– डॉ. अनुपम दुर्गादास टाकळकर
करोनाचा विषाणू भारतात दाखल होऊन आता अडीच महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. जनता कर्फ्यू, देशात आणि राज्यात लॉकडाउन होऊन देखील दररोज सुमारे आठशे ते नऊशे नवीन केसेस, या प्रमाणात देशात करोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री करोनाविरुध्द लढण्यासाठी योग्य ती कठोर पावले उचलताना आपल्याला दिसत आहेत. मात्र, वैद्यकीय व्यावसायिकांकडे दुर्लक्ष होत आहे. कारण, देशात करोनाच्या प्रसाराला सुरुवात होऊन अडीच महिने झाले तरीही ‘एन ९५’ मास्क आणि ‘पीपीई’ कीट या दोन्ही अत्यावश्यक उपकरणांचा प्रचंड तुटवडा आहे.
जे डॉक्टर्स करोनाबाधित रुग्ण सोडून सर्वसामान्य रुग्णांना तपासत आहेत, अशा डॉक्टर मंडळींना एन ९५ मास्क आणि पीपीई किट यांची आवश्यकता नाही, असा सर्वसामान्यांना प्रश्न पडणे साहजिक आहे. कारण, सरकारचे देखील हेच म्हणणे आहे. हे विधान शंभर टक्के खरं असलं तरी आजच्या घडीला कुठली व्यक्ती करोनाबाधित आहे किंवा नाही हे विशिष्ट चाचणी केल्याशिवाय ठामपणे सांगता येणे शक्य नाही तसेच प्रत्येक व्यक्तीची ही महागडी चाचणी करुन घेणं व्यवहार्य देखील नाही. हा मुद्दा मी थोडक्यात विषद करून सांगेन. करोना या विषाणूचा ‘इंक्युबेशन पिरियड’ हा साधारणतः पाच ते सहा दिवस असतो (काही रुग्णांमध्ये तो चौदा दिवसापर्यंत देखील असू शकतो) याचा अर्थ एखाद्या व्यक्तीला करोना विषाणुची लागण झाली तर त्याला पहिले पाच ते सहा दिवस लक्षणे आढळत नाही. त्याला ना खोकला येतो ना, ताप किंवा आपण आजारी आहोत हे त्याला माहिती देखील नसतं. त्यामुळे आपण ठणठणीत बरे असल्याचे त्याला वाटते. प्रतिकारशक्तीनुसार अशा रुग्णांमध्ये करोनाची लक्षण काहीशी उशीरानं दिसू शकतात. काही रुग्णांना तर विशेष फरक देखील जाणवत नाही अशा रुग्णांना असिम्टोमॅटिक कॅरीयर असे म्हणतात. काही रुग्णांना कोरडा खोकला, ताप, अशक्तपणा वाटू शकतो. तर काही रुग्णांमध्ये न्यूमोनियासारखी जास्त तीव्र लक्षणे दिसू शकतात.
अशा प्रकारे हा करोनाची लक्षणं असणारा रुग्ण एखाद्या खासगी रुग्णालयात आला तर सरकारच्या म्हणण्यानुसार त्याला संबंधित रुग्णालयातील डॉक्टर तत्काळ सरकारने ठरवून दिलेल्या कोव्हीड रुग्णालयात पाठवून देईल. आता समजा करोनाची लक्षणे दिसणारे हे रुग्ण तपासायचेच नसतील तर तुम्हाला एन ९५ मास्क आणि पीपीई किटची काहीच आवश्यकता नाही. शास्त्रीयदृष्ट्या ही गोष्ट बुद्धीला पटणारी नाही. दरम्यान, ज्या व्यक्तींना करोनाची बाधा झाली आहे. मात्र, करोनाची लक्षणे त्यांच्यामध्ये आढळलेली नाहीत अशा ‘असिम्टोमॅटिक कॅरियर’ व्यक्तींपासून करोना संक्रमण होण्याचा धोका हा त्यामानाने फारच कमी असतो, याविषयी सध्या अभ्यास सुरू आहे.
परंतू, एका विशेष आणि अत्यंत महत्वाच्या गोष्टीकडे मी तुमचे लक्ष वेधू इच्छितो ते म्हणजे ‘प्री सिम्प्टोमॅटीक ट्रान्समिशन’ म्हणजे करोनाची लागण आज झाली, त्यानंतर पाचव्या-सहाव्या दिवसानंतर त्या व्यक्तीमध्ये याची लक्षणे दिसतील. परंतू तिसर्या, चौथ्या किंवा पाचव्या दिवशी म्हणजे लक्षण दिसण्याच्या दोन ते तीन दिवस आधी या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांना तो बाधित करु शकतो. ही केवळ कपोकल्पित वर्तवलेली शक्यता नसून, ‘प्री सिम्प्टोमॅटिक ट्रान्समिशन’ विषयी संशोधन साहित्यही प्रकाशित झालेले आहे. याविषयी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) नुकताच एक सिच्युवेशन रिपोर्ट प्रसिद्ध केलेला आहे. ‘डब्ल्यूएचओचा कोव्हिड सिच्युवेशन रिपोर्ट ७३’ असे याचे नाव आहे. या सिच्युवेशन रिपोर्टमध्ये या ‘प्री सिम्प्टोमॅटीक ट्रान्समिशन’ विषयी माहिती नमूद केलेली आहे तसेच याबाबत वेगवेगळे संदर्भ देखील दिलेले आहेत.
तर सांगायचा मुद्दा एवढाच की, हा करोनाग्रस्त रुग्ण ज्याला स्वतःला माहित नाही की मला एक दोन दिवसानंतर ताप येणार आहे, कोरडा खोकला येणार आहे. करोनाची ही लक्षणं त्याला कदाचित येत्या दोन ते तीन दिवसात दिसणार आहेत. अशी व्यक्ती दवाखान्यामध्ये आला तर डॉक्टरांना किंवा नर्सला कसे कळणार? कारण या व्यक्तीला स्वतःलाच याची माहित नाही. त्यामुळे हा ‘प्री सिम्प्टोमॅटीक ट्रान्समिशन’चा मुद्दा महत्त्वाचा आहे. याबाबत शासनाने पुनर्विचार करणे गरजेचे आहे.
आणखी एका उदाहरणाद्वारे नमूद करावेसे वाटते की, एखाद्या व्यक्तीला एचआयव्हीची लागण झाल्यानंतर त्याला एड्सची लक्षणं दिसण्यामध्ये साधारणतः दहा वर्षे निघून जातात. याचा अर्थ असा नाही की, एड्सचे निदान झाल्यानंतरच तुम्ही त्या व्यक्तीचे रक्त तपासणीसाठी घेताना काळजी घ्यायची इतरवेळी नाही. कारण हे अत्यंत घातक ठरू शकते. रक्त तपासणीसाठी घेताना कुठल्याही व्यक्तीला ‘एचआयव्ही’, ‘हेपॅटायटिस बी’ किंवा इतर मोठा आजार असेल हे गृहीत धरूनच सुरक्षा उपकरणं वापरावी लागतात. त्यामुळे डॉक्टरांसाठी ज्या मुलभूत गरजेच्या गोष्टी आहेत, त्यांची पूर्तता करणे हे शासनाचे कर्तव्य आहे.
त्यामुळे ‘एन ९५’ मास्क आणि ‘पीपीई’ किट सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना सरकारने मोफत नाही पण वाजवी दरात तरी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. आजच्या घडीला किरकोळ औषध विक्रेते, स्टॉकिस्ट किंवा डिस्ट्रीब्युटर्स यांच्याकडे देखील पीपीई किट उपलब्ध नाहीत तसेच त्यांच्याकडील एफएफपी २ मास्कही संपलेले आहेत. डॉक्टरांना या गोष्टी मिळवण्यासाठी खूपच अडचणी येत आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयातील डॉक्टरांसाठी असलेला ‘प्री सिम्प्टोमॅटीक ट्रान्समिशन’चा धोका शासनाने वेळीच ओळखावा.