-सॅबी परेरा

राजकारण बदलायचं असेल, त्याचा स्तर उंचावायचा असेल तर राजकारणी बदलले पाहिजेत, राजकारण्यांची मनोवृत्ती बदलली पाहिजे असं वर्षानुवर्षे बोललं जाते. राजकारणात येणारा प्रत्येक नवा भिडू आपण हा बदल आणू, राजकारणाची गटारगंगा स्वच्छ करू अशी भाबडी आशा जनतेला दाखवतो. पण अंतिमतः तोही कोणत्या तरी प्रस्थापित राजकीय नेत्याला किंवा पक्षाला जाऊन मिळतो आणि तेच ते जातीपातींचं, फाटाफुटीचं, दंग्याधोप्याचं राजकारण मागील पानावरुन पुढे सुरु राहतं.

Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
naga chaitianya sibhita dhulipala wedding card viral
नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपालाची दाक्षिणात्य ढंगातील लग्नपत्रिका झाली व्हायरल, ‘या’ तारखेला होणार विवाहसोहळा
Marathi actress Mukta Barve special post after appearing in Indrayani serial
‘इंद्रायणी’ मालिकेत झळकल्यानंतर मुक्ता बर्वेची खास पोस्ट, म्हणाली, “कितीतरी दिवसांनी…”
star pravah new serial tu hi re maza mitwa starring sharvari jog and Abhijit amkar
नव्या मालिकांची मांदियाळी! ‘स्टार प्रवाह’वर पुनरागमन करतेय ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री, जाहीर केली मालिकेची वेळ अन् तारीख…
Savlyachi Janu Savli
Video: “मी ही बघतेच कशी…”, हळदीच्या कार्यक्रमात भैरवीचे सावलीच्या वडिलांना चॅलेंज; मालिकेत येणार ट्विस्ट
Savita Malpekar On Kiran Mane
“चॅनेलने किरणला ४ वेळा वॉर्निंग दिली, मग काढलं” मालिकेच्या सेटवर नेमकं काय घडलं? सविता मालपेकरांनी स्पष्टच सांगितलं…
korean spy and zombie movies ott a hard day
झॉम्बीजचा भयानक थरार ते गुप्तहेरांच्या गूढ कथा, OTT वरील ‘या’ वेब सीरिज पाहून उडेल थरकाप

प्रत्येक नवा राज्यकर्ता ही जुन्यांचीच बिघडलेली आवृत्ती आहे, हे सत्य जनतेला कळेस्तोवर जनतेनेच नवा राज्यकर्ता निवडणुकीद्वारे आपल्या डोक्यावर बसवलेला असतो. जनतेची स्मरणशक्ती क्षीण असते या गोष्टींचा फायदा घेऊन राज्यकर्ते बेजबाबदारपणे पैशांचा आणि सत्तेचा खेळ खेळत राहतात. कार्यकर्ते आपापल्या पक्षाच्या आणि नेत्यांच्या नावाने आपापसात झगडत राहतात, छोटे-मोठे बिझनेसमन, गुंड आणि माफिया राजकारणातले प्यादे म्हणून वापरले जातात आणि त्यांची गरज संपली की संपवलेही जातात.

डिज्नी हॉटस्टारवर रिलीज झालेल्या “मायानगरी सिटी ऑफ ड्रीम्स” या वेबसिरीजचा दुसरा सीजन अशाच राजकारण खेळणाऱ्या, राजकारणात खेळवल्या जाणाऱ्या आणि राजकारणापायी जीवाचा खेळखंडोबा होणाऱ्या लोकांच्या वर्तनांवर, भावभावनांवर भाष्य करतो.

अमेयराव गायकवाड या महाराष्ट्राच्या राजकारणातील वजनदार नेत्यावर झालेल्या अयशस्वी खुनी हल्ल्यानंतर, गायकवाड कोमामध्ये गेलेले असताना भडक डोक्याचा, ड्रग्जच्या आहारी गेलेला आणि क्रूर स्वभावाचा त्यांचा मुलगा आशिष (सिद्धार्थ चांदेकर) आणि आपल्यात यशस्वी राजकारणी व्हायचे सर्व गुण असूनही केवळ मुलगी असल्यामुळे आपल्याला डावलले जाते अशी भावना झालेली अमेयरावांची मुलगी पूर्णिमा (प्रिया बापट) ह्यांच्यात रंगलेला राजकारणाचा डाव या वेबसिरीजच्या पहिल्या सीजनमधे येऊन गेलाय.

‘मायानगरी सिटी ऑफ ड्रीम्स’च्या दुसऱ्या सीजनमधे आपल्यावरील जीवघेण्या हल्ल्यातून वाचलेले परंतु व्हीलचेअरला खिळून असलेले अमेयराव गायकवाड राजकारणात पुनरागमन करायच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे, आपल्या वडिलांचा आपल्याला आशीर्वाद आहे असं दाखवत पूर्णिमा गायकवाडने महाराष्ट्र जनशक्ति पार्टीचं अध्यक्षपद आणि मुख्यमंत्री पदाची खुर्ची काबीज केलेली आहे. आपल्या वडिलांप्रमाणे जातीवादाचं, श्रेयाचं, कुरघोडीचं आणि पैशाचं राजकारण न करता लोकाभिमुख राज्यकारभार करायची पूर्णिमाची धडपड आहे. अमेयरावांना आशिषने आपला राजकीय वारसा पुढे चालवावा असं मनोमन वाटत होतं. पण मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचण्यासाठी पूर्णिमाने आपल्या रस्त्यातून, आपल्या भावाचा काटा काढलेला आहे. अमेयराव गायकवाड गुपचूप आपल्या राजकारण परतीची तयारी करत असून त्यासाठी त्याचा हातखंडा असलेल्या जातीयवादी दंगलीचा आधार घ्यायचा त्याचा प्लान आहे.

संधीसाधू, क्रूर आणि सत्ताप्राप्तीसाठी कुठल्याही थराला जायला तयार असणाऱ्या अमेयराव गायकवाडांच्या भूमिकेत अतुल कुलकर्णीने कमालीचा अभिनय करून पहिल्या सिजनमध्ये त्याच्या भूमिकेला फारसा वाव नव्हता, त्याची पुरेपूर भरपाई केलेली आहे. राजकारणी कुटुंबात राहूनही राजकारणापासून दूर असलेली आज्ञाधारक मुलगी पूर्णिमा, राजकारणापायी आपल्या प्रेमाची तिलांजली द्यावी लागलेली प्रेयसी पूर्णिमा, मुलाचं प्रेम मिळविण्यासाठी तडफडणारी आई पूर्णिमा, ते राजकारणात फ्रंटफूटवर येऊन तडाखेबाज राजकीय फटकेबाजी करणारी धूर्त मुख्यमंत्री पूर्णिमा गायकवाड हा प्रवास प्रिया बापटने सुंदर रेखाटलाय. सिद्धार्थ चांदेकर रूढार्थाने या दुसऱ्या सीजन मधे नसला तरी त्याची (आणि पहिल्या सीजनमधे त्याने बहारदारपणे रंगवलेल्या ‘आशिष’ची) छाया संपूर्ण सिरीजभर पडलेली आहे.

आपल्यावरील एंकाऊंटर स्पेशलिस्ट्सचा डाग पुसून अडगळीतून, पोलिसी वर्दी उतरवून, राजकारणाच्या लाइमलाईट मधे येण्यासाठी धडपडणारा वासिम (एजाज खान), अमेयराव गायकवाडचा उजवा हात असलेला जितेन भाई (उदय टिकेकर), संधीसाधू मुख्यमंत्री (सचिन पिळगावकर), आणि टिपिकल मध्यमवर्गीय, गरजेपेक्षा जरा अधिकच प्रामाणिक असलेला पुरुषोत्तम (संदीप कुलकर्णी) या सर्वांचीच कामे उजवी झाली आहेत. मोजकंच बोलणारा दक्षिण भारतीय गँगस्टर अन्ना, सुशांत सिंगने केवळ आपल्या बोलक्या डोळ्यांनी पुरेपूर क्रूर आणि खतरनाक केलाय.

केवळ सत्ताधारी मजबूत असून चालत नाहीत तर त्यांच्यावर कंट्रोल ठेवणारा विरोधी पक्ष मजबूत असला तरच देशाचा कारभार चांगला चालू शकतो. सिटी ऑफ ड्रीम्स मधला विरोधी पक्ष खूपच लेचापेचा दाखवलाय. तो जर तुल्यबळ दाखवला असता तर कथानकात अधिक रंगत आली असती असे वाटून जाते.

वेबसिरीजच्या या काळात शिव्यांना आपले कान आता बऱ्यापैकी सरावलेले असले तरी अनावश्यक असलेले सेक्स सीन टाळता आले असते तर ही सिरीज सहकुटुंब-सहपरिवार पाहण्यासारखी झाली असती.

पहिल्या सीजन प्रमाणेच दुसऱ्या सिजनचेही सुरुवातीचे चारपाच एपिसोड संथ चालतात आणि शेवटाकडे सिरीज पकड घेत जाते. कथेमध्ये ट्विस्ट आहेत, वळणं आहेत, धक्के आहेत, उपकथानकं आहेत. हे सगळं रंजक असलं तरी काहीशा धीम्या गतीने चालणारं आणि बरंचसं प्रिडीक्टेबल आहे. सीरिजचं टायटल सॉंग अतिशय सुंदर आणि कथानकाचा बाज स्पष्ट करणारं असून पार्श्वसंगीत देखील उल्लेखनीय आहे.

‘माया नगरी सिटी ऑफ ड्रीम्स’चा सीजन-१ पाहायचा राहून गेला असेल तर आधी तो पहा आणि नंतर सीजन-२ पहा. राजकीय नाट्य आवडणाऱ्या प्रेक्षकांना नक्की आवडेल असा हा रंजक राजकीय सारीपाटाचा खेळ आहे.