गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे. बाप्पाने नेहमीच आपल्या बुद्धी आणि युक्तीच्या जोरावर यश संपादन केले, परंतु बाप्पाला या गोष्टीचा गर्व मात्र कधीच झाला नाही. उलट ज्यांनी चुकीच्या गोष्टींचा गर्व केला, त्यांना बाप्पानी चांगलीच अद्दल घडवली होती. अशीच अद्दल बाप्पांनी पैशाचा देव कुबेर याला घडवली. तर झाले काय, संपत्तीचा देव कुबेर, हा सर्व देवांमध्ये धनवान, श्रीमंत होता. त्याची श्रीमंती त्याच्या वागण्या-बोलण्यातून झळकायची. त्याचा थाट इंद्र दरबारापेक्षाही मोठा होता. तो उंची महालात राहात होता, त्याच्या महालाच्या भिंती या सोन्याच्या होत्या तर त्यावरील नक्षीकाम हे हिऱ्या- माणकांचे होते. कुबेर हा आकाराने गळेलठ्ठ होता, तर तो सुंदर- मलमली वस्त्र परिधान करीत असे, गळ्यात भरपूर सोन्याचे-हिऱ्यांचे दागिने घालत असे. आपली श्रीमंती दाखवण्याची एकही संधी तो सोडत नसे. प्रत्यक्ष स्वर्गातील देवही त्याच्या या वागण्याने हतबद्ध होत असत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशाच एका प्रसंगी आपली श्रीमंती दाखविण्यासाठी कुबेराने सर्व देवी देवतांना आपल्या महालात जेवणाचे आमंत्रण दिले. भगवान शिव शंकर हे कुबेराचे आराध्य दैवत होते. त्यामुळे त्यांना आमंत्रण देण्यासाठी कुबेर स्वतः त्याच्या भव्य दिव्य रथात बसून कैलासावर गेला. परंतु तो कुबेरच त्याने भगवान शिवशंकरांनाही सोडले नाही, कैलासावर जावून आपल्या श्रीमंतीचे-वैभवाचे प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. त्याने शिवशंकरांना आणि माता पार्वतीला जेवणाचे आग्रहाचे निमंत्रण दिले खरे परंतु ‘कैलासावर जे स्वादिष्ट मिष्ठान्न मिळणार नाही ते कुबेर महालात मिळेल त्यामुळे त्यांनी आलंच पाहिजे’ असेही सांगितले. शेवटी शिवशंकर हे जगत पिता आणि पार्वती या जगत जननी, साक्षात अन्नपूर्णा… दोघांनी केवळ स्मित केले आणि आमच्या कडून बाळ गणेश उपस्थित राहील असे सांगून आमंत्रणाचा स्वीकार केला.

आणखी वाचा : देवी पार्वतीची शिकवण… मुक्या प्राण्यांवर प्रेम करा !

कुबेराकडील सहभोजनाचा दिवस आला, सर्व देवी- देवता कुबेर महालात उपस्थित होते. बाळ गणेशही आपल्या लाडक्या मूषकराजावर स्वार होवून कुबेर दरबारी पोहचला, कुबेराने गणेशाचे स्वागत केले आणि तुला हवे तेवढे खा, इथे तुला कशाचीच कमतरता भासणार नाही, असे सांगितले. छोट्या गणेशाने मोठ्ठा होकार भरला. गणेशाला जेवणाच्या पानावर बसविण्यात आले, वेगवेगळे चविष्ट पदार्थ वाढण्यात आले. गणेशाने जेवणास आरंभ केला . परंतु बराच वेळ गेला तरी गणेशाची क्षुधा काही भागेना, वाढपी जेवण वाढत होता. गणपती बाप्पा आरामात जेवत होते. आणि एक वेळ अशी आली की कुबेराच्या स्वयंपाक घरातील सर्व अन्न पदार्थ संपले तरी मात्र गणेशाची भूक काही भागली नाही.

बाळ गणेश उठून कुबेराकडे गेला आणि म्हणाला, ‘मी तुझा अतिथी आहे मला भूक लागली आहे, अजून जेवण वाढ’. कुबेर घाबरला तो म्हणाला सगळं जेवण संपलं आहे, आता महालात अन्नाचा एक कणही नाही. त्यावर गजानन म्हणाला, मग मी तुला खाणार, आणि गणेशाने कुबेराकडे कूच केले. हे पाहताच कुबेराने धूम ठोकली. कुबेर पुढे, बाळ गणेश मागे, असे हे चित्र. सगळे देवी-देव खो-खो हसत होते. कुबेराला काही कळेना आता काय करावें. त्याला शेवटी शिवशंकराची आठवण झाली. गणेशापासून वाचण्यासाठी कुबेराने सरळ कैलासाकडे धाव घेतली आणि शंकराच्या पायावर डोके ठेवले. आणि देवा मला वाचवा अशी याचना केली.

शिव आणि पार्वती त्यावेळीही शांतच होते. देवी पार्वतीने कुबेराकडे पाहून म्हणाली, ‘अरे धनाच्या देवा कुबेरा, तू साधी माझ्या बाळाची भूक सुद्धा भागवू शकलास नाही, मग तू कसला श्रीमंत’. देवीच्या या वाक्याने मात्र कुबेराचे डोळे खाडकन उघडले, त्याला आपली चूक कळली. आपल्या श्रीमंतीच्या गर्वाने आपण साक्षात जगत् मात्या-पित्याला हीन वागणूक दिली. त्याने तत्क्षणी त्यांची माफी मागितली आणि गणेशापासून वाचविण्याची विनंती केली. त्यावर शिव शंकर म्हणाले, कुबेरा, एक वाटी तांदूळ गणेशाला स्वच्छ मनाने दे. त्याप्रमाणे कुबेराने केले आणि गणेशासमोर एक वाटी तांदळाचा प्रसाद ठेवला, बाळ गणेशाने तो प्रसाद ग्रहण केला आणि तृप्तीचा ढेकर दिला. त्यावेळी कुबेराला कळून चुकले की ‘भगवंत हा भावाचा भुकेला असतो, श्रीमंतींचा नाही!

बोध: गणपती बाप्पानी कुबेराला त्याच्या गर्वाची चांगलीच अद्दल घडविली. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा गर्व हा कधीही वाईटच. तसेच कोणालाही त्याच्या आर्थिक परिस्थितीवरून हीन वागणूक देवू नये, हेही तेवढेच खरे!

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh chaturthi stories for childrens pride is not always good story of lord ganesha and kuber svs