– योगेश मेहेंदळे
डार्केस्ट अवर या दुसऱ्या महायुद्धावरील चित्रपटातील एक प्रसंग आहे. किंग जॉर्ज (सहावा) व नवनियुक्त पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांची दुपारच्या जेवणाच्यावेळी भेट होते. चर्चिल यांच्या हातात मद्याचा ग्लास असतो. किंग जॉर्ज विचारतात, दिवसा मद्यप्राशन करणं तुम्हाला जमतं कसं? यावर चर्चिल एका शब्दात उत्तरतात, सवय!
आजच्या घडीला जर का चर्चिल भारतात असते, तर मद्यपी म्हातारा कुठला!… अख्खा देश करोनाशी लढतोय नी याला दारूची पडलीय… अशी हेटाळणी करत, राज्याच्या व देशाच्या दोन्ही संस्कृतीरक्षक सरकारांनी त्यांना अनिश्चित काळासाठी क्वारंटाइन केलं असतं. चर्चिल म्हणायचे की मी अल्कोहोलशिवाय राहू शकत नाही, यशाच्या क्षणी तो माझा हक्क आहे आणि अपयशाच्या क्षणी गरज…
मद्याकडे हीन दृष्टीनं न बघणारं, चर्चिल हे गेल्या काही दशकांमधलं उदाहरण असलं तरी मानवाला जेवढा इतिहास आहे तेवढाच किंबहुना त्यापेक्षा जास्तच इतिहास मद्याला आहे. कारण माणसाला दारूचा शोध लागला नव्हता तेव्हाही ती होतीच, फक्त मानवाची तिच्याशी गाठ पडली नव्हती. अर्थात, मद्याची जितकी बदनामी गेल्या काही शतकांमध्ये झालीय तितकी आधी झाली नसावी. हजारो वर्षांच्या इतिहासातील खऱ्या खोट्या बोधकथांमध्ये तर मद्यभानाचे अनुभव सापडतात.
प्राचीन काळची गोष्ट आहे. माणसं टोळ्यांनी गुहांमध्ये रहात होती. माझा धर्म मोठा, तुझा छोटा ही भावनाच नव्हती कारण धर्मच नव्हते नी निसर्गाची विविध रुपं देव म्हणून पूजली जात. धृ या धातूपासून धर्म शब्द बनलाय, ज्याचा अर्थ आहे धारण करणं.. म्हणजे ज्यानं जे धारण केलंय तो त्याचा धर्म ही धर्माची व्याख्या होती. त्यामुळे स्वभावधर्म हा विचार आला. सापाच्या शेपटीवर पाय पडला तर तो चावतो हा सापाचा धर्म आहे हा वाक्प्रचार रुढ झाला… यापलीकडे धर्माचं उदात्तीकरण झालं नव्हतं. तर अशा काळामध्ये एक प्रथा होती. दुसऱ्या टोळीवर हल्ला करायचा असेल, टोळीमधला अंतर्गत पेचप्रसंग सोडवायचा असेल, प्रदेश सोडून दुसरीकडे जायचं असेल किंवा असाच एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल, तर त्या त्या टोळीतली ज्येष्ठ मंडळी सकाळच्या प्रहरी एकत्र येत व चर्चा करत. जर चर्चेत एखादी गोष्ट करायची सर्वानुमते ठरली तरी तीवर लागलीच शिक्कामोर्तब होत नसे… रात्री ही मंडळी पुन्हा बसत व मद्यपान करून त्याच गोष्टीवर चर्चा करत. दिवसा सद्सद् विवेकबुद्धीसह सगळ्या जाणिवा शाबूत असताना घेतलेला निर्णय, मद्यपानानंतर काही जाणिवा शिथिल झाल्यानंतरही कायम राहिला, तरच त्यावर अमलबजावणी होत असे. जर सकाळचा निर्णय रात्री फिरवला गेला तर त्यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा विचार होई. नशामुक्त अवस्था व मद्यप्राशनानंतरची अवस्था दोन्ही स्थितीत घेतलेल्या निर्णयांमध्ये एकवाक्यता असेल तरच तो निर्णय योग्य मानला जाई. नशेत नसताना मानवी भावभावनांच्या व निर्णयक्षमतेच्या ज्या पैलूंना स्पर्श होत नाही, त्यांना नशेत असताना न्याय दिला जातो व समतोल निर्णय होतो… त्यामुळे नशेत असताना व नशेत नसताना अशा दोन्ही वेळी जो सामाईक निर्णय होईल तोच योग्य असेल असं मानलं जात असे.
अर्थात, काळ बदलला, नी नशेत असताना काही चांगला विचार होऊ शकतो ही शक्यताच बहिष्कृत झाली. इतकी की, मद्याला स्पर्श देखील न करणाऱ्या माणसानं काही उलट सुलट वक्यव्य केलं तर त्याला काय दारू पिऊन आलाय का असं हेटाळलं जातं. मद्य पिणाऱ्यांची किंमत फक्त राज्याच्या महसुली उत्पन्नाच्या भरीवरून ठरायला लागली, आणि मद्य पुरवणाऱ्या त्या त्या परीसरातल्या हॉटेलांचं महत्त्व किती हप्ता गोळा होतो यावरून ठरायला लागलं.
महाराष्ट्राचा विचार केला तर मद्यपींची किंमत काय तर वर्षाला सुमारे २५ हजार कोटी रुपये, होय दरवर्षी मद्याच्या विक्रीतून राज्य सरकारच्या तिजोरीत इतकी रक्कम जमा होते. महाराष्ट्राच्या एकूण उत्पन्नामध्ये मद्याच्या विक्रीतून मिळणारं महसुली उत्पन्न दहा टक्क्यांच्या आसपास आहे. तर उत्तर प्रदेश, कर्नाटक, पंजाब, तेलंगणा, उत्तर प्रदेश, हिमाचल अशा अनेक राज्यांचं हेच प्रमाण १५ ते २५ टक्क्यांच्या घरात आहे. याचा अर्थ जवळपास एक चतुर्थांश किंवा पंचमांश महसूल फक्त मद्यपी हलाहल पचवून राज्याची तिजोरी भरतात. अप्रत्यक्षरीत्या होणारा लक्षावधींचा रोजगार वेगळाच…
परंतु, घरातल्या या प्रमुख कमावत्या मद्यपीला वागणूक मात्र मिळते फक्त तिरस्काराची, हेटाळणीची… जर मद्य इतकं वाईट असेल तर सरळ दारुबंदी का नाही करत, कारण महसूल बुडतो. दारुबंदी केली तरी बेकायदेशीर मार्गानं लोकं मद्य पिणारच, व सरकारचा महसूल मात्र बुडणार हा गुजरातचा अनुभव असल्यानं दारुबंदी करायला कुणी सहसा धजावत नाही. मग सरकारच्या तिजोरीत इतकी मोलाची भर टाकणाऱ्या या महसुलावर सरकारचा इतका डोळा आहे तर मग तो देणाऱ्याचा अगदी शाल श्रीफळ देऊन सत्कार नको पण किमान, सहा फूट अंतर राखून सरकारच्या तिजोरीत भर टाकायची संधी तरी द्यायला हवी की नाही! पण, धड पूर्ण बंदी घालायची नाही, धड सुरक्षितपणे उपलब्ध करून द्यायची नाही, या अत्यंत सार्वत्रिक अशा दांभिक भारतीय मानसिकतेत जी सगळ्या भारतीयांची फरफट होतेय त्याला मद्यपी कसे अपवाद असतील.
आता मद्यपी नशा करतात असा आरोप आहे. पण नशेत कोण नसतं? कुणाला पैशाची नशा असते, कुणाला गरिबीची! कुणाला सत्तेची नशा असते तर कुणाला विरोधाची! कुणी सौंदर्याच्या नशेत चूर असतो तर कुणी त्या सौंदर्याला मुठीत ठेवल्याच्या नशेत असतो. कुणाला पदाची नशा असते तर कुणी विरक्तीच्या नशेत धुंद असतो. कुणाला नशेत असल्याची नशा असते, तर कुणी नशा करत नाही याच नशेत असतो. कुठल्या ना कुठल्या नशेत सगळेच चूर असतात, किंबहुना ज्यांना कसलीच नशा नाही, त्यांचं जीवन व्यर्थच! पण जमेल तितकी नी जमेल तिथं भेदाभेद केलेल्या मानवानं नशे-नशेमध्येही भेद नी उच्च-नीचता करून ठेवलीय. फाइव स्टार हॉटेलमध्ये स्कॉच ते दिव्याची हातभट्टी अशी उतरंड आहे. पण वास्तव तरी हेच आहे की नशे मे कौन नही है, मुझे बता दे जरा!…
पण मद्यपींची एक गोची आहे. बाकी सगळे कसे बोंब मारू शकतात. आम्हाला धान्य मिळत नाही, औषध मिळत नाही, दूध मिळतं नाही इतकंच काय गेला बाजार मला पाणी मिळत नाही म्हटलं तरी कुणी दखल घेईल… आधी पाणी मागितलं तरी दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे शौचालयं असून वापरता येत नाहीत अशी स्थिती होती. पण हे सगळं किमान उच्चारवानं मागता तरी येतं, पण मला दारू द्या असं कसं मागता येईल, पेकाटात लाथ बसायची शक्यताच जास्त! त्यामुळे मद्यपींची अवस्था खंडाळ्याच्या घाटात रस्त्याच्या बाजुला बसलेल्या माकडांसारखी झालीय. गाड्यांच्या काचा वर होतील व काहीतरी बाहेर फेकलं जाईल अशा आशेनं ती बघत असतात. मद्यपी वाइन शॉपचं शटर वर होतंय का हे बघत असतात…