मुंबईकर किड्या मुंग्यांसारखे जगतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. मुंबईमधील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या ब्रिजपैकी एक ब्रिज म्हणजे सीएसएमटी स्टेशनवरचा दादार एण्डचा ब्रिज. या ब्रिजचा स्टेशनबाहेरचा भाग आज पडला आणि काही सामान्य मुंबईकरांना प्राण गमावावे लागले. मृतांचा आकडा किती, जखमी किती या बातम्या येण्याआधीच ब्रिज बीएमसी अख्त्यारित होता की रेल्वेच्या यावरुन पालिका अधिकारी, नगरसेवक यांच्याकडून स्पष्टीकरण येऊ लागले. मुळात हा जणू पॅटर्नच झाला आहे. दुर्घटना होणार… आरोप-प्रत्यारोप होणार… काहीजण जीवानीशी जाणार… काही जखमी होणार… महापालिका आणि राज्य सरकार मदत जाहीर करणार… मग त्या तुटलेल्या वास्तूची डागडुजी होणार… मग मुंबईकर सगळं विसरणार आणि ‘मुंबई स्पिरीट’ या गोंडस नावाखाली पुन्हा दैनंदिन काम सुरु करणार… वर्षभराने अरे हा याच दिवशी अमूक अमूक झालं होतं अशी आठवण काढून मेणबत्त्या लावणार आणि कामाला जाणार… मग त्या दुर्घटनेतून सावरत नाही तोच वर्ष दीड वर्षात आणखीन एक दुर्घटना घडणार… आणि मग परत तेच ते अन् तेच ते…

सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरुन टाइम्स ऑफ इंडिया इमारत तसेच जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सकडे उतरणारा हा अपघातग्रस्त ब्रिज हा सर्वाधिक वापरला जाणाऱ्या ब्रिजपैकी एक. म्हणजे अगदी क्रॉफर्ड मार्केटमधील व्यापाऱ्यांपासून ते अंजूमन इस्लाम शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत आणि मुंबई पोलिसांपासून ते झेवियर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत अनेकांसाठी हा ब्रिज म्हणजे पायाखालचा रस्ता. मुळात हा ब्रिज कोणाच्या अंतर्गत होता आणि त्याची डागडुजी का केली जात नाही हे प्रश्न या ब्रिज वरुन जाणाऱ्या प्रत्येकाला कधी ना कधी पडला असणार. याचे मुख्य कारण म्हणजे या ब्रिज वरुन चालताना चक्क ब्रिज हलत असल्याचे जाणवायचे. पण खालील रस्त्यावर कंबरेएवढ्या उंचीचे डिव्हाडर्स लावलेले असल्याने ब्रिजशिवाय सामान्यांना काही पर्याय नसायचा. एकाच वेळी दोन ट्रेन आल्यावर या ब्रिजवर हमखास गर्दी होते आणि चालताना ब्रिज हलत असल्याची जाणीवही. पहिल्या ट्रेनपासून शेवटच्या ट्रेनपर्यंत कायमच वापरात असणाऱ्या या वर्दळीच्या ब्रिजवर अनेकजण पावसाळ्यात आवर्जून फोटो काढायला थांबायचे.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून

दुर्घटनेनंतर राजकीय नेत्यांनी आरोप प्रत्यारोप सुरु केले आहेत. पण हाच अपघात सकाळच्या सुमारास किंवा दोन तास आधी झाला असता तर नक्कीच या अपघाताची तिव्रता अनेक पटींनी वाढली असती. सकाळच्या सुमारास शाळेत जाणारी मुले, ऑफिसला जाणारे कर्मचारी, ब्रिजखाली मासे आणणाऱ्या गाड्या रिकामे करणारे हमाल, ब्रिजखालील रस्त्यावरील वाहतूक कोंडी या सर्वांचा एकंदरित विचार केला तर हा अपघात एल्फिस्टन अपघाताहूनही मोठा ठरला असता. मात्र पिक अवर्सनंतर म्हणजेच साडेसात नंतर हा अपघात झाल्याने अनेकांचे प्राण वाचले असं म्हणता येईल.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सुदैवाने या ब्रिजचा पुढचा भाग म्हणजेच प्लॅटफॉर्म क्रमांक एक पासून थेट सहापर्यंत जाणाऱ्या भागात हा अपघात नाही झाला. लोकल प्रवाशांकडून दादर एण्डचा ब्रिज म्हणून ज्या ब्रिजचा उल्लेख होतो त्याच ब्रिजचा भाग असणारा रेल्वेचा ब्रिजही अती धोकायदायच म्हणावा लागेल. या ब्रिजवर रेल्वेची वाट पाहताना उभं राहिलं तरी हदरे जाणवतात. मध्यंतरी या ब्रिजला परराज्यात जाणाऱ्या प्लॅटफॉर्मवरुन येणाऱ्या ब्रिजची जोड देण्यात आल्याने ब्रिजवरील वर्दळ आणखीन वाढली आहे. आता अपघातानंतर तातडीने हा मागच्या बाजूचा ब्रिज बंद करुन त्याची डागडुजी वगैरे सोपस्कार पूर्ण केले जातील पण त्यासाठी एल्फिस्टनप्रमाणेच काही जणांना प्राणाची किंमत मोजावी लागली हे विसरुन चालणार नाही. मुंबईकर तळहातावर जीव ठेऊन पोटाची खळगी भरण्यासाठी घराबाहेर पडतात हेच खरं.