रवि पत्की (sachoten@hotmail.com)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या अभेद्य किल्ल्यात अतिशय जिगरबाज खेळीने प्रवेश मिळवला आहे. आता सिडनीला बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार उघडून ७१ वर्षांचे स्वप्न साकार करायचे आहे. १९४७ पासून दोन्ही संघात मालिका सुरू झाल्या. आजतायागत ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणे भारतीय संघाला शक्य झालेले नाही. सिडनीला मालिका विजय मिळाला तर तो क्षण भारताचे सर्व आजी माजी खेळाडू आणि भारतीय क्रिकेट शौकीनांकरता विश्वचषक विजयाच्या बरोबरीचा असेल.

मेलबर्नवरचा विजय : मेलबर्नची खेळपट्टी पर्थपेक्षा फार वेगळी नव्हती. पर्थसारखेच चेंडू उसळत होते फक्त गोलंदाजांना थोडा जास्तं जोर लावावा लागत होता इतकेच. पहिल्याच दिवशी काही चेंडू सरपटी आल्याने पहिली फलंदाजी करणे खूप महत्वाचे ठरणार हे लगेच स्पष्ट झाले होते. त्यात कधी नव्हे ते कोहलीने टॉस जिंकला आणि मार्ग सुकर झाला. (परिस्थितीशी सुसंगत योग्य अकरा खेळाडूंची निवड केली गेली हेही अतिशय महत्वाचे) पहिल्या दिवसापासून खेळपट्टी चौथ्या दिवसासारखी खेळत होती. असमान बाऊन्समुळे दोन्ही संघांचा भर फलंदाजाला पायचीत पकडणे किंवा बाऊन्सरवर लेग साईडला पकडणे यावर होता. त्यामुळे आऊट स्विंग आणि स्लिपची जागा या गोष्टी अप्रासंगिक झाल्या. ऑस्ट्रेलियन खेळपट्टयांवर कसोटीच्या पहिल्या दुसऱ्या दिवशीच एक स्लिप आणि एक गली अशा फिल्ड प्लेसिंगची कल्पना केली नव्हती. एकंदरीत मेलबर्नची खेळपट्टी पर्थप्रमाणेच कमी दर्जाची म्हटली पाहिजे. अशा खेळपट्टीवर पहिल्या डावात चारशे धावा करणे ही अत्यंत आव्हानात्मक गोष्ट होती. पुजारा, अग्रवाल, कोहली, रोहित शर्मा सर्वांनी नेटाने फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्या पाचही दिवस गोलंदाजांना साथ देतात. त्यामुळे कसोटी अनिर्णित राहण्याची शक्यता कमी असते. पॉन्टींगने पुजाराच्या खेळीविषयी केलेले भाष्य हे त्याच्या संथ खेळीला टार्गेट करण्यासाठी नव्हते, तर भारतीय गोटाला कनफ्युज करण्यासाठी होते हे ज्यांना कळले नाही, त्यांनी त्यावर तासनतास चर्चेची गुऱ्हाळे चालवली. भारतीय संघाला मात्र पुजाराने विजयाची कोनशिला बसवली आहे हे व्यवस्थित माहित होते.

भारताच्या चारही गोलंदाजांनी अतिशय दर्जेदार चेंडूवर विकेट्स काढल्या याचा विशेष आनंद झाला. बुमराहने स्लोवर वनवर घेतलेली शॉन मार्शची विकेट दिर्घकाळ स्मरणात राहील. आफ्रिकेच्या रबाडाईतका बुमराहचा धाक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रस्थापित झाला आहे, असे आता म्हणता येईल.

समालोचनाचा घसरलेला दर्जा : ऑस्ट्रेलियन क्रिकेटने क्रिकेट प्रक्षेपणाचे हक्क फॉक्स स्पोर्ट्स आणि चॅनेल 7 यांना दिले आहेत. या चॅनेलवाल्यांनी कसोटी क्रिकेटला कॉमेंट्री बॉक्समधून अधिक नाट्यमय करायचे असा चंग बांधल्यामुळे कसोटी समालोचन टी२० च्या समालोचनाच्या वळणावर गेले आहे. (यातला एक समालोचक तर फॉर्म्युला वनचा समालोचक असल्याने तो कायम सुसाटच असतो.) त्यामुळे कॉमेंट्री बॉक्सचे थिएटर झाले आहे. एक धाव काढली तरी षटकारासारखे ओरडण्याची ही स्टाईल कसोटीच्या मूळ संयत चारित्र्याशी विसंगत आहे. (रिची बेनोच्या आत्म्यास शांती मिळो) या कोलाहलात डॉमनिक कॉर्क, मार्क बुचर या सोनी चॅनेलच्या ब्रिटिश समालोचकांनी कसोटी समालोचनाचा दर्जा राखला. मायकल क्लार्कला ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे सखोल ज्ञान असल्याने तो श्रवणीय आहे.

प्रेक्षकांना माईकवरून स्लेजिंग ऐकवणे म्हणजे टीआरपीचे विकृत रूप : टीम पेन रोहितला काय म्हणाला, ऋषभ पंतला काय म्हणाला, मग पंत त्याला काय म्हणाला हे स्टंप माईक चालू ठेऊन प्रेक्षकांना ऐकवण्याची काय गरज आहे? शालेय क्रिकेटमध्ये लहान लहान मुले एकमेकांचा गलिच्छ भाषेत उद्धार करतात ते स्लेजिंगच्या उदात्तीकरणामुळेच. वास्तविक मागच्या जन्मात लग्नकार्यात ज्यांचे मानपान राहून गेले असे अतृप्त आत्मेपुढील जन्मात मैदानावर एकमेकांना जे खतरुड टोमणे मारतात, त्याला स्लेजिंग म्हणतात अशी स्लेजिंगची व्याख्या करता येईल इतका तो फालतू प्रकार आहे. क्रिकेट म्हणजे युद्ध आहे, तिथे लढवय्ये लागतात असं म्हणता तर तुमच्या बॅट आणि बॉलमध्ये तेवढा दारुगोळा नाही म्हणून तुम्हाला स्लेजिंगच्या लवंगी फटाक्यांचा आधार लागतो असे म्हटले पाहिजे. प्रेक्षकांना स्लेजिंग ऐकवणाऱ्या चॅनलवाल्यांची पुढची पायरी काय असेल? याचा विचारही करवत नाही.

पॅट कमिन्सचे महत्व : पॅट कमिन्स हा जितका चांगला फास्ट बॉलर आहे तितकाच सलामीच्या फलंदाजांचे तंत्र आणि कणखरपणा असलेला फलंदाज आहे. खेळपट्टीवर अनेक खाली राहिलेल्या चेंडूंचा त्याने एकाग्रचित्ताने आणि निग्रहाने मुकाबला केला ते फारच वाखाणण्याजोगा होते. भावी काळात त्याच्यात मायकल क्लार्कला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार दिसत आहे ते उगाचच नाही.

आता भारतीय प्रशिक्षकांचे कौशल्य पणाला लागेल : आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षकांचे काम खेळाडूंना मॅटर देणे (फलंदाजी आणि गोलंदाजी शिकवणे), मॅनर देणे (खेळण्याची पद्धत शिकवणे) हे नसते तर प्रोत्साहन देणे (मोहीम फत्ते करायला लागणारी सर्व ऊर्जा, स्फूर्ती देणे) हे असते. सिडनीत इतिहास घडवायचा असेल तर भारताला अकरा खेळाडू नाहीत, तर ध्येयाने भारावलेले अकरा योद्धे हवे आहेत. त्यांना त्याकरता तयार करण्यासाठी रवि शास्त्री, बी. अरुण आणि संजय बांगर यांचे सारे कौशल्य पणाला लागणार आहे. ७ जानेवारीला या सुवर्णक्षणाचा आनंद लुटण्याची संधी भारतीय संघ आपल्या सर्वांना देवो ही सदिच्छा.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blog will team india create history after 71 years