती म्हणजे सत्तेसाठी केलेला ‘नंगा नाच’ असल्याचं त्यांनी म्हटलं.

Ajit Pawar Bhor Assembly Constituency
Ajit Pawar: ‘नायतर आम्हाला कुत्रं विचारणार नाही’, भरसभेतच अजित पवार भडकले, पोलिसांवर व्यक्त केला संताप
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
Immediate relief, Nawab Malik, High Court,
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल
Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath and Congress president Mallikarjun Kharge.
Razakar violence explained: रझाकारांनी खरगेंच्या कुटुंबीयांची हत्या केली? योगी आदित्यनाथांच्या टीकेमागचा खरा इतिहास काय?
ravi rana replied to ajit pawar
“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!

तर दुसरीकडे नारायण राणेही याला अपवाद नव्हते. राणे आणि शिवसेना यांचं प्रेम तसं जगजाहीर आहे. शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी ना नारायण राणे यांनी सोडली, ना नितेश आणि निलेश राणे यांनी सोडली. शिवसेना भाजपाच्या युतीबाबतही त्यांनी टोकाची भूमिका घेतली होती. युती जाहीर होण्यापूर्वी नारायण राणे यांनी शिवसेना भाजपा युती झाल्यास त्यांच्यासोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. परंतु त्यांची युती झाली आणि राणेंची स्थिती ‘इकडे आड तिकडे विहिर’ अशी झाली. इतकंच काय तर निलेश राणे यांनी तर थेट ठाकरे कुटुंबावर गंभीर आरोप करत वाद ओढवून घेतला होता. “जयदेव ठाकरे न्यायालयात बोलले ते सांगायला लावू नका. ते सांगितले तर स्मारक सोडा, ठाकरे कुटुंबाच्या अंगावर कपडे राहणार नाहीत. आनंद दिघेंचं काय झालं, कट कसा रचला गेला. त्यांचा मृत्यू रूग्णालयात झाल्याचं कसं दाखवलं गेलं, तो प्रकार सहन न झालेल्या दोन शिवसनिकांना कसं संपवलं गेलं, सोनू निगमला ठार मारण्याचे अनेकवेळा प्रयत्न झाले. काय नातं होतं निगम आणि ठाकरे घराण्याचं? ठाकरे यांच्या कर्जत येथील फार्महाऊसवर कोण कोण हजेरी लावत असे, या सर्व बाबी जाहीर सभेत सांगेन, अशी धमकीच थेट त्यांनी देऊन टाकली होती.

राणे आणि सेना भाजपाच्या नात्यात इतकं वितुष्ट निर्माण झाल्यानंतर दोन्ही ठिकाणच्या कार्यकर्त्यांकडून चांगल्याची अपेक्षा करणंच गैर आहे. पण राजकारणात कोण कोणाचा कायमचा मित्र नसतो ना कोणाचा शत्रू हेच खरं. ‘सिंहासना’पर्यंत पोहोचेल तोच खरा राजा आणि त्यासाठी मदत करेल तोच खरा मित्र अशी परिस्थिती आहे. भाजपासोबत जाण्याचा राणेंचा झालेला निर्णय भाजपाकडून आपल्या मुलाला मिळालेली उमेदवारी यामुळे नारायण राणे यांनी एक पाऊल मागे घेत आपण शिवसेनेचा प्रचार करू असंही म्हटलं होतं. तर दुसरीकडे संघाचं काम समजून घेण्यासाठी आणि भाजपाचीच एक सहयोगी संस्था म्हणून आपण संघ शाखेला हजेरी लावल्याचंही नितेश राणेंनी सांगून टाकलं. बदललेली राजकीय परिस्थिती हे यामागील एकमेव कारण आहे. बदललेली स्थिती राणेंना पुन्हा काँग्रेसबरोबर घेऊन जाऊ शकत नव्हती. राष्ट्रवादी आणि स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून स्वतंत्र निवडणूक लढवणंही त्यांच्या फायद्याचं नव्हतं. स्वतंत्र लढल्यास आपल्या सुपुत्रांच्या राजकीय भविष्याचं काय? हा प्रश्न नक्कीच त्यांच्यासमोर होता. सत्ताधाऱ्यांचा हात न धरल्यास त्यातच नितेश राणे यांच्यासाठीही आमदारकीची वाट आणखी बिकट होणार हे त्यांच्या ध्यानात आलं असावं. राणे हे भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेवर गेले आहेत. असं असलं तरी युतीमुळे शिवसेनेची कोकणात वाढलेली ताकद ही नक्कीच त्यांना विचार करायला लावणारी आहे. त्यामुळे राणेंच्या समोर किमान आपल्या पोटच्या गोळ्यांसाठी तरी माघार घेण्याशिवाय अन्य पर्यायच नव्हता असं दिसून येतं.

जयदीप दाभोळकर