पूजा केळकर

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध वकील व लेखक जे. साई दीपक यांची मुलाखत ऐकली. त्यात फार महत्वाचा, सुंदर आणि सहजशक्य असा मुद्दा त्यांनी मांडला. आपली संस्कृती, हिंदुत्व यांचं बर्डन घेऊ नका किंवा समाजाला सांगायला जाऊ नका. व्यक्तिगत पातळीवर आपला धर्म, आपलं सत्व जपा. असं प्रत्येकाने केलं तर संपूर्ण हिंदू समाज सशक्त व समर्थ होईल… आणि हे सगळं आठवायचं कारण म्हणजे नुकताच झालेला गोपाळकाला!

Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांची अवस्था अश्वत्थाम्यासारखी झाली आहे का?
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Hungry Ghost festival
भारतातील पितृपक्षासारखी संस्कृती जगात इतर ठिकाणी कुठे सापडते?
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
india s economy slowing down
अग्रलेख : मध्यमवर्ग मेला तरी…
Loksatta editorial about investment decline in Maharashtra
अग्रलेख: महाराष्ट्र मंदावू लागला…
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?

आपल्या सण व उत्सवांच्या निमित्ताने जो धांगडधिंगा चालतो त्यापलीकडे जाऊन मला यंदाच्या गोपाळकाल्यावेळी काहीतरी जाणवलं.

माझं माहेर डोंबिवली पूर्व येथील अंबिका पॅलेसमधलं. त्याच वास्तूत म्हणजेच आधीच्या ‘मराठे चाळीत’ माझे बाबा लहानाचे मोठे झाले. बाबांना फोटोग्राफीची प्रचंड आवड. आमच्या अंबिका पॅलेसमध्ये सगळे सण साजरे केले जातात. राष्ट्रीय आणि धार्मिक असे दोन्हीही.

मी कॉलेजमध्ये असेपर्यंत अंबिका पॅलेसमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सात दिवस अगदी जल्लोषात साजरा होत असे.
साधारण २०१० च्या आसपास चित्र बदलायला सुरुवात झाली. गणपतीतले हक्काचे कार्यकर्ते घरातले ‘कर्ते’ झाले. गणपतीची आबाळ नको, व्यक्तिगत कुणाचे नुकसान नको आणि त्यावरून सोसायटीत कटुता नको म्हणून कदाचित गणपती दीड दिवसांचा झाला. गणपतीतले कार्यक्रम बंद झाले. सत्यनारायण पूजाही थांबली.

पण दोनेक वर्षांत तोडगा सापडून २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पूजा सुरु झाली. ज्येष्ठ नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता गच्चीवर होणारी पूजा, सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धा पाऊस नसल्याने अंगणात व्हायला लागल्या. या कार्यक्रमांमध्ये दोन दिवस सगळे मनापासून सहभागी होतात, आनंद घेतात. माहेरवाशिणी वगळल्या जात नाहीत. संक्रांतीचे हळदी कुंकूसुद्धा होते.

तर आमच्या बिल्डिंगचा जन्म १९८५ चा…

साधारण तेव्हापासून कालपर्यंत अव्याहतपणे दहीहंडीचा उत्सव चालू आहे. कोविड किंवा एखाद दुसरा अपवाद वगळता…

आता तुम्ही म्हणाल त्यात काय एवढं????

तर अतिशय साधेपणाने साजरी होणारी दहीहंडी आणि नंतर मिळणारा काल्याचा प्रसाद माझ्या खूप जवळचा आहे. बिल्डिंगमधले बालगोपाल पूर्ण बिल्डिंग फिरून, “दही द्या, दूध द्या, गोविंदा रे गोपाळा” असं म्हणतं दही दूध गोळा करतात. कुणावर जबरदस्ती नाही. पैसे दिले तर ठीक. नाही दिले तरीही ठीक. कुणीतरी काकू, कुणीतरी वहिनी काल्याचा प्रसाद करते.

प्रसादाचं नियोजन होईपर्यंत साधारणपणे एक मजला उंचीच्या दोन हंडी बांधून, पूजा करून, माफक गाणी वाजवून आणि पाणी उडवून फोडल्या जातात. नंतर मुलं काहीतरी खाऊ आणतात आणि खातात. प्रसाद वाटप होते. तीन तासांत अंगण परत पूर्वीसारखं होतं. गाड्या नीट लावल्या जातात. हे सगळं बिल्डिंगमधले दादा करतात. वॉचमन, सुरक्षा कर्मचारी आणि कचरा वेचक दादा-वहिनींना आवर्जून प्रसाद दिला जातो.

पावसाळ्यात शेवाळे साचून अपघात होणार नाही याची दक्षता घेतली जातच असते. पण गोपाळकाल्यावेळी छोटी मुलं खेळायला यायच्या आधी मोठ्या मुलांनी स्वतःहून अंगण खराट्याने घासून घेतलं. अशी जबाबदारीची जाणीव नकळतच आपल्याकडे रुजवता येते.

अगदी सात दिवस गच्चीवर, सोसायटी ऑफिसमध्ये गणपती असायचा तेव्हा कधीच ना देवाच्या ना सोसायटीच्या प्रतिमेला धक्का पोहोचला. याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि अन्वयची आई म्हणून बिनदिक्कत मी त्याला ह्याच भरवश्यावर पाठवू शकते.

मोठमोठ्या दहीहंडीपेक्षा हे असे छोटे छोटे साजरे होणारे आणि स्वरूप कमालीचं बदललेले आजच्या पद्धतीचे नसणारे सण, पुढच्या पिढीत आपलं असं जे काही असतं ते रुजवत असतात.

काल पहिल्यांदाच अन्वय अंबिका पॅलेसच्या दहीहंडीत सहभागी झाला. खाली काही फोटो जोडत आहे.
वर म्हटल्याप्रमाणे बाबांची फोटोग्राफीची आवड अशी कामास आली. १९९०-९१ व २०२४ सालच्या फोटोंचं हे कोलज आहे. एका फोटोत मी मनोज दादाच्या हातात असलेल्या पातेल्यात काहीतरी टाकतेय. तर अन्वय मननच्या म्हणजेच मनोज दादाच्या मुलाच्या हातात असलेल्या पातेल्यात काहीतरी देतोय.

एका फोटो कोलाजमध्ये मनोज दादा राकेश दादा, समीर दादा, सलील दादा, अमित दादा, संकेत दादा आहेत तर त्यांची पुढची पिढी अनुक्रमे मनन, निहार, यश, ओजस, पार्थ व इतर बच्चे कपंनी दुसऱ्या फोटोत आहेत. आईने काल्यासाठी केलेली तयारी व प्रसादाचा फोटोही आहे. आणि मुख्य म्हणजे बाबांसोबत फोटो काढलाय त्यात बाबांनी तेव्हा काढलेला फोटो अन्वयच्या हातात आहे.

बॅक टू जे साई दीपक…

सुस्कारे सोडून, नावं ठेवून, दोष दाखवून, टोमणे मारून गोष्टी बदलत नसतात. पुढची पिढी घडत नसते, ना संस्कृतीचे जतन होत असते. परिवर्तनाची अपरिहार्यता स्वीकारली की गोष्टी सहज सोप्या होतात. ते करायची इच्छाशक्ती मात्र प्रामाणिक हवी.

अशा प्रामाणिक इच्छाशक्तीचा भाग मला आमच्या बिल्डिंगमुळे अनुभवता आला. मला सार्थ अभिमान आहे आणि नेहमी राहील की मी अंबिका पॅलेस ची माहेरवाशीण आहे!

Story img Loader