शेखर जोशी
प्रसंग १
काँग्रेसशी युती करणे हा शिवसेनेच्या कुटनीतीचाच एक भाग होता हे आता तरी लक्षात येताय का तुझ्या ? असा प्रश्न मोठ्या विजयोन्मादाने संजयने विचारला आणि मी हो हो अशी नुसतीच मान डोलावली.
दोन्ही कॉंग्रेसबरोबर आम्ही हातमिळवणी केली म्हणून तुम्ही सगळे शिवसेनेला नावं ठेवत होतात ना? शेवटी शिवसेनेने ‘करुन दाखवलं’. उद्धव साहेबांनी मोठ्या साहेबांना दिलेले वचन अखेर पूर्ण होत आहे. आहेस कुठे तू?
महाराष्ट्राला पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री मिळणार आहे. आता बघच तू आमचा राज म्हणतो तसे उद्धव साहेब महाराष्ट्राला सुतासारखा सरळ करतील की नाही. मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्षे वाटून घ्यायचे हा आमचा हट्ट त्यासाठीच होता. कारण हा हट्ट भाजप कधीही पूर्ण करणार नाही याची आम्हाला कल्पना होती तरीही आम्ही आमचा हट्ट सोडला नाही. त्याचे फळ आम्हाला आता मिळणार आहे. याच साठी केला होता सारा अट्टाहास.
कितीही नाही म्हटले तरी भाजपचे मोठा भाऊ होणे आमच्या कधीच पचनी पडले नव्हते. उद्धव साहेबांच्या मनात कुठेतरी ते डाचत होतेच. भाजपबरोबर गेलो तर उपमुख्यमंत्री पदावरच पाच वर्षे काढावी लागली असती शिवाय मुख्यमंत्रीपदही मिळाले नसतेच. भाजपचा हा सर्व खेळ माझ्या बरोबर लक्षात आला आणि मी उद्धव साहेबांच्या खनपटी बसून दोन्ही कॉंग्रेसशी युती करण्याचा गनिमी कावा त्यांच्या गळी उतरवला, असे संजयने सांगितले.
प्रसंग २
संपूर्ण शिवाजी पार्कवर ढोल-ताशांचा गजर सुरु झाला होता, त्यातच सनईचे मंगल सूरही निनादत होते. तुतारी फुंकली जात होती. हळूहळू शिवसेना आणि दोन्ही कॉंग्रेसची दिग्गज नेते मंडळी व्यासपीठावर यायला सुरुवात झाली. उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे, अरविंद सावंत, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे कमी की काय म्हणून दस्तुरखुद्द अहमद पटेल, मल्लिक्कार्जून खरगे ही सर्व मंडळी धोतर, कोल्हापूरी फेटा आणि महात्मा फुले शैलीची पगडी घालून आली होती. तेवढ्यात सोनिया गांधी या नऊवारी साडी, नथ, अंबाडा अशा मराठमोळ्या वेषात व्यासपीठावर आल्या आणि तुतारी जरा जास्तच जोरात वाजवली गेली असे मला उगीचच वाटले. छोटा राहुलही उत्सुकतेने सगळीकडे पाहात होता, बालसुलभ प्रश्न आईला विचारत होता.
प्रसंग ३
समारंभ सुरु व्हायला आता अगदी काही क्षण राहिले होते. टोकाचे मतभेद आणि विचारधारा असणा-या दोन्ही कॉंग्रेसबरोबर शिवसेनेचा हा नवा घरोबा किती काळ टिकेल? ज्या पवारांनी आजवर विश्वासघाताचेच राजकारण केले ते पवार उद्धव यांनाही कशावरून दगा देणार नाहीत? काही महिन्यातच पवार यांनी शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवून हे सरकार पाडले तर? शिवसेनेची हिंदुत्ववादी भूमिका, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी असलेला आदर, मशिदीवरील भोंगे, रस्त्यावर पढला जाणारा नमाज, महाआरती, मराठी बाणा ‘बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ ही वर्षानुवर्षे देण्यात येणारी घोषणा या सगळ्याचे आता काय होणार? असे अनेक प्रश्न माझ्या मनात फेर धरून नाचू लागले. या सर्व प्रश्नांची उत्तरे फक्त आणि फक्त संजयच देऊ शकतो हे मला माहीत होते, त्यामुळे मी विजेच्या चपळाईने संजयपाशी गेलो आणि या सगळ्याचे आता काय होणार? असा प्रश्न विचारला.
काय बावळट आहे? असा तुच्छ कटाक्ष माझ्याकडे टाकत संजय म्हणाला, तसे पाहायला गेले तर कॉंग्रेसशी आमचे जुने ऋणानुबंध आहेत. कम्युनिस्टांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी तेव्हाचे कॉंग्रेसचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी आमचीच मदत घेतली होती, गंमतीने आम्हाला तेव्हा ‘वसंतसेना’ असेही म्हटले जायचे. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या लादली तेव्हाही आम्ही इंदिरा गांधी यांचे समर्थनच केले होते. अलिकडच्या काही वर्षात राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतही आम्ही भाजपच्या कॉंग्रेसच्याच उमेदवाराला पाठिंबा दिला होता. केंद्रात किंवा राज्यात आम्ही भाजपबरोबर सत्तेत सहभागी होतो तरीही दोन्ही कॉंग्रेस आणि त्यांचे नेते करणार नाहीत, अशी टीका आम्ही वेळोवेळी केली आहे.
आणि तशीही शिवसेनेची भूमिका नेहमीच लवचिकच राहिलेली आहे. बदल हे नेहमीच चांगले असतात, असे सोयीनुसार आपल्याला बदलता, वाकता आले पाहिजे, बरोबर ना? मोडेन पण वाकणार नाही हे आता जुने झाले. आजच्या जगात वाकेन पण मोडणार नाही असे असायला हवे. अरे मोडले की सगळेच संपले ना? वाकले की कसे चांगले असते, कधीही नवी जुळवाजुळव करता येऊ शकते. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आमची ही तीन पायांची शर्यत जरी दोन, चार, सहा महिने चालली आणि नंतर संपली तरी काही बिघडत नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात ‘माजी मुख्यमंत्री’ म्हणून तर नोंद होईल ना, ती कधीच पुसता येणार नाही. आणि नंतर आम्हाला वाटले तर आमच्या जुन्या मित्रांबरोबर म्हणजे भाजपबरोबर आम्ही पुन्हा मैत्री करुच की. नाहीतरी म्हणतात ना, सुबह का भुला जब शाम को घर लौटता है तो उसे भूला नही कहेते…काय बरोबर ना? असा प्रतिप्रश्न त्याने केला आणि तो व्यासपीठाच्या दिशेने निघूनही गेला.
प्रसंग ४
अहो उठा, जागे व्हा.. वाकेन पण मोडणार नाही, ईश्वर साक्ष शपथ घेतो की, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज…काहीतरी काय बरळताय? तोंडावर पाणी मारून आमच्या सौभाग्यवतींनी आम्हाला जागे केले. आम्ही खडबडून जागे झालो, भानावर आलो…
म्हणजे हे सगळे स्वप्नच होते तर?
– शेखर जोशी
१७ नोव्हेंबर २०१९