– जगदीश कस्तुरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुन्हे आणि गुन्हेगार यांना प्रतिबंध करण्याकरता पोलिस प्रशासन हे कटिबध्द असल्याचे आपण आतापर्यंत पाहात आहोत. पण गुन्हे करणार्‍या हातांना काम उपलब्ध करुन दिल्यास गुन्हे घडण्याचे प्रमाणच कमी होते. जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरही मदत केलेल्यांकडून लक्ष ठेवलेच जाते. तसेच पोलिस प्रशासन हे गुन्हेगारीवर आळा आणणे आणि गुन्हेगारांना शिक्षा करण्याशिवाय समाजात मिसळून गुन्हेगारीवर वेगळ्या पध्दतीने नियंत्रण आणण्याचा जो प्रयत्न करत आहे. तो स्तुत्य उपक्रम असल्याची भावना नागरिकात रुजत आहे.

गुन्हेगारी ला जन्म घालणार्‍या प्रवृत्ती बेरोजगारी आणि दुष्काळ यांनाच संपवण्याचा प्रयत्न औरंगाबादचे पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद करत आहेत. यापूर्वीही नांदेड मधे विशेष पोलिस महानिरीक्षक असतांना प्रसाद यांनी पोलिस प्रशासनातर्फे नांदेड जिल्ह्यातील दोन गावे दुष्काळ निवारणासाठी दत्तक घेतली होती. औरंगाबादेत गेल्या दोन महिन्यांपासुन चार पोलिस अधिकारी आणि एक समाजसेवी संस्थेची मदत घेत पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना कम्युनिटी पोलिसिंगवर भर दिला आहे. आतापर्यंत शहरातील जवळपास दोनशे तरुण आणि महिलांच्या हातांना या उपक्रमातून रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

गेल्या जानेवारीत भिमा कोरेगाव प्रकरणात शहरात दंगली उसळल्यानंतर पोलिसांकडून झालेल्या कारवाईत जे अल्पवयीन तरुण पकडले गेले. त्यांच्या हाताला शिक्षण आणि काम उपलब्ध करुन देण्यात पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी पुढाकार घेतला. झोपडपट्टी भागात जाऊन ज्यांना चांगलं जीवन जगण्याची इच्छा आहे. त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. तर त्यांच्याचकडून झोपडपट्टीदादांवर लक्षही ठेवलं जात आहे.
या उपक्रमात सक्रीय असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक घनशाम सोनवणे यांनी दोन महिन्यांपूर्वी इंदीरानगर मधील ९६ मुलांना इंडोजर्मन टूल आणि सिपेट येथे कायमस्वरुपी रोजगार मिळणारे शैक्षणिक कोर्स मधे प्रवेश मिळवून दिला. वडगाव कोल्हाटी येथील शताब्दीनगरातील पाच महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले. तसेच बनेवाडी परिसरातील ६० महिलांना पुण्याहुन आणलेल्या प्रशिक्षकाकडून कापडी आणि कागदी पिशव्या तयार करण्याचे विशेष ट्रेनिंग दिले. त्या महिलांच्या उत्पादनाला डी.मार्ट, ग्रीनगोल्ड सीड या कंपन्यांकडून ऑर्डर मिळवून दिल्या. तसेच शहरातील काही मोठ्या व्यापार्‍यांनीही या महिलांच्या कापडी आणि कागदी पिशव्या खरेदी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. उपक्रमात डॉ. किशोर उढाण यांची धवलक्रांती सामाजिक संस्था हिरारीने सहभागी झाली आहे. त्याच प्रमाणे पडेगावातील सॅमसन नॅचरल कुलर या कंपनीत पडेगाव भागातील ७ जणांना ५०० रु.रोज असा रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा उपक्रम राबवला जात आहे. हा उपक्रम राबवण्यामधे पोलिसआयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय घनशाम सोनवणे पोलिस उपनिरीक्षक स्वन्पील विटेकर, विनोद काळे, पोलिस कर्मचारी अविनाश जोशी, सुखमनी पगारे तसेच धवलक्रांती सामाजिक संस्थेचे प्रमुख डॉ. किशोर उढाण अहोरात्र मेहनत घेत आहेत.

कम्युनिटी पोलिसिंग अर्थात पोलिसांचा संवादातून समाजात सहभाग हा उपक्रम आपणराबवल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळलेले अनेक तरुण सन्मार्गाला लावण्यात आम्हाला यश आलं आहे. वाईट मार्गाकडून चांगल्या मार्गाकडे वळलेला तरुण जेव्हा आम्हाला पुन्हा भेटतो त्यावेळी त्याच्या चेहर्‍यावरचा जगण्यातला आत्मविश्वास पाहुन कम्युनिटी पोलिसिंग हा प्रकल्प सत्कारणी लागल्याचे जाणवते अशी भावना औरंगाबादचे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Community policing initiative of aurangabad police
Show comments