चंदन हायगुंडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१ जानेवारी, २०१८ रोजी कोरेगाव भीमा परिसरात झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने गठीत केलेल्या ‘कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे’ कामकाज सुरु आहे. आयोगासमोर लाल निशाण पक्षाशी (लेनिनवादी) संबंधित कॉम्रेड भीमराव बनसोड यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात ‘जातीमुक्ती आंदोलन’ द्वारे तयार केलेला ‘सत्यशोधन समिती अहवाल’ सादर केला आहे. त्याबाबत बनसोड यांची उलट तपासणी सुरु आहे. प्रकाश आंबेडकर ‘जातीमुक्ती आंदोलन’ चे निमंत्रक असल्याचे बनसोड यांनी उलट तपासणीत सांगितले. २६ फेब्रुवारी २०१९ रोजी साक्षीदार सागर शिंदे यांचे वकील प्रदीप गावडे यांनी उलट तपासणी दरम्यान बनसोड यांनी संपादित केलेले “कोरेगाव भीमा ते वढू बुद्रुक” हे पुस्तक आयोगासमोर सादर केले. सुगावा प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या पुस्तकात विविध लेखकांचे २५ लेख आहेत. त्यात प्रकाश आंबेडकरांनी लिहिलेला “कोरेगावचा अपमान” हा लेख ही समाविष्ट आहे.

या लेखानुसार प्रकाश आंबेडकर म्हणतात “….११९० पर्यंत कोरेगाव स्तंभाला फार कमी लोक भेट देत. १९९० साली कार्यक्रमाला सुरवात केली. त्याच्या दुसऱ्या वर्षांपासून लष्कराने येऊन सकाळी मानवंदना द्यायला सुरवात केली. आजही अनेक जण अनभिज्ञ आहेत कि कोरेगाव स्तंभ हे महार बटालियनचे मानचिन्ह आहे. आणि प्रत्येक महार बटालियनला मानचिन्ह म्हणून मान्यता मिळालेली आहे. नंतरच्या दोन वर्षातच कोरेगावचा स्तंभ १ जानेवारी हा सर्व फुटीरवादी, विभक्तवादी दलालांचा राजकीय परवाने नूतनीकरण करण्याचा अड्डा झाला. त्याचे फलित असे की लष्कराने स्तंभाला मानवंदना देण्याचा कार्यक्रमातूनच माघार घेतली. हे फुटीरवादी नेत्यांची, गटवादी नेत्यांची कामाची लष्कराला हुसकावून लावणे हि फलश्रुती आहे. आज कोरेगाव स्तंभाला शौर्याचे चिन्ह किंवा अस्पृश्य महार समाजाने इतिहास घडवला याचा कसलाही लवलेश राहिलेला नाही. तर त्याला जत्रेचे स्वरूप आले आहे. ज्यावर्षी कोरेगाव भीमाची जत्रा झाली त्या दिवसापासून लांबूनच कोरेगावच्या स्तंभाला जिथे आहे तिथून मानवंदना करतो. त्या जत्रेमध्ये सहभागी होण्याची इच्छाच होत नाही….”

याबाबत आपण प्रकाश आंबेडकरांशी सहमत नसल्याचे बनसोड यांनी उलट तपासणीत सांगितले. बनसोड यांची साक्ष अद्याप पूर्ण झाली नसून सरकार पक्षाचे वकील शिशिर हिरे त्यांची उलट तपासणी घेत आहेत.

कोरेगावच्या लढाईला २०० वर्ष पूर्ण झाल्याने १ जानेवारी २०१८ रोजी लाखोंच्या संख्येने जयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आले होते. त्यादिवशीही प्रकाश आंबेडकर जयस्तंभाला आल्याचे दिसून येत नाही. आदल्या दिवशी ३१ डिसेंबर २०१७ ला पुण्यात शनिवार वाड्यावर आयोजित एल्गार परिषदेत मात्र प्रकाश आंबेडकर पूर्ण वेळ सहभागी होते व तेथे त्यांनी भाषण केले, अध्यक्षपदही स्वीकारले. एल्गार परिषद आयोजकांनी १ जानेवारीला “चलो भीमा कोरेगाव” ची हाक देत जयस्तंभाकडे जाण्यासाठी “प्रेरणा मार्च” घोषित केला होता. मात्र आंबेडकर तसेच एल्गार परिषदेच्या मुख्य आयोजकांपैकी अनेक जण १ जानेवारीला जयस्तंभाला गेल्याचे दिसून आले नाही. यावर्षी १ जानेवारी, २०१९ रोजी मात्र प्रकाश आंबेडकर कोरेगाव जयस्तंभाला मानवंदना देण्यास गेले होते.

दरम्यान २२ डिसेंबर, २०१७ रोजीच्या द इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, भारतीय लष्करासाठी कोरेगावची लढाई सैन्य इतिहासातील महत्वाची घटना आहे. मात्र या लढाईला जातीय रंग दिला जाऊ लागल्याने लष्कराने त्यापासून लांब राहायचे ठरविले.

मागील वर्षी चौकशी आयोगासमोर मुक्त पत्रकार चंद्रकांत पाटील यांनी १ जानेवारी १८१८ कोरेगावच्या लढाईबाबत इतिहासातील महत्वाचे कागदपत्र, संदर्भ  सादर करून या लढाईला कोणताही जातीय, धार्मिक रंग दिला जाऊ नये व कोरेगाव जयस्तंभ भारतीय लष्कराच्या ताब्यात देण्यात यावा असे प्रतिपादन केले आहे.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandan haygunde blog on why prakash ambedkar avoid to visit koregaon bhima vijay stambh