– धवल कुलकर्णी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळख असलेल्या शिवसेनेची काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्तास्थापनेसाठी बोलणी सुरू असताना, या काहीशा विळ्या-भोपळ्याच्या नातेसंबंधाचा पाठिंबा मिळत आहे तो मुस्लिम समाजाच्या एका मोठ्या गटाकडून. शिवसेना हा जरी एक हिंदुत्ववादी पक्ष असला तरीसुद्धा, त्याचे हिंदुत्व हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपच्या आंधळ्या मुस्लीम देशावर आधारित नाही. शिवसेना हा मुळात मराठी माणसांच्या कैवाराची भूमिका घेणारा, एक प्रादेशिक पक्ष आहे. शिवसेनेचा व मुस्लिम समाजाचा रस्त्यावरचा रक्तरंजित संघर्ष झालेला असला तरीसुद्धा आपला नंबर एकचा शत्रू असलेल्या भाजपला सत्तेतून लांब ठेवायला ही आघाडी व्हायला हवी असे या मुस्लिम नेत्यांना वाटते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्यसभेचे खासदार हुसेन दलवाई यांनी शिवसेना व काँग्रेस यांच्या आघाडीबाबतची भूमिका पक्षश्रेष्ठींकडे हिरीरीने मांडली आहे. “शिवसेना ही संघ परिवारातील संस्था नाही हे आपण लक्षात घ्यायला हवं. शिवसेनेने वेळोवेळी संघाच्या धोरणावर टीका पण केलेली आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे कधीकधी संघाची खिल्लीही उडवत. 1926 ला स्थापना झाल्यानंतर संघ परिवाराने राष्ट्रीयत्वाचा मुद्दा फक्त या देशाला जे लोक मातृभूमी आणि पुण्यभू मानतात यांच्यापुरताच मर्यादित ठेवला व सहजच मुस्लिम समाजाला या संकल्पनेतून वगळले. शिवसेनेचा मुस्लिम विरोध हा अशा तात्विक स्वरूपाचा नाही,” असे मूळचे समाजवादी विचारांचे असलेले दलवाई म्हणाले.
“शिवसेना सेक्युलर आहे असा माझा दावा नाही. वैचारिक दृष्ट्या शिवसेना आमच्या विरोधातच आहे. पण पण आमचा नंबर एकचा शत्रू भाजप आहे आणि त्याला सत्तेतून दूर ठेवावं अशी माझी एक प्रॅक्टिकल भूमिका आहे. शेवटी, शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे त्यामुळे त्याचा मूळ विचार हा मराठी माणसाच्या बाजूचा आहे. भारतीय जनता पक्षाचा मुकाबला करायला अशा सर्व प्रांतीय व प्रादेशिक शक्तींची मोठ बांधायला हवी. ही काँग्रेसची जबाबदारी आहे, कारण आजच्या घडीला देशासमोर सगळ्यात मोठं संकट आहे ते भाजपचं,” असं आग्रही मत त्यांनी मांडलं.
भाजपच्या गेल्या पाच वर्षाच्या राजवटीत महाराष्ट्राची प्रचंड पीछेहाट झाली असून शेतकरी अक्षरशः देशोधडीला लागला आहे. या व अशा अनेक मुद्द्यांवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ची आघाडी होऊ शकते, असे दलवाई म्हणतात.
मुस्लिम समाजाचे अनेक नेते काहीशा कौतुकाने नमूद करतात की आजही कोकण व पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक भागात तिथला मराठी मुसलमान समाज हा पूर्वापार शिवसेनेशी जोडला गेला आहे. विशेष करून कोकणामध्ये हिंदू मुसलमान यांच्यामध्ये एक सांस्कृतिक व भावनिक अनुबंध असल्याने तिथले मुसलमान सुद्धा शिवसेनेच्या कार्यात स्वतःला झोकून देऊ लागले. रामदास कदम व भास्कर जाधव यांच्यासारख्या शिवसेना नेत्यांचे बरेच मुस्लिम कार्यकर्तेही आहेत. त्याच वेळेला, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांचे सुद्धा बरेच हिंदू कार्यकर्ते होते. 1980 मध्ये अंतुले ज्या वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा श्रीवर्धन या त्यांच्या पारंपारिक मतदारसंघात त्यांच्या प्रचारासाठी स्वतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उतरले होते. 1995 ते 99 महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या युती सरकारच्या कालखंडामध्ये शिवसेनेचे साबिर शेख हे कामगार मंत्री होते हे लक्षणीय. त्याउलट, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने फक्त दोन मुसलमानांना उमेदवारी दिली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये एकही मुस्लिम प्रतिनिधी नव्हता हे विशेष. काँग्रेस मधून भाजपमध्ये जाऊ पाहणारे सिल्लोड चे आमदार अब्दुल सत्तार यांना शेवटी शिवसेनेत प्रवेश करून निवडून यावे लागले ही गोष्ट सुद्धा लक्षणीय आहे. आज महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 सदस्यांपैकी फक्त दहा जण मुस्लिम समाजाचे आहेत. ह्यात भाजपची पाटी कोरी आहे…
महाराष्ट्रातील ओबीसी चळवळ उभारण्या मध्ये मोठा वाटा असलेले ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन चे प्रमुख शब्बीर अहमद अन्सारी यांनासुद्धा शिवसेना ही मुस्लीम समाजासाठी भाजपपेक्षा lesser evil आहे असे वाटते. “खरेतर, कुठल्याही राजकीय पक्षांमध्ये आज नीती व धोरणांच्या आधारावर फरक अथवा भेद राहिलेला नाही. त्यांचे लक्ष एकच, ती म्हणजे सत्ता,” असे अन्सारी खेदाने नमूद करतात.
“मुस्लिम समाज हा भाजप कडे फक्त पक्ष म्हणून पाहत नाही, तर संघ परिवाराची राजकीय शक्ती म्हणून पाहतो. भाजपचे खरे पालक म्हणजे संघ परिवार. संघ परिवाराची मुस्लिम समाजाबाबत महत्त्वाची पॉलिसी उघड आहे. त्या तुलनेत शिवसेना म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ,” असे अन्सारी म्हणाले.