Ganesh Chaturthi 2024 रावण, लंकेचा असूर राजा होता, परंतु तो भगवान शिवाचा प्रखर भक्तदेखील होता. भगवान शिवाच्याच आशीर्वादाने रावणाने यश प्राप्त केले होते. रावण हा महत्त्वकांक्षी होता. आपल्या असूर साम्राज्याची- लंकेची कीर्ती कायम राहावी यासाठी तो सदैव प्रयत्न करीत असे. तो असूर असला तरी त्याची शिवभक्ती अफाट होती. भगवान शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी त्याने अनेक वर्षे तप केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकदा रावण शिवशंभूला प्रत्यक्ष भेटण्यासाठी कैलासावर हजर झाला, निमित्त लंकेचे रक्षण करणे हे होते. प्रत्यक्ष शंकरालाच आपल्या लंकेत घेवून जाण्यासाठी रावण आला होता. शिवशंभू हे भोळे सांब सदाशिव आहेत. ते आपल्या प्रत्येक भक्ताच्या हाकेनिशी धावत जात. त्यांच्या पदरी उच्च-नीच असा कुठलाही भाव नव्हता. म्हणूनच त्यांनी आपल्या असूर भक्तांनाही कधीही पोरके केले नाही. इथे तर रावण त्यांचा परम भक्त. भगवान शिवाला लंकेत घेवून जाण्यासाठी रावणाने संपूर्ण कैलासच आपल्या माथ्यावर घेतले होते. परंतु जेथे साक्षात उमामहेश्वर आहेत तो कैलास रावणाला घेवून जाणे तरी कसे शक्य होते म्हणा!

तरीही रावणाच्या हट्टापायी भगवान शिवाने आत्मलिंगाच्या स्वरूपात रावणाची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. परंतु यात अट एकच होती ती म्हणजे रावणाला हे लिंग पायी घेवून जावे लागणार होते. तसेच कुठल्याही परिस्थितीत हे लिंग कुठेही खाली ठेवण्यास मनाई होती. जर असे झाले तर लिंग त्याच ठिकाणी कायमस्वरूपी विराजमान होणार होते. रावणाने ही अट मान्य करून आत्मलिंग हातात घेवून लंकेकडे प्रस्थान केले.

अधिक वाचा: देवी पार्वतीची शिकवण… मुक्या प्राण्यांवर प्रेम करा !

शिवाचे आत्मलिंग रावणाच्या पराक्रमात भर घालणारे होते आणि जर तो हे लिंग लंकेत नेण्यात यशस्वी झाला तर त्याचा कधीही नाश होणार नाही, याची देवांना भीती होती. देवांनी मदतीसाठी गणेशाची प्रार्थना केली. गणपती बाप्पा हे विघ्नविनाशक आहेत. त्यांनी देवतांना आलेले हे विघ्न दूर करण्यासाठी एका लहान मुलाच्या रूपातील गुराख्याचे रूप धारण केले. गणपती बाप्पा रावणाच्या वाटेवरच आपली गुरे घेवून उभे राहिले. गणेशाने रावणाचे पोट पाण्याने भरले. त्यामुळे रावणाला लघुशंकेला जाणे भाग पडले. परंतु समस्या अशी होती की लघुशंकेला कसे जावे हेच त्याला कळेना. हातात आत्मलिंग घेवून जाणे शक्य नव्हते. आणि आता निसर्गाच्या हाकेला उत्तर देण्यासाठी रावण हतबल झाला होता. म्हणूनच वाटेवरील लहान मुलाच्या रुपात असलेल्या गजाननाला- गुराख्याच्या पोराला रावणाने मदत करण्यास सांगितले. रावणाने आत्मलिंग मुलाला दिले.

अधिक वाचा: अतिगर्व बरा नव्हे… कुबेराचे गर्वहरण !…

लहान गुराख्याने तो जास्त वेळ थांबू शकत नाही हे आधीच सांगितले होते. जेव्हा तो थकेल तेव्हा तो तीनदा रावणाचे नाव घेईल आणि जर तो आला नाही तर लिंग तेथेच ठेवून निघून जाईल, हे रावणाने देखील मान्य केले. रावण लघुशंकेला जावून बराच काळ गेला. चमत्कार असा की, रावणाची लघुशंका संपेनाच. लवकरच गणेशाने तीनदा रावणाचे नाव पुकारले, परंतु रावण आलाच नाही. रावणाला येऊन शिवलिंग घेता आले नाही. याच संधीचा फायदा घेवून गणेशाने ते लिंग भूमीवर ठेवले. संतप्त झालेल्या रावणाने शिवलिंग जमिनीवरून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु लिंग काही हलले नाही. आणि कायम स्वरूपी लिंग त्या जागेवर स्थिर झाले. रावण हा स्वतःला सर्व शक्तिमान समजत होता, गणेशाने युक्तीच्या जोरावर त्याचे गर्व हरण केले होते.

बोध: रावण आणि गणरायाच्या कथेवरून शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ हेच सिद्ध होते.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh chaturthi stories for childrens pride is not always good story of lord ganesh and ravana svs