– कीर्तिकुमार शिंदे
गुढीपाडव्याच्या मनसे मेळाव्यानंतर राज ठाकरेंची पहिली जाहीर सभा झाली ती नांदेडला. शुक्रवारी (१२ एप्रिल) संध्याकाळी झालेल्या या सभेला नांदेडकरांनी उदंड प्रतिसाद दिला. इतका की ज्या ठिकाणी ही सभा होती ते मैदान आणि आसपासचा परिसर राज ठाकरेंचं भाषण अनुभवायला आलेल्या लोकांच्या गर्दीने ओसंडून वाहत होता. श्रोत्यांच्या अपेक्षेप्रमाणे राज ठाकरे यांचं भाषणही जबरदस्त झालं. म्हणजे, मोदी विरोधकांना तरी ते भाषण निश्चितच जबरदस्त वाटलं. मुंबईतल्या गुढीपाडव्याच्या सभेत मांडलेल्या काही मुद्द्यांच्या राज यांनी या नांदेडच्या सभेत पुनरोच्चार केला, तर काही नवीन मुद्देही मांडले. अर्थात, हे सर्व मुद्दे नरेंद्र मोदींच्या विरोधातीलच होते. सॉरी, ‘चौकीदार नरेंद्र मोदीं’च्या विरोधातील होते!
गेल्या साडेतीन वर्षांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नरेंद्र मोदी- अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात- भाजपविरोधात सातत्याने भूमिका मांडताहेत. ‘आलंय मनात तर…’ नोटबंदी करू, ‘आलंय मनात तर…’ पाकिस्तानच्या नवाज शरीफांना केक भरवू असे ‘तुघलकी’ निर्णय घेणा-या मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी राज ठाकरे यांनी या काळात सोडलेली नाही. मधल्या काळात ही टीका करण्यासाठी त्यांनी आपल्या व्यंगचित्रकलेचा अत्यंत प्रभावी वापर केला. मोदी-शाह यांची खिल्ली उडवणारी त्यांनी काढलेली व्यंगचित्रं देशभरात गाजली, हजारोंच्या संख्येने सोशल मीडियावर शेअर केली गेली. मात्र आता निवडणुका जवळ आल्यावर मोदीविरोधासाठी व्यंगचित्रकला नव्हे तर वक्तृत्वकलाच त्यांनी एखाद्या शस्त्रासारखी उपसली आहे. त्याला जोड दिलीय ती स्क्रीनवरच्या सादरीकरणाची. नरेंद्र मोदी पूर्वी काय बोलले होते आणि आज काय बोलत आहेत, मोदींनी केलेले दावे कसे खोटे आहेत, हे लाखोंच्या समुदायापुढे स्क्रीनवर इमेज-व्हिडिओच्या सादरीकरणाद्वारे मांडण्याचा एक वेगळाच प्रयोग राज ठाकरेंनी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर आयोजित मेळाव्यात केला. तो इतका यशस्वी झाला की, राज यांच्या वैचारिक विरोधकांनीही त्यांच्या या आगळ्यावेगळ्या प्रयोगाची मुक्तकंठाने स्तुती केली, आणि शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही व्हिडिओ क्लिप दाखवायला सुरुवात केली !
व्यंगचित्र असो की वक्तृत्व, या दोन्हींद्वारे राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला अनेक हादरे दिले आहेत. पण त्याची नेमकी गरज का भासू लागली? गोरगरीब जनतेला विकासाची खोटी स्वप्नं दाखवून, १५ लाख बॅंकेत जमा करण्याच्या थापा मारून, राष्ट्रवादाच्या विखारी व्याख्या निर्माण करून आणि शेकडो कोटी रूपये खर्च करून सोशल मीडिया- प्रिंट मीडिया- इलेक्ट्रॉनिक मीडिया यांद्वारे प्रचारचक्र चालवून नरेंद्र मोदी-अमित शाह या जोडगोळीने देशाची सत्ता हस्तगत केली. त्यासाठी नरेंद्र मोदी या व्यक्तीला पहिल्या टप्प्यात मुस्लिमविरोधी-राष्ट्रवादी हिंदुत्ववादी शेर, आणि नंतरच्या टप्प्यात गुजरातच्या आर्थिक विकासाचे शिल्पकार- विकासपुरुष दाखवून मोदी यांची ‘लार्जर दॅन लाइफ’ अशी प्रतिमा निर्माण करण्यात आली. या प्रतिमेच्या जोरावरच भाजपने २०१४च्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवलं. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत राजीव गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला जसं देशात निर्विवाद बहुमत मिळालं होतं, तसं बहुमत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला मिळालं! सत्तासंपादनानंतरही पल्लेदार भाषणं, फेसबुक-ट्विटर-सोशल मीडियाचा प्रभावी (की, अतिरेकी?) वापर, स्वच्छ भारत किंवा योगासारखे सर्वसामान्य जनतेला जोडून घेत राबवण्यात आलेले ‘वृत्तमूल्य’ असलेले उपक्रम, असंख्य परदेश दौरे आणि तितक्याच नेत्यांना मारलेल्या गळाभेटी, सरकारी निधीने करण्यात आलेली प्रचंड जाहिरातबाजी अशा असंख्य गोष्टींच्या आधारावर नरेंद्र मोदी यांची प्रतिमा उजळत ठेवण्याचा, ती अधिकाधिक प्रभावी आणि बळकट करण्याचा प्रयत्न गेली साडेचार वर्षे अविरतपणे सुरु आहे. ही प्रतिमा इतकी बळकट केली गेली की, भ्रष्टाचाराविरोधात लढणारा आवाज म्हणजे मोदी, देशाचा विकास म्हणजे मोदी, नगरसेवक-आमदार-खासदार निवडून द्यायचे ते मोदींसाठी, इतकंच कशाला; पाकिस्तानविरोधात लढणारं भारतीय सैन्य म्हणजे ‘मोदीजीं की सेना’च, इथवर बोललं गेलं-आजही बोललं जातंय. या प्रतिमानिर्मितीसाठी २०१४च्या निवडणुकीपूर्वी, प्रत्यक्ष सत्ता संपादनानंतर आणि आता २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी असा एकूण मिळून किती पैसा खर्च केला गेला असेल, याची मोजदाद करणे शक्यच नाही.
कोट्यवधी रूपयांचा आणि सरकारी निधीचा वापर करून निर्माण केल्या गेलेल्या मोदींच्या ‘लार्जर दॅन लाइफ’ प्रतिमेला तडा देण्याचं, नव्हे तिचा विध्वंस करण्याचं काम आज देशातील अनेकजण करताहेत. त्यात जसे पत्रकार-साहित्यिक-विचारवंत आहेत, तसे काही मोजकेच राजकीय नेतेसुद्धा आहेत. पण त्या सर्वांमध्ये सर्वात प्रभावीपणे हे काम जर कोण करत असेल तर ते राज ठाकरे आहेत. मोदी यांच्या कारभाराविरोधात साधार पुराव्यांसह राज ठाकरे जाहीरपणे बोलताहेत. मोदींवर ज्या रोखठोक शब्दांत राज टीका करताहेत, त्याच्या आसपास जाईल अशी टीका राज्यातील मुख्य विरोधक असलेले काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेही करताना दिसत नाहीयेत. (काही प्रमाणात अपवाद, छगन भुजबळ आणि प्रकाश आंबेडकरांचा.) राज यांच्या भाषणांना वृत्तवाहिन्यांवर जसा सर्वाधिक टीआरपी मिळतोय, त्याहून जास्त लाइक्स आणि शेअर्स फेसबुकसारख्या सोशल मीडियावर मिळतायत. महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येपर्यंत जर कोणत्या एका नेत्याचं भाषण आज पोहोचत असेल, तर ते राज ठाकरेच आहेत. म्हणूनच त्यांच्या भाषणांकडे, ते मांडत असलेल्या मुद्द्यांकडे तसंच आरोपांकडे महाराष्ट्रासह देशभरातील मीडियाला व जनतेला गांभीर्याने लक्ष देणं भाग आहे. असं असतानाही सत्ताधारी भाजपचे नेते मात्र राज ठाकरे यांची खिल्ली उडवत आहेत.
नांदडेच्या सभेचं उदाहरण घेऊ. ह्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला, हे वर म्हटलंच आहे. पण त्याहून महत्वाचं होतं ते या सभेचं नेपथ्य. या सभेसाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठाच्या मागच्या बाजूला ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ ही अक्षरं, तर मंचाच्या उजव्या बाजूला शिवराय, बाबासाहेब, सावित्रीमाय आणि प्रबोधनकार यांच्या तसबिरी होत्या. व्यासपीठ आणि मैदानातील खूर्च्यांच्या अवतीभवती मनसेचे झेंडे होते. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा एकही झेंडा या परिसरात लावण्यात आला नव्हता! काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याचा एकही फोटो सभेच्या परिसरात लावण्यात आला नव्हता!
नांदेडमध्ये सभा झाली, सभेतून नरेंद्र मोदी सरकारविरोधात मतदान करण्याचं आवाहन केलं गेलं, मात्र काँग्रेसचा उमेदवार सभेच्या व्यासपीठावरच काय, सभेच्या परिसरातही उपस्थित नव्हता!
संपूर्ण सभा ही ‘चौकीदार’ नरेंद्र मोदींची पोलखोल सभा होती, मात्र सभेत राज ठाकरे यांनी एकदाही काँग्रेसला किंवा राष्ट्रवादीला मत देण्याचं आवाहन केलं नाही! काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं साधं नावसुद्धा त्यांनी उच्चारलं नाही!
मोदी-शहा म्हणजेच भाजप सरकारविरोधात प्रचार करत असतानाही राज ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीला मत द्या, असं थेट का सांगत नाही, हा प्रश्न इतर अनेकांप्रमाणे मलाही सतावत होता. प्रत्यक्ष नांदेडमध्ये राज ठाकरे यांच्याशी एकदाही बोलता आलं नाही. मात्र त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली ती नांदेड-मुंबई विमानप्रवासात. मी त्यांना विचारलं, “तुमच्या जाहीर सभेत तुम्ही एकदाही काँग्रेस-राष्ट्रवादीचं नाव घेतलं नाही. लोकांनी त्यांना मतदान करावं असं आवाहनही तुम्ही केलं नाही. असं का…? पुढच्या सभांमध्येही तुम्ही त्यांचा उल्लेख करणार नाही का?”
राज ठाकरे म्हणाले, “आपला संबंधच काय काँग्रेस-राष्ट्रवादीशी? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका मांडण्यासाठी मी सभा घेतोय. काँग्रेस-राष्ट्रवादी किंवा त्यांच्या उमेदवारांचं नाव घेण्याचा प्रश्नच येत नाही!” राज ठाकरे यांचं हे उत्तर ऐकून माझ्या डोळ्यासमोर आलं ते ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या ‘द पॅराडॉक्सिकल प्राईम मिनिस्टर’ या पुस्तकातलं थरुर यांचं मत. शशी थरुर यांनी लिहिलंय : “आपण आपलं राजकारण सध्या कृष्ण-धवल रंगातच पाहतो. मग ते विरोधाचं असतं किंवा समर्थनाचं असतं. अधेमधे काहीच नाही. भारतीय राजकारणाविषयीच्या कोणत्याही पुस्तकाचं शीर्षक हे कधीच ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ असं असू शकत नाही.”
थरूर यांनी हे मत मोदी-भाजप सरकारच्या तसंच पत्रकार-वृत्तसंस्थांच्या वार्तांकनाच्या संदर्भात केलं आहे. “राज ठाकरे हे मोदींना विरोध करतात, म्हणजे ते काँग्रेस-राष्ट्रवादी समर्थक आहेत” असा एकरेषीय-एकरंगी अर्थ काढल्या जाणा-या काळात आपण आहोत. राज ठाकरे यांची स्वत:ची किंवा त्यांच्या पक्षाची म्हणून काही मतं-भूमिका-स्ट्रॅटेजी असू शकते, हेच मुळी त्यांचे विरोधक किंवा टीकाकार मान्य करायला तयार नाहीत. राजकारणातल्या आणि एकंदरच सार्वजनिक जीवनातल्याही ग्रे शेड्सना आपण एक समाज म्हणून हे असं विसरत चाललो आहोत.
याचाच पुरावा म्हणजे, राज ठाकरे हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करत असून त्यांच्या प्रचारसभांचा खर्च त्या त्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या खर्चात धरला जावा, अशी मागणी भाजपच्या वतीने केली गेलीय. शालेय शिक्षण तसंच सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी तसं मत शनिवारी वृत्तवाहिन्यांशी बोलताना व्यक्त केलंय. याबाबत निवडणूक आयोगाकडे मागणी करणार असल्याचंही तावडे यांनी सांगितलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर “रताळाला म्हणतंय केळं आणि दुस-याच्याच लग्नात नाचतंय खुळं” या बोच-या शब्दांत राज यांच्यावर टीका केलीय. अर्थात, राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं शक्यच नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अशाच शब्दांत प्रत्युत्तर देणं अपेक्षित होतं.
नरेंद्र मोदी यांच्यावर रोखठोख पण अभ्यासपूर्ण टीका करून ‘राजा नागडा आहे’ हे सांगण्याची हिंमत राज ठाकरे यांनी दाखवली आहे. ही टीका भाजप नेतृत्वाला इतकी झोंबतेय की, काँग्रेस-राष्ट्रवादी या आपल्या मुख्य विरोधीपक्षांवर टीका करायची सोडून मुख्यमंत्र्यांसह भाजपचे सर्व नेते राज ठाकरेंवर टीका करत बसलेत. एकही खासदार-आमदार नसलेल्या पक्षाच्या नेत्याची, त्याने उपस्थित केलेल्या मुद्द्यांची ही ताकद आहे!
आजपासून फक्त दोन-तीन आठवड्यांपूर्वी मनसे किंवा राज ठाकरे यांच्याविषयी माध्यमांमध्ये किंवा अगदी लोकांमध्येही नेमकी काय चर्चा सुरु होती ते आठवून पहा. राज ठाकरे आणि मनसे हे महाराष्ट्राच्या राजकारणातले थट्टेचा विषय झाले होते. मनसेने लोकसभा निवडणूक लढवली नाही तर राज्याच्या राजकारणात या पक्षाला कोणतंही स्थान राहणार नाही, हा निष्कर्ष अनेकांनी काढला होता. विधानसभेनंतर मनसे हा पक्ष दारुण पराभव होऊन संपलेला असेल, असं भाकीतही काही तज्ज्ञमंडळींनी व्यक्त केलं होतं. मनसेला तरायचं असेल तर राज यांनी यांव केलं पाहिजे, त्यांव केलं पाहिजे, असे सल्ले पत्रपंडित देत होते. पण प्रत्यक्षात घडलं ते उलटंच. हवा झाली ती फक्त मनसेचीच!
थेट निवडणूक लढवणा-या प्रमुख राजकीय पक्षांपेक्षा निवडणुकीसाठी उमेदवारच उभे न करणा-या मनसेचीच चर्चा आज सर्वाधिक होतेय. एरवी मनसेची चर्चा होते ती फक्त खळ्ळ-फट्यॅकमुळे किंवा गुद्द्यांमुळे. आज चर्चा होतेय ती राज ठाकरे मांडत असलेल्या मुद्द्यांमुळे! स्वत:चं, स्वत:च्या राजकीय पक्षाचं अस्तित्वच पणाला लागलेलं असतानाच्या काळात राज यांनी मोठ्या धैर्याने आणि कल्पकतेने पुन्हा एकदा स्वत:साठी, स्वत:च्या राजकीय पक्षासाठी, पक्षातील लहान-मोठ्या पदाधिका-यांसाठी ‘राजकीय जागा’ निर्माण केली आहे. या अर्थाने राज यांना ‘राजकीय डिझायनर’ म्हणायला हरकत नसावी.