– रसिका मुळ्ये

करोना काळात नव्या संकल्पना इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच शिक्षण क्षेत्रालाही अंगिकाराव्या लागणार आहेत. शिक्षणाचे ऑनलाइन माध्यम किंवा आभासी वर्ग हा या बदलांचाच एक भाग. पुढील काळात काळातील बदलांचा वेळीच अदमास घेऊन बाजारपेठेच्या दृष्टीने आणि विद्यार्थीहितासाठीही पावले उचलताना अनेक मूलभूत आव्हानांवर आपल्याला मात करावी लागणार आहे…

टाळेबंदीमुळे लादल्या गेलेल्या घरकोंडीने आभासी जगात अधिक रममाण झालेल्या आपल्या जगण्याच्या चौकटी गेल्या काही दिवसांत बदलून गेल्या आहेत. दैनंदिन व्यवहाराचा गाभा बदलला नसला तरी त्यात नव्या प्रवाहांनी बेमालूम शिरकाव केला आहे. जून महिना उजाडला की सकाळी मुलांना अनेक उपाय करून उठवणे, त्यांच्या कानी-कपाळी ओरडून आवरणे आणि ‘डबा घेतलास का? अभ्यास झालाय का’ अशा ठरलेल्या प्रशद्ब्राावलीसह मुलांना शाळेत धाडणे हा शिरस्ता गेल्या कित्येक पिढ्यांमध्ये चालत आला आहे. मात्र, सध्या वयानुसार रात्रभर वेबसिरीज, कार्टून्स यांच्या विश्वाात बागडलेले मूल सकाळी आवरून पेंगत शाळेत जाते, म्हणजे पहाटेपर्यंत उशाशी बाळगलेला संगणक, टॅबलेटचा स्क्रीन पुन्हा जवळ करते. शाळेने दिलेल्या अ‍ॅपवर लॉग इन करून ऑनलाइन वर्गाचे ठार ठोठावते.

करोना काळात नव्या संकल्पना इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच शिक्षण क्षेत्रालाही अंगिकाराव्या लागणार आहेत. शिक्षणाचे ऑनलाइन माध्यम किंवा आभासी वर्ग हा या बदलांचाच एक भाग. बदलती परिस्थिती आणि त्यापेक्षाही निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेत उभ्या राहिलेल्या बाजारपेठेचा रेटा टाळता येणारा नाही. मात्र, हे बदल स्वीकारताना आपली सामाजिक, आर्थिक परिस्थिती, पारंपरिक शिक्षणाची अद्यापही न बदललेली चौकट, मानसिकता यांचा विचार करणे अपरिहार्य आहे. शालेय शिक्षणात बाजारपेठेच्या दबावामुळे किंवा काहीतरी वेगळे करण्याच्या नादाने केलेले बदल विद्यार्थ्यांना पचनी पडणार नाहीत, अन् त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल.

आभासीच शिक्षण

सध्या पूर्वप्राथमिक वर्गांपासून ऑनलाइन शिक्षणाचा आग्रह खासगी संस्थांनी सुरू केला आहे आणि शिक्षण विभागानेही त्याचीच री ओढली आहे. अजूनही इंटरनेटच्या माध्यमातून शिक्षण हे राज्यातील ६० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी दुरापास्त आहे. अद्ययावत मोबाइल संच, संगणक यांची उपलब्धता आणि ती असेल तर इंटरनेटचा वापर, त्याची उपलब्धता अद्यापही सार्वत्रिक झालेली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने आखलेल्या अभ्यासक्रमाच्या चौकटीतील शिक्षण ऑनलाइन माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे शक्य नाही हे पुरेसे सिद्ध झाले आहे. त्यासाठी दूरचित्रवाणी, रेडिओ या माध्यमांचा पर्याय विभाग चोखाळत आहे. परंतु मुळातच ही एकतर्फी संवाद माध्यमे असल्यामुळे त्याला मर्यादा आहेत.

आता प्रश्न उरतो तो ऑनलाइन शिक्षणाची सुविधा असणाऱ्या विद्यार्थ्यांचा. आपल्याकडील ई-साहित्याचा दर्जा हा या नव्या प्रणालीतील कळीचा घटक आहे. ई-साहित्य निर्मितीचा विचार करताना ते नेमके कोण आणि का वापरणार आहे, याचा विचार करणे अपेक्षित असते. स्वयंअध्ययनासाठी, पालकांच्या मदतीने अभ्यास करण्यासाठी, खेळाच्या माध्यमातून शिकण्यासाठी, शाळेत किंवा वर्गात संकल्पना स्पष्ट करण्यासाठी अशा प्रत्येक गरजेनुसार साहित्याची मांडणी बदलणे अपेक्षित असते. मात्र, आपल्याकडील सद्यस्थितीतल ई-साहित्य निर्मितीची उडी ही पुस्तके पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देणे, बोलकी पुस्तके किंवा थोडे पुढचे पाऊल उचलून काही प्रमाणात अ‍ॅनिमेशनचा वापर करून संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न इतक्यापुरतीच मर्यादित आहे. त्यातही शिक्षण विभागाने पुरवलेले ई-साहित्य हे फुकट ते पौष्टिक तत्वावर गोळा करण्यात आले आहे. त्याचा दर्जा, परिणाम, तपशील यांची कोणत्याही प्रकारची तपासणी करण्यात येत नाही. पाठ्यपुस्तक मंडळाच्या म्हणजेच बालभारतीच्या स्थापनेपूर्वी खासगी पाठ्यपुस्तके होती. त्यातील तपशील वैविध्याचा समाचार घेणारा होता. ‘तुमची पृथ्वी नेमकी कोणत्या दिशेने फिरते?’ असा प्रश्न उपस्थित करणारा लेख आचार्य अत्रे यांनी लिहिला होता. आज उपलब्ध ई-साहित्याच्याबाबतीत हाच प्रश्न पुन्हा विचारण्याची वेळ आली आहे.

लवचिकता हे खरेतर ऑनलाइन किंवा डिजिटल शिक्षणाचे बलस्थान. सध्या सुरू असलेल्या ऑनलाइन शाळा या तत्वाशीच फारकत घेताना दिसतात. वर्गात उभे राहून शिकवण्याऐवजी कॅमेरासमोर फळा ठेवून शिकवणे इतक्या मर्यादित संकल्पनांच्या कक्षेत हे वर्ग सुरू आहेत. प्रत्यक्ष वर्गात शिकण्याएवढी परिणामकारकता या आभासी वर्गांमध्ये अर्थातच नाही. सध्या ऑनलाइन भरणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या काही शाळांमध्ये वर्गात होतो तेवढाही संवाद मुलांशी होताना दिसत नाही. वर्गातील वातावरण नियंत्रित असते तेथे मुलांचे लक्ष खिळवून ठेवणे जेवढे शक्य होते तेवढे अनियंत्रित आभासी वर्गांमध्ये शक्य नाही.

ऑनलाइन अध्यापनासाठी असेलेली खासगी अ‍ॅपची मांडणी मुलांना चटकन आवडेल अशी आकर्षक आहे. मात्र, अपवाद वगळता बहुतेक अ‍ॅप्स ही घोकंपट्टीशीच ताळमेळ साधणारी आहेत. पूर्वीच्या शाब्दिक पाठांतराची जागा आता दृष्यांनी घेतली आहे. विद्यार्थ्याला शिकण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या, कृतीतून शिक्षण देणाऱ्या साहित्याचा अभाव सध्याच्या ई-शैक्षणिक साहित्यात मोठ्या प्रमाणावर दिसतो. स्थानिक भाषांमधील, विद्यार्थ्यांचे राहणीमान, संस्कृती आणि अनुषंगिक भावविश्वा याला समर्पक साहित्याची उपलब्धता नसणे हा अजून एक प्रश्न. शालेय स्तरावर ऑनलाइन शिक्षणाचा आग्रह करताना त्याच्या सद्यस्थितीकडे सजगपणे पाहिले नाही तर शिक्षण खरच ‘आभासी’च राहील.

नवी बाजारपेठ

भारतातील विद्यार्थीसंख्या अर्थातच शैक्षणिक साहित्याच्या बाजारपेठेला खुणावणारी आहे. करोनाकाळात टोकाचे नुकसान आणि त्याचवेळी नव्या संधी असा विरोधाभास दिसतो. शिक्षण क्षेत्र त्याला अर्थातच अपवाद नाही. एकीकडे आर्थिक घडी विस्कटल्यामुळे करोडो रुपयांची गुंतवणूक करून उभ्या राहिलेल्या चकचकीत, तारांकित शाळांसमोर अनेक आव्हाने आहेत. त्याचवेळी ई-साहित्य, ऑनलाईन शिक्षणाच्या बाजारपेठेने संधीचा फायदा घेऊन पाळे-मुळे घट्ट केली आहेत. शाळा आणि वर्गातील शिक्षण कधी सुरूच होणार नाही अशा आविर्भावात सुरू असलेल्या ऑनलाइन शिक्षणाच्या आग्रहामागे झपाट्याने विस्तारणाऱ्या या क्षेत्रातील बाजारपेठेचाही मोठा वाटा आहे. बाजारपेठेतील संधींचे विश्लेषण करणाऱ्या खासगी संस्थांच्या अहवालानुसार भारतातील ऑनलाइन शिक्षणाच्या बाजारपेठेतील उलाढाल ही २०२४ पर्यंत १,४३३ कोटी अमेरिकन डॉलरच्या घरात असेल.

उच्चशिक्षणासाठी प्रोत्साहन हवे

शालेय शिक्षणात ऑनलाइन शिक्षणाच्या पर्यायासाठी अनेक मर्यादा आहेत. मात्र उच्चशिक्षणाबाबतची परिस्थिती याउलट आहे. उच्चशिक्षणातही ऑनलाइन अभ्यासक्रमाचा वापर करण्यासाठी आवश्यक सुविधा, प्रसार या मर्यादा आहेतच. मात्र, सक्षम आणि बहुकौशल्ये आत्मसात केलेल्या मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्याची क्षमताही या पर्यायात आहे. उच्चशिक्षणाच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या विद्यार्थ्याला स्वयंअध्ययनाची सवय असणे अपेक्षित असते. त्यामुळे हे ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांना उपयोगी ठरते. सध्या परदेशी विद्यार्थ्यांचा आटणारा ओघ लक्षात घेऊन जगातील सर्वोत्तम विद्यापीठांनीही ऑनलाइन शिक्षणाचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. विद्यार्थ्यांची गरज, तो देऊ शकत असलेला वेळ लक्षात घेऊन त्यांच्यासाठी अभ्यासक्रम आखण्यात येतो. प्रत्येक विद्यार्थ्यानुसार त्यात बदल असतात. कोणत्याही वेळी, परिस्थितीत विद्यार्थ्याला शिकण्याची लवचिकता या विद्यापीठांचे ऑनलाईन अभ्यासक्रम देतात. भारतीय विद्यापीठे मात्र याबाबत अद्यापही जागी झालेली नाहीत. सध्या ऑनलाईन वर्गांचा आग्रह हा महाविद्यालयीन स्तरावरही प्रत्यक्ष वर्गाऐवजी एखादी मोफत प्रणाली वापरून कॅमेरासमोर उभे राहून शिकवणे याच धर्तीवर सुरू आहे. अगदी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे वर्गही याला अपवाद नाहीत. जगातील सर्वोत्तम विद्यापीठातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याची, एकाच वेळी वेगवेगळ्या विद्यापीठातील अभ्यासक्रम करण्याची मुभा यातून मिळते. मात्र त्यासाठी मूल्यांकन प्रणालीपासून अनेक गोष्टींत भारतीय विद्यापीठांनी बदल करणे गरजेचे आहे. सध्या उपलब्ध असलेल्या पर्यायांचा दर्जाही सुधारावा लागेल. केंद्राच्या स्वयम प्रणालीत उपलब्ध असलेल्या पाठांच्या दर्जाबाबतही अनेक स्तरावरून शंका उपस्थित करण्यात येतात. येत्या काळात मिश्र शिक्षण पद्धती अवलंबण्याला पर्याय राहणार नाही. त्यासाठी बदलांचा वेळीच अदमास घेऊन बाजारपेठेच्या दृष्टीने आणि विद्यार्थीहितासाठीही भारतीय विद्यापीठांनी जागे होणे आवश्यक आहे.