श्रुति गणपत्ये
या आठवड्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या पिढीचं नेतृत्व करणारा एकजण आपल्यातून निघून गेला. दिलीप कुमार यांना वाहिलेल्या अनेक आदरांजलीमध्ये ते पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे “हिरो” होते हे वारंवार नमूद करण्यात आलं आहे. कारण त्यांनी आपल्या चित्रपटांमधून भारताच्या विकासाचं, इथल्या गोरगरिब जनतेच्या इच्छा-आकांक्षांचं चित्र मांडलं. १९५० ते १९६० हा काळ भारतासाठी खूप आदर्शवादी होता. देशाला बळ देण्यासाठी त्यावेळची पिढी प्रेरित होती, स्वातंत्र्याचा एक आनंद, जोश होता. स्वातंत्र्य लढ्यातही त्यातील अनेकांचा सहभाग होता. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्या पिढीची धडपड होती आणि काही मूल्यं त्यांनी जोपासली होती. देशभक्तीच्या विचारांनी सर्वजण भारावून गेले होते आणि हिंदी चित्रपटसृष्टीही त्याला आपवाद नव्हती. अर्थात तो विचार सध्याच्या देशभक्तीपेक्षा खूपच वेगळा होता कारण तो सर्वसमावेशक होता. याच काळात दिलीप कुमार यांचे फूटपाथ (१९५३), नया दौर (१९५७), पैगाम (१९५९), गंगा जमुना (१९६१) हे सुरुवातीचे चित्रपट आले. त्यातून तत्कालीन समाजाचं वास्तववादी चित्रण आणि परिस्थिती बदलण्यासाठी संघर्षाच्या माध्यमातून एक आशा तरुण पिढीला देण्याचं काम अशा अनेक चित्रपटांनी केलं. दिलीप कुमार यांची खासियत म्हणजे केवळ चित्रपटांच्या माध्यमातून नव्हे तर देशाच्या एकात्मतेसाठी शॉर्ट फिल्म्स बनवणं, लष्करासाठी निधी उभारणं अशीही कामं केली.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्यांचे मोजकेच नवे-जुने चित्रपट आहेत. त्यातले अॅमेझॉन प्राइमवरचे “नया दौर” आणि “पैगाम” हे दोन चित्रपट त्या स्वतंत्र भारताच्या आनंदी काळातील असल्याने मला महत्त्वाचे वाटतात. नुकत्याच स्वातंत्र्य मिळालेल्या भारतातल्या गोर-गरिबांची परिस्थिती आणि त्यांच्या रोजी-रोटी-मकान या माफक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी चाललेला संघर्ष त्यातून उभा करतात.
“नया दौर” हा भारतातल्या कोणत्याही खेड्याची कथा सांगून जातो. नेहरूंच्या समाजवादावर प्रेरित असा हा चित्रपट आहे. खरंतर आजही अशा गोष्टी पहायला मिळतील. एका गावामध्ये टांगा चालवणारा शंकर (दिलीप कुमार) आणि त्याच्या संघर्षाभोवती ही कथा फिरते. माणूस विरुद्ध मशीन हा कायम वादग्रस्त राहिलेला विषय या चित्रपटात येतो. लाकडाच्या फळ्या बनवणं आणि टांगा चालवणं हा या गावातल्या लोकांचा प्रमुख व्यवसाय असतो. पण लाकडाच्या कारखान्याचा ताबा मालकाच्या मुलाकडे येतो आणि तो तिथे मशीन आणतो. अर्थातच अनेकांच्या नोकऱ्या जातात. त्याचवेळी मालकाचा मुलगा एक बस खरेदी करतो आणि टांगेवालेही बेकार होतात. पण या परिस्थितीतून मार्ग काढण्याची हिंमत शंकर दाखवतो. तो गावामध्ये रस्ता बनवून टांगेवाल्यांसाठी शॉर्टकट बनवतो जेणेकरून बसपेक्षा ते आधी पोहचू शकतील. गावातले लोक या संघर्षासाठी तयार होत नाहीत तर तो एकटा त्यात उतरतो. पण त्याचा निर्धार पाहून सगळं गावंच त्याच्या पाठीशी उभं राहतं. भांडवलशाहीविरुद्ध एका अर्धशिक्षित माणसाने लढा देणं, त्यासाठी गावाला एकत्र आणणं, संघर्ष करून आपले हक्क मिळवणं अशा कितीतरी गोष्टी आजही प्रभावित करतात. यातील गाणी “ये देश है वीर जवानों का…” हे तरुणांसाठीच लिहिलं होतं. चित्रपट केवळ पुरुष प्रधान न ठेवता त्यात स्त्रीवादी विचारही येतो. यातली नायिका रजनी (वैजयंती माला) ही उघडपणे “उडे जब जब जुल्फे तेरी…” गाण्यामधून आपल्याला आवडणाऱ्या पुरुषाबद्दल सर्व गावासमोर मत व्यक्त करू शकते हे तर आजही क्रांतीकारक आहे. शंकर हुंडा मागितल्याने आपल्या बहिणीचं लग्नं स्वतः मोडून टाकण्याची हिंमत दाखवतो यातून स्त्रियांचाही सहभाग नव्या भारतामध्ये किती महत्त्वाचा असेल, हे दाखवण्यात आलं होतं.
“पैगाम”ची कथा शहरी भागातली, सूत गिरणीमध्ये काम करणाऱ्या कामगारांची आहे. रतन लाल (दिलीप कुमार) हा नुकताच इंजिनीअरिंग शिकून आलेला असतो. एकदा गिरणीतलं मशीन बिघडतं त्यासाठी परदेशी मशीन नवीन आणावं लागेल, असं सांगण्यात येतं. पण दिलीप कुमार ते मशीन बनवून दाखवतो आणि त्याला तिथे नोकरी मिळते. भारताची शिकलेली पिढी ही परदेशी मदतीवर अवलंबून नाही, ते स्वतःच्या बुद्धीचा वापर करून देश चालवू शकतात हा केवढातरी मोठा आत्मविश्वास त्या चित्रपटातून व्यक्त केला आहे. पुढे बोनस न देण्यावरून गिरणी कामगार संप करतात, त्यांचं नेतृत्व रतन लाल करतो आणि त्यांचा हक्क मिळवून देतो. त्यासाठी त्याला स्वतःच्या भावाची नाराजी ओढावून घ्यावी लागते, त्याच्यावर गिरणी जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतो. पण या सगळ्याला मोठ्या हिंमतीने तोंड देत तो शेवटी जिंकतोच. मूळात आपल्या हक्कांची जाणीव, श्रीमंत आणि सत्ता बाजूने असलेल्या मालकाशी संपाच्या माध्यमातून दिलेला लढा ही गोरगरिबांमध्ये एक प्रकारची जनजागृतीच होती. विविध पातळ्यांवर गरिबांचं होणारं शोषण आणि त्यांना चित्रपटाच्या माध्यमातून दिलेली आशा यामुळे समाजाने प्रभावित होणं सहाजिकच होतं.
चित्रपट हे माध्यमचं वेगळ्या स्वप्नवत दुनियेमध्ये घेऊन जातं. पण समाजातल्या एवढ्या खालच्या थरात असलेल्या लोकांच्या प्रश्नांना ग्लॅमरस बॉलिवूडमध्ये जागा मिळणं आणि दिलीप कुमार यांच्यासारख्या अभिनेत्याने त्यात काम करणं ही मोठी गोष्ट होती. आताही बॉलिवूड हे थोडाफार अपवाद वगळता चकचकाटीनेच भरलेलं आहे. सामाजिक प्रश्नांची दखल खूप कमी चित्रपटांमधून घेतली जाते. आपल्या ९८ वर्षांच्या प्रचंड मोठ्या आयुष्यामध्ये केवळ ५७ सिनेमे करणाऱ्या दिलीप कुमार यांनी आपल्या चित्रपटांमधून एक मोठा वारसा प्रत्येक येणाऱ्या नव्या पिढीसाठी ठेवला आहे. त्यांचे चित्रपट हे भारताच्या जडणघडणीचे साक्षीदार आहेत.
shruti.sg@gmail.com