बॉलिवूड हे नाव आपल्या डोळ्यासमोर आलं तरी काही ठराविक कलाकारांचे चेहरे समोर येतात. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार आणि इतर काही. यातील अभिनेता अक्षय कुमारचा आज वाढदिवस आहे. तो काही माझा फार आवडता अभिनेता वैगरे नाही. पण आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला ट्रोल करण्यांना खुलं पत्र लिहावंस वाटतंय.
भारताच्या स्वातंत्र्य दिनी अभिनेता अक्षय कुमारला भारताचे नागरिकत्व प्राप्त झाले. यानंतर काहींनी त्याचे कौतुक केले तर काहींनी नेहमीप्रमाणे त्याला ट्रोल. भारताचे नागरिकत्व असण्यापूर्वी त्याच्याकडे कॅनडाचे नागरिकत्व होते. त्यामुळे त्याच्या प्रत्येक चित्रपटावेळी काही ट्रोलर्सकडून सातत्याने त्याला ट्रोल केले जात होत होते. पण या सर्व ट्रोलर्सला मला एक साधा प्रश्न विचारावासा वाटतो, जेव्हा अक्षय कुमारकडे कॅनडाचे नागरिकत्व होते तेव्हा तुम्ही त्याला ट्रोल केलंत. पण जेव्हा त्याला भारतीय नागरिकत्व प्राप्त झाले, तेव्हा तुम्ही त्याचे तोंडभरुन कौतुक केलंत का? नाही ना…. म्हणजे मी तरी अक्षय कुमारला भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर कोणी त्याचे कौतुक केलेले वाचले नाही.
आणखी वाचा : Open Letter: गौतमी पाटील, तुला हात जोडून विनंती आहे की महाराष्ट्राचा बिहार करु नकोस!
खरंतर परदेशी त्यातही कॅनडाचे नागरिकत्व सोडून भारतीय नागरिकत्व स्वीकारणे ही गोष्ट फार मोठी आहे. जर तुमच्यापैकी एखाद्याकडे परदेशी नागरिकत्व असेल तर तुम्ही ते सोडाल का? नाही. कारण त्यातून मिळणाऱ्या फायद्यांची तुम्हाला चांगलीच कल्पना आहे. आजही आपल्यातील अनेक जण परदेशी नागरिकत्वासाठी झगडताना दिसतात. पण त्यात अक्षय कुमार मात्र अपवाद ठरला. त्याने परदेशी नागरिकत्व असताना त्याचा त्याग करुन भारतीय नागरिकत्वासाठी अट्टाहास केला आणि भारतीय नागरिकत्व मिळवलेही. याबद्दल एक भारतीय म्हणून मला त्याचा खूप अभिमान आहे.
बरं तुम्ही ज्याला कॅनडा कुमार म्हणून ट्रोल करता तो दरवर्षी भारतात सर्वाधिक कर भरणाऱ्या सेलिब्रेटींच्या यादीत अव्वल स्थानावर असतो. गेल्या कित्येक वर्षांपासून तो नियमित न चुकता कर भरतो. त्यामुळे भारतात सर्वाधिक कर भरणारा अभिनेता म्हणूनही त्याला ओळखले जाते. त्याला कॅनडाचे नागरिकत्व असताना तिथेही कर भरण्याचा पर्याय होता. मात्र तो कायमच भारतात कर भरण्याला प्राधान्य देत आला आहे. त्याला भारताबद्दल प्रचंड अभिमान आहे. विशेष म्हणजे वेळोवेळी त्याने तो सिद्धही केला आहे.
आणखी वाचा : पत्रास कारण की… टिकली! भिडे आजोबांना नातीने लिहिलेलं खुलं पत्र
अक्षयचा जन्मही भारतातील अमृतसरमध्ये झाला. त्यामुळे तो मूळ भारतीय आहे. त्याचे वडील सैन्यात होते. वडील निवृत्त झाल्यानंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब मुंबईत राहायला लागले आणि त्यानंतर तो मुंबई ही त्याची कर्मभूमी मानतो. त्याला खूप चांगलं मराठीही बोलता येतं.
एकेकाळी जेव्हा अक्षयचे चित्रपट चालणं बंद झालं तेव्हा त्याच्या कॅनडातील मित्राने त्याला कॅनडामध्ये स्थायिक हो असा सल्ला दिला. तो तिथे गेला, त्याने नागरिकत्वासाठी अर्ज केला आणि त्याला ते सहज मिळाले. पण त्यानंतर काही वर्षांनी त्याला भारतात परतावे वाटले आणि तो भारतात परतला. नंतर त्याचे चित्रपटही हिट झाले आणि आज त्याने भारतीय नागरिकत्वही मिळवले आहे. पण तुम्ही ट्रोलर्स त्याचे कौतुक करणारच नाहीत. कारण जितक्या उघडपणे तुम्हाला एखाद्याला ट्रोल करता येतं, तितक्या उघडपणे तुम्हाला त्याच व्यक्तीचे कौतुक कधीच करता येत नाही. आजपर्यंत जरी अक्षय कुमारचे अनेक चित्रपट आपटले असतील, तरीही त्याने उचलेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे. त्याच्या या कामगिरीचे एक भारतीय मुलगी म्हणून मला निश्चितच कौतुक आहे.