सॅबी परेरा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या आजींकडून खऱ्या-खोट्या, माणसांच्या, भुतांखेतांच्या, देवा-धर्माच्या गोष्टी ऐकत हजारो पिढ्या वाढल्या. कित्येकदा तर, आजी त्याच त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा सांगायची. पण त्या गोष्टीतली खुमारी कधी कमी व्हायची नाही. त्यातला रस कधी आटायचा नाही. ठरलेल्या जागी हुकमी हशा यायचा. ठरलेल्या जागी डोळ्यात ड्रीम सिक्वेन्स सुरु व्हायचा. ठरलेल्या जागी डोळे पाणावायचे. कारण आजीच्या कथनांत, कपोलकल्पित कथेतही सत्याचा आभास निर्माण करण्याची कुवत (conviction) असायची. नातवंडांच्या भावविश्वात शिरून त्यांच्या काळजाला हात घालायची ताकद असायची. म्हणूनच, बालपणी आजीकडून ऐकलेल्या गोष्टी वजा केल्या तर बालपण अगदी रुक्ष वाटू लागते.

तुमच्या आमच्यासारखा सामान्य माणूस, “पोट लागले पाठीशी, हिंडविते देशोदेशी” या अवस्थेस पोहोचला की, तो आजीच्या मांडीवर डोकं टेकवून गोष्टी ऐकायच्या सुखापासून वंचित होतो. पण इतिहासातील राजे-महाराजे (विशेषतः मुघल राज्यकर्ते) मात्र आपल्या प्रौढपणी देखील, रात्र रात्र जागत कथा सांगणाऱ्या व्यावसायिक ‘दास्तांगो’ कडून गोष्टी ऐकून हे श्रवणसुख उपभोगीत राहायचे. यात प्रामुख्याने देवा-धर्माच्या किंवा राजाच्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या रंजक, अतिरंजित पण प्रेरणादायी कथा असायच्या. या कथाकथनाला नाव होतं “दास्तानगोई”. हा मूळचा उर्दूतला प्रकार. मध्यंतरी जवळपास लोप पावलेला हा कलाप्रकार मागील पंधरा-वीस वर्षात काही हिंदी-उर्दू रंगकर्मीनी पुनरुज्जीवीत केला आहे. अक्षय शिंपी आणि धनश्री खंडकर या नाट्यवेड्या कलाकारांनी ‘दास्तान-ए-बडी बांका!’ नावाने पहिल्यांदा “दास्तानगोई” हा कलाप्रकार मराठीत आणलेला आहे.

आपल्या मुंबई नगरीची दास्तान हे दोघे दास्तांगो, मंचावरून सादर करतात. आपल्याशी गप्पा मारत असल्यासारख्या सहजपणे मुंबई, मुंबईतील ठिकाणं, घटना, माणसं याबाबत बोलत राहतात. गोष्टींतून गोष्ट निघते. इतिहास येतो. भूगोल येतो. कथा येतात, किस्से येतात, कविता येतात. गाणी येतात. आणि हे सगळे सुटे सुटे मणी मुंबई नावाच्या धाग्याने एकमेकांशी सुविहितपणे जोडलेले असतात. प्रयोग संपल्यावर शांतपणे आपण हा मुंबई नावाचा धागा जर उसवून पाहिला तर त्यातील माणूसपणाचे तंतू स्वच्छपणे दिसू लागतात.

जवळजवळ दोन तास अक्षय आणि धनश्री स्टेजवरील एका गादीवर बसून त्या मर्यादित अवकाशात आपल्या कायिक आणि वाचिक अभिनयाने विविध व्यक्तिरेखा, विविध भावभावना आपल्या समोर जिवंत करून आपल्याला मंत्रमुग्ध करतात. ते कधी निवेदक असतात तर कधी त्यांच्या कथेतील एखादं पात्र असतात. जे सांगितलं जातंय त्यातलं काही आपण आधीच ऐकलं, वाचलं असलं तरीही आपण या प्रयोगाशी खिळून राहतो. यातला विनोद आपल्याला हसवतो, कविता आणि गाणी आपल्या तालावर डोलायला लावतात, सादरीकरण दाद घेते, सामाजिक, राजकीय विधानं टाळ्या वसूल करतात आणि प्रसंगी अंतर्मुखही करतात.

अक्षय-धनश्रीच्या बोलण्यात आणि एकंदरीतच या कलाप्रकारातच अनौपचारिकपणा असला तरी त्यात कुठेही पसरटपणा नाहीये. एक अत्यंत गोळीबंद लिखित संहिता आहे. त्यामुळे दोन व्यक्तींच्या, दोन तासाच्या प्रयोगात कुणीही एक शब्दही अडखळत नाही, एका शब्दाचाही ओव्हरलॅप होत नाही, एकही पॉझ चुकत नाही. एका क्षणाचाही अपव्यय होत नाही. हे खरोखर कौतुकास्पद आहे. संपूर्ण संहिता त्यांनी केवळ पाठ केलेली नाहीये तर ती त्यांच्या रंध्रारंध्रात मुरलेली आहे.

थोडक्यात काय, तर “दास्तान-ए-बड़ी बांका” हा एक समृद्ध करणारा अनुभव आहे. जिथे जमेल तिथे जाऊन पहा किंवा निवडक मित्रमंडळींसाठी आपल्या घरीच आयोजित करा.

sabypereira@gmail.com