दिलीप ठाकूर-

‘Corona प्यार है’ नावाच्या सिनेमाची कल्पना कशी वाटते? तुम्हा आम्हाला ऋतिक रोशनला रुपेरी पदार्पणातच ‘स्टार’ केलेला, त्याच्या पित्यानेच दिग्दर्शिलेला ‘कहो ना..प्यार है’ ( २०००) चांगलाच माहितीये. अगदी त्याच नावाच्या जवळ जाणारे तर झालेच पण अगदी त्याचसारखेच पोस्टर डिझाईनने ‘करोना प्यार है’ हे नाव निर्माती क्रिशिका लुल्लाने ‘इम्पा’त (इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर असोसिएशन, चित्रपट निर्मात्यांची संस्था) नोंदवलेदेखील. इतक्यावरच नाही तर ‘डेडली करोना’ हेदेखील आणखी एका चित्रपटासाठी नाव नोंदवले. अशा चित्रपट नाव नोंदणीची एक फी असते आणि अनेक लहान मोठे निर्माते एखादे नाव सुचले रे सुचले की ‘इम्पा’त धाव घेतात आणि नाव नोंदवतात. अनेकदा एखाद्या गरजू निर्मात्याला ते विकता येते तो भाग वेगळा. पण एकीकडे आपण सगळेच करोनाच्या परिणाम आणि प्रचंड सावधगिरी यांच्या चक्रातून जात असताना चित्रपट निर्मात्यांनी त्यावरच ‘पिक्चर ‘ काढायचे ठरवलेही. काय प्रगती आहे ना? की आणखी काही? करोनाच्या बॅकड्रॉपवरची ही प्रेम कथा असेल म्हणे. काही हरकत नाही. चित्रपटात ताजे विषय यायलाच हवेत. त्यातून मनोरंजन आणि प्रबोधन यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करायलाच हवा. तेच तर आपल्या मुख्य प्रवाहातील चित्रपटांचे विशेष आहे. पण एकीकडे करोनाचा सगळ्यांनीच धसका घेतला असतानाच त्याच पार्श्वभूमीवर चित्रपटाची निर्मिती करायला तातडीने सुचतेच कसे? काही सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलता आहे की नाही? आणि आता अशी दोन नावे नोंदली गेली म्हणजेच काही दिवसांतच हिंदी चित्रपटाबरोबरच काही प्रादेशिक चित्रपटांच्याही (अगदी मराठीदेखील) अशाच चित्रपटांची नावे जाहीर झाली तर त्यात आश्चर्य ते काय? त्यातील नेमके किती चित्रपट पडद्यावर येतील, कसे येतील, ते कसे असतील हे सांगता येत नाही. पण ‘ताज्या घडामोडींवर चित्रपट निर्माण करण्याचा ‘ही एक उद्योग अनेक वर्षे सुरु आहे. त्यात काही सकारात्मक उदाहरणेही आहेत, तर काही फसलेली उदाहरणेही आहेत.

एक अगदी वेगळी आठवण सांगतो. निर्माता केवल कश्यपच्या ‘शहीद’ ( १९६५) या चित्रपटासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यास याच चित्रपटात भगतसिंगची भूमिका साकारलेला मनोजकुमार दिल्लीत गेला असता, तात्कालिक पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांनी तेव्हाचे आपले बोधवाक्य ‘जय जवान, जय किसान’ यावर चित्रपट निर्माण करण्याचे सुचवले. मनोजकुमारने ते गांभीर्याने घेतले आणि नवी दिल्ली ते मुंबई अशा राजधानी एक्स्प्रेसच्या प्रवासात ‘उपकार’ (१९६७) या चित्रपटाची कथा कल्पना निश्चित केली. (मनोजकुमार देशांतर्गत कधीच विमान प्रवास करीत नाही हेही योगायोगाने सांगतो.) हा चित्रपट खणखणीत यशस्वी ठरतानाच यातील ‘मेरे देश की धरती सोना उगले’ हे देशभक्तीने ओथंबलेले गाणे त्यानंतर प्रत्येक राष्ट्रीय सणात गरजेचे झाले.

ताज्या घटनांवर आधारित चित्रपटाची मग जणू लागणच लागली. १९७१ साली आपण पाकिस्तानावर युध्दात विजय मिळवला यावर अनेक चित्रपट आले. दारासिंगने ‘मेरा देश मेरा धर्म ‘ हा चित्रपट बनवला हे ठीक हो, पण वात्रट म्हणून ओळखला गेलेला आय. एस. जोहरने अतिशय सवंग असा ‘जोय बांगला देश’ या नावाने चित्रपट तर बनवला पण सेन्सॉरने नावाचा हा आचरटपणा सहन न करता या चित्रपटाचे नाव बदलायला लावून ते ‘आगे बढो’ असे करायला लावले. गंमत म्हणजे, तेव्हाच्या एकूणच सामाजिक वातावरणात हे सगळे चित्रपट चक्क यशस्वी ठरले. त्याच काळात तात्कालिक पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी ‘गरीबी हटाओ’ ही घोषणा दिली, या नावाचाही चित्रपट निर्माण झाला. विनोदकुमार नावाचा नवा चेहरा त्यात हीरो होता.

देशात आणीबाणीच्या असण्याच्या काळात काही फिल्मवाल्यानी याच आणीबाणीचे समर्थक करणारे चित्रपट निर्माण करण्याचे पाऊल टाकले. त्यात एक होते, दादा कोंडके! त्यांनी ‘गंगाराम वीस कलमे ‘ या नावाने मराठी चित्रपटाचे शूटिंग सुरु केले. आणीबाणीत सरकारने वीस कलमे जाहीर केली होती. त्याचाच पटकथेत वापर करून हा चित्रपट बनत असतानाच १९७७ साली काँग्रेसचा पराभव होऊन जनता पक्षाचे सरकार आले आणि एकूणच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वातावरण बदलले. आता दादा कोंडके यांच्यापुढे दोनच पर्याय होते. एक म्हणजे, हा चित्रपटच डब्यात ठेवणे अथवा पटकथेत फेरफार करणे. दादांनी तेच केले. चित्रपटाचे नाव बदलून ‘रामराम गंगाराम’ असे केले, हा सगळा बदल प्रेक्षकांना माहित पडावा म्हणून या चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्दीवर भरपूर जोर दिला. दादा कोंडके जे काही करतील ते ते पब्लिक डोक्यावर घेत, त्यामुळे हा चित्रपट सुपर हिट झाला हे पुन्हा वेगळे सांगायला नकोच. पण त्यानंतर दादा कोंडके कधीच अशा तात्कालिक घडामोडीवरील चित्रपटाच्या भानगडीत पडले नाहीत.

पण ही अशा प्रकारच्या चित्रपटांची निर्मिती ही जुनी प्रथा. कधी जमलेली, कधी फसलेली, कधी फक्त चर्चेपुरतीच, कधी फार सवंग, कधी तर फक्त घोषणेपुरतीच. १९९२ साली अयोध्येत बाबरी मशीद पाडली गेली आणि त्यानंतर मुंबईत झालेली जातीय दंगल, १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत झालेले बॉम्बस्फोट यावर चित्रपट येणे अगदी स्वाभाविक होतेच. त्यात उल्लेखनीय ठरले दोनच. मणी रत्नम दिग्दर्शित ‘बॉम्बे ‘ ( १९९५) आणि अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘ब्लॅक फ्रायडे’ (२००७). यातील ‘बॉम्बे’ एकाच वेळेस हिंदी, तेलुगू आणि तमिळ अशा तीन भाषेत होता आणि तो मुंबईतील घडामोडींवर आधारित असल्याने तो मराठीतही असता तर उत्तम झाले असते असाही एक सूर होता. मणी रत्नमने या चित्रपटात दाहकता फार प्रभावीपणे साकारली.

मागील काही वर्षांत सत्य घटनेवर आधारित चित्रपट मोठ्या प्रमाणात येऊ लागले. मुंबईतील २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यावर आधारित दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी ‘द अटॅक ‘ हा चित्रपट निर्माण केला, पण त्याला वृत्तपत्रीय बातम्यांचे स्वरूप आल्याने तो अपेक्षित परिणाम साध्य करु शकला नाही. बिहारमधील आदर्श शिक्षक आनंदकुमार यांच्या अडथळे आलेल्या ध्येयवादी वाटचालीवरचा ‘सुपर 30’ दर्जेदार होता. अशी आणखी बरीच बरी वा सामान्य उदाहरणे आहेत.

सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, माध्यम अशा सर्वच क्षेत्रात अनेक गोष्टी घडत असतात, त्यातील काहींवर कथा कादंबरी, एकांकिका, नाटक, माहितीपट, चित्रपट यातील काही निर्माण होऊ शकते अथवा होत असते. पण ते करताना त्या गोष्टी अधिकाधिक प्रमाणात जाणून घ्यायला हव्यात. मेघना गुलजारने ‘तलवार’ या चित्रपटात त्याचा प्रत्यय दिला. हे करायचे तर मेहनत आणि संयम हवा. आपण जे पडद्यावर आणू त्याला सेन्सॉर बोर्ड आणि बाह्य सेन्सॉर यांचा काही आक्षेप येईल का याचेही भान असावे लागते. अर्थात, जे गांभीर्याने याकडे पाहतात त्यांना ते शक्य असते. ‘छपाक’ हे अलिकडचे उदाहरण. नवी दिल्लीत भर रस्त्यात २००५ साली लक्ष्मी अगरवाल या युवतीवर झालेल्या अॅसिड हल्ल्यावर आधारित या चित्रपटासाठी दीपिका पदुकोनने भरपूर मेहनत घेतली, पण दिग्दर्शिका मेघना गुलजार हे नाट्य खुलवू शकली नाही. याचे कारण म्हणजे, या गोष्टीचा जीवच खूप छोटा होता.

‘करोना प्यार है ‘च्या घोषणेत तसे काही दिसत नाही. अगोदर नाव आणि कथा कल्पना जाहीर करुन मग त्यावर पटकथा आणि संवाद लेखन होणार आहे , बराच मोठा प्रवास आहे…काय सांगावे, बातमीत राहण्यासाठी ही घोषणा असावी. अशाही काही घडामोडींवर चित्रपट निर्मितीची घोषणा होतच असते. जे अशी घोषणा उत्तमरितीने पडद्यापर्यंत पोहचवतात तेच महत्वाचे. बाकीचे चित्रपट विसरायचे.

Story img Loader